अनिश पाटील
क्रिकेट सामनेनिश्चिती किंवा मॅच फिक्सिंग हे फसवणुकीच्या गुन्ह्यात समाविष्ट होत नाही, त्यामुळे अशा प्रकरणातील संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे. कर्नाटक प्रीमियर लीग टी-२० सामन्यांमध्ये २०१९ मध्ये बेंगळुरू गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मॅच फिक्सिंगचे प्रकरण उघड केले होते. या प्रकरणात क्रिकेट खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाचा सहभाग होता. न्यायालयाच्या निकालानंतर आता पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगची चर्चा सुरू झाली आहे.
न्यायालय काय म्हणाले?
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीनिवास हरीश कुमार यांनी कर्नाटकचे माजी क्रिकेट कर्णधार सीएम गौतम, दोन खेळाडू अबरार काझी आणि अमित मावी आणि बेळगावी पँथर्स संघाचे मालक असफाक अली थारा यांच्याविरुद्ध दाखल केलेले आरोपपत्र रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ‘मॅच फिक्सिंग एखाद्या खेळाडूमधील प्रामाणिकपणाचा अभाव, बेशिस्त आणि भ्रष्टाचाराची मानसिकता दर्शवते. त्यासाठी बीसीसीआयला शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार आहे. बीसीसीआयच्या नियमांमध्ये एखाद्या खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद असल्यास, अशा कारवाईला परवानगी आहे. परंतु कलम ४२० आयपीसी अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची परवानगी नाही,’ असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. ‘संपूर्ण आरोपपत्रातील आरोप त्यांच्या दर्शनी मूल्यावर खरे मानले जात असले तरी ते गुन्हा ठरत नाहीत,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
प्रकरण काय?
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या कर्नाटक प्रीमियर लीगच्या २०१८ आणि २०१९ च्या सत्रात सामन्यांचा निकाल निश्चित केल्याच्या आरोपाखाली २०१९ मध्ये तीन खेळाडू आणि संघ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. केपीएलचे काही सामने खेळाडू आणि संघाच्या अधिकाऱ्यांनी संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने निश्चित केल्याचा आरोप गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासानंतर केला होता. बेंगळुरू गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या एका प्रकरणाचा तपास करत असताना या मॅच फिक्सिंगची माहिती मिळवली आणि कब्बन पार्क पोलिसांकडे गुन्हा नोंदवला. त्यानंतर २०१९ मध्ये गौतम आणि इतरांविरुद्ध मॅच फिक्सिंग प्रकरणातील पोलीस तपास सुरू करण्यात आला होता. त्यावर केवळ दुसऱ्या प्रकरणातील कबुली जबाब व मॅच फिक्सिंगमध्ये कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या मुद्द्यांवर तीन खेळाडूंनी आव्हान दिले होते.
कर्नाटक उच्च न्यायालयाने आरोपी खेळाडू आणि संघ अधिकाऱ्याचा युक्तिवाद ग्राह्य धरून भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० नुसार फसवणूक होत नसल्याचे सांगितले. राज्यातील बेकायदेशीर जुगाराला आळा घालण्यासाठी कर्नाटक पोलीस कायद्याने परिभाषित केल्यानुसार क्रिकेट सामन्यांवरील सट्टा म्हणजे गेमिंग नाही, असा निर्णयही न्यायालयाने दिला.
पोलिसांची कारवाई?
