रेश्मा राईकवार
माझं अमूक एक गाणं येतंय.. जरुर ऐका… अशा समाजमाध्यमांवरच्या जाहिराती त्याने कधीच केल्या नाहीत. त्याची गाणी अनेकांच्या तोंडावर आहेत, आवडीची आहेत, पण त्याचा चेहरा माहिती नाही. त्याला कायम हुडकावं लागायचं… त्याचे समकालीन आणि त्याच्यानंतर आलेल्या खंडीभर गायकांच्या गर्दीत तो कुठेच दिसायचा नाही. हे सगळं त्याला माहिती होतं, पण एक गाण्याशिवाय त्याला इतर कुठल्याच गोष्टींनी फरक पडला नाही. माझं गाणं लोकांनी कानात साठवावं, मनात ठेवावं, माझा चेहरा लक्षात राहिला नाही तरी चालेल… असं म्हणणारा हळवा, विनयशील, त्याच्या आवाजाप्रमाणेच स्वभावातही पुरेपूर माधुर्य असलेला ‘केके’ आज असाच अचानक कोणालाही न सांगता निघून गेला आहे. त्याच्या गाण्यांमधून साठवलेला ‘केके’ तेवढा आपल्याकडे उरला आहे… नव्वदच्या दशकात इंडी-पॉपच्या जमान्यात तो नावारूपाला आला, पण त्याचा आवाज आजही त्यावेळच्या आणि आजच्या तरुण पिढीवर गारूड करून होता.
सुरुवात विसाव्या शतकाच्या अखेरीस…
विसाव्या शतकाच्या अखेरीस भारतीय चित्रपट संगीताच्या पटलावर कोण्या एका ‘केके’ नामक गायकाची हळूहळू ओळख निर्माण होऊ लागली होती. एकविसावे शतक उजाडेपर्यंत केकेच्या सूरांचा करिश्मा जनमानसावर गारुड करता झाला होता. दिल्लीत जन्मलेला आणि तिथेच लहानाचा मोठा झालेला केके उर्फ कृष्णुकमार कुन्नथ गायक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून १९९४ साली मुंबईत आला. त्याआधी दिल्लीत गाण्याचे कार्यक्रम करणाऱ्या केकेचा आवाज प्रसिद्ध गायक – संगीतकार हरिहरन यांनी ऐकला. त्यांनीच त्याला मुंबईत येण्याचा सल्ला दिला होता. अर्थात, अनेक स्वप्न उराशी घेऊन मुंबईत येणाऱ्या लाखो लोकांप्रमाणेच केकेलाही आल्या-आल्या गायक म्हणून संधी मिळाली नाही. ‘कलोनियल कझिन्स’मुळे घराघरात पोहोचलेल्या लेस्ली लुईस यांच्यामुळे केकेला जिंगल्स गाण्याची संधी मिळाली. आपल्याकडे जे जे येईल ते प्रामाणिकपणे करत राहायचे या वृत्तीने केकेने चार वर्षांत तब्बल साडेतीन हजार जिंगल्स गायली होती. त्याच सुमारास ए. आर. रेहमान यांच्यासाठीही एक – दोन दाक्षिणात्य भाषेतील गाणी त्याने गायली. अगदी १९९६ साली प्रदर्शित झालेल्या गुलजार यांच्या ‘माचिस’ चित्रपटात ‘छोड आए हम’ या गाण्यात हरीहरन, सुरेश वाडकर यांच्याबरोबरीने केकेचाही आवाज होता. या एप्रिलमध्ये पुन्हा एकदा केके आणि गीतकार गुलजार ही जोडी नव्या गाण्याच्या निमित्ताने एकत्र आली. तेव्हा कारकिर्दीतील पहिली संधी आणि त्यानंतर इतक्या वर्षांनी गुलजार यांच्याशी झालेल्या भेटीचा हा क्षण केकेने चाहत्यांशी शेअर केला.