केपीएल २०१९ च्या १२ व्या खेळादरम्यान २२ ऑगस्ट रोजी बेल्लारी टस्कर्स आणि बेंगळुरू ब्लास्टर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यातील षटकात १० पेक्षा जास्त धावा देण्यासाठी बेळगावी पँथर्सचा मालक असफाक अली थारा याने बेल्लारी टस्कर्सचा कर्णधार सीएम गौतमला साडेसात लाख रुपये देण्याच प्रस्ताव ठेवल्याचा आरोप आहे. खेळापूर्वी सराव सत्रादरम्यान गौतमने ऑफस्पिनर अबरार काझीसोबत करार केला. काझीला गोलंदाजीवर आणल्यावर १० पेक्षा जास्त धावा देण्याचे काम सोपवण्यात आले होते आणि या कामासाठी त्याला २.५ लाख रुपये आगाऊ देण्यात आले होते. सामन्यादरम्यान काझीने ११ धावा दिल्या त्यात दोन वाईड चेंडूंचा समावेश होता.
केपीएल २०१९ हंगामाच्या अंतिम सामान्यात गौतमला कथितरित्या थाराने त्याच्या डावात जाणीवपूर्वक सावकाश फलंदाजी करण्यास सांगितले होते. हुबळी टायगर्सने दिलेल्या १५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गौतमने ३७ चेंडूंत २९ धावा केल्या आणि बेल्लारी टस्कर्स संघाने आठ धावांनी सामना गमावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतमला अंतिम फेरीत संथ फलंदाजीसाठी थाराकडून १५ लाख रुपये मिळाले होते असा आरोप आहे.
ही सट्टेबाजी (बेटिंग) ठरते का?
क्रिकेटच नाही, तर प्रत्येक खेळामध्ये सट्टेबाजी चालते. अनेक देशांमध्ये सट्टेबाजी अवैध असल्यामुळे त्यामध्ये संघटित गुंडांच्या टोळ्या कार्यरत आहेत. भारतात दाऊद टोळी फार पूर्वीपासून सट्टेबाजीत सक्रिय आहे. सट्टेबाजी ज्याप्रमाणे सामन्याच्या निकालावर चालते, त्याप्रमाणे फॅन्सी सट्टाही प्रचलित आहे. फॅन्सी सट्ट्यामध्ये एका षटकात किती धावा काढल्या जातील, फलंदाजी करणाऱ्या संघाच्या किती धावा होतील, किती फलंदाज बाद होतील, अशा कोणत्याही गोष्टीवर सट्टा खेळला जातो. पूर्वी पारंपरिक पद्धतीने हा व्यवहार चालायचा. सर्व व्यवहार विश्वासावर चालायचा. पण त्यात पैसे बुडवण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे संघटित गुन्हेगारी टोळ्यांची या व्यवहारांमध्ये मदत घेतली जाऊ लागली. आता काळानुसार त्यात बदल झाले. चिठ्ठीची जागा टेलिफोन व त्यानंतर मोबाईलने घेतली. तसेच व्यवहारांच्या नोंदी डायरीऐवजी लॅपटॉपमध्ये ठेवल्या जाऊ लागल्या. हा सर्व व्यवहार पूर्वी हवाला मार्फत व्हायचा. त्याची जागा आता बिटकॉईनसारख्या आभासी चलनाने घेतली आहे.
मॅचफिक्सिंग व स्पॉट फिक्सिंग
सामन्याच्या निकालावर मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी खेळली जाते. त्याच्या निकालावर मोठे व्यवहार अवलंबून असतात. त्यातून सामन्याचा निकाल निश्चित करण्यात येतो. पण त्यात संघातील कर्णधारासह महत्त्वाच्या खेळाडूंनाही सामील करावे लागते. पण फॅन्सी सट्ट्यामुळे पुढे स्पॉट फिक्सिंग सुरू झाले. एखाद्या संघाचा निकाल निश्चित करण्यापेक्षा एखाद्या षटकात किती धावा होतील, संघ नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी करणार की गोलंदाजी यावर नियंत्रण मिळवणे सोपे होऊ लागले. त्यातून एखाद्या खेळाडूला सांगून स्पॉट फिक्सिंग केले जाऊ लागले. श्रीशांत या माजी भारतीय गोलंदाजाने अशा प्रकारे एकदा स्पॉट फिक्सिंगच केले होते.