इंडीपॉप आणि केकेचा ‘पल’
१९९९ हे वर्ष केकेसाठी खूप महत्वाचं ठरलं. त्यावेळी इंडीपॉप ऐन भरात होतं. खुद्द लेस्ली लुईस – हरिहरन ही जोडी ‘कलोनियल कझिन्स’ या त्यांच्या अल्बममुळे चर्चेत होती. लेस्ली लुईस यांच्या संगीताने नटलेली अनेक पॉप गाणी प्रसिद्ध होती. केकेचा प्रवेश इथेही काहीसा उशिराने झाला होता, मात्र त्यावेळीही शंकर महादेवन यांचे ‘ब्रेथलेस’, लकी अलीचे ‘ओ सनम’, शानचे ‘तनहा दिल’ अशी अनेक पॉप गाणी आणि अल्बम्स आए दिन प्रसिद्ध होत होती. या सगळ्या गर्दीत केकेचं हळूवार आवाजातलं ‘पल’ हे गाणं प्रदर्शित झालं. लेस्ली लुईस यांच्याबरोबर केलेला त्याचा पहिला स्वतंत्र अल्बम होता ‘पल’. या अल्बममधील त्याच्या शीर्षकगीताबरोबरच ‘यारों’ हे आणखी एक गाणं प्रसिद्ध झालं होतं. पॉप संगीतात ही दोन हळूवार गाणी प्रेक्षकांचं मन जिंकत असताना भन्साळींच्या ‘हम दिल दे चुके सनम’मधलं केकेचं सलमान खानवर चित्रित झालेलं ‘तडप तडप के’ हे गाणं थेट रसिकांच्या मनाला भिडलं आणि एकंदरीत भारतीय चित्रपट संगीतात ‘केके’ नावाचं सुरेल पर्व सुरू झालं.
मोजकीच पण अवीट गाणी…
पैशापोटी गाणं गात राहायचं हा केकेचा हव्यास कधीच नव्हता. त्यामुळे त्याने खूप गाणी गायली आणि तो प्रसिद्ध झाला, असं काही त्याच्या बाबतीत घडलं नाही. शास्त्रीय संगीताचं बाळकडू न घेतलेला केके मला गाणं ऐकून समजतं, ते गाता येतं… माझ्याकडे ती दैवी देणगी होती, असं म्हणायचा. किशोर कुमार हे त्याचे आवडते गायक… अगदी त्यांनीही कधी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं नव्हतं हे कळल्यावर तर त्याने आपल्या पद्धतीने आपलं गाणं विकसित केलं, मोठं केलं. ‘तडप तडप के’ लोकप्रिय झाल्यावर सलमानसाठी गाणी गाण्याच्या ऑफर्सचीही त्याच्याकडे लाट आली होती. पण त्याला तेही नको होतं, कुठल्याही अभिनेत्याचा आवाज बनून राहायचं नाही, हे त्याने ठरवलेलं होतं. त्यामुळे नवं काही आपल्याकडे येईल ते गायचं, वेगवेगळ्या भाषेत स्वतःतल्या गायकाला आजमवायचं, लाईव्ह संगीत कार्यक्रमांतून मनातलं गाणं प्रेक्षकांना ऐकवत त्यांचं भरभरून प्रेम मिळवायचं हे त्याचं जगणं होतं आणि अखेरपर्यंत तो तसाच जगला.
फक्त केके…
‘अपडी पोडू’ हे त्याचं तमिळ गाणं भलतंच लोकप्रिय ठरलं होतं. ‘क्या मुझे प्यार है’ हे ‘वो लम्हें’ या चित्रपटातलं गाणं, ‘ओम शांति ओम’मधील ‘आँखो मे तेरी’, ‘खुदा जाने’ हे ‘बचना ऐ हसीनों’मधलं गाणं, ‘आशिकी २’चं ‘पिया आए ना’, ‘झंकार बीट्स’मधलं ‘तू आशिकी है’, ‘रेहना तेरे दिल मै’चं ‘सच कहे रहा है’, ‘इक्बाल’चे ‘आशाएं’, ‘काईट्स’मधलं ‘दिल क्यूं ये मेरा शोर करे’, ‘बजरंगी भाईजान’साठी गायलेलं ‘तू जो मिला’… अशी कितीतरी अवीट गाणी त्याने गायली आहेत. केवळ चित्रपटच नव्हे तर ‘कोक स्टुडिओ’सारखे प्रयोग असोत वा मालिकांची शीर्षकगीतं… जे जे त्याच्याकडे आलं त्याचं त्याने सोनं करण्याचा प्रयत्न केला. ते गाणं किती लोकप्रिय झालं याची चाचपणी मी सुरुवातीचे काही दिवस करायचो आणि मग सोडून द्यायचो. कोणतं गाणं किती लोकप्रिय आहे हे शेवटी मला लाईव्ह शोजमधून प्रेक्षकांकडून जी मागणी होते त्यातून लक्षात येतं, असं केके म्हणायचा.
केकेची लोकप्रियता…
त्यांची गाणी, खास त्यांचा आवाज यासाठी पार्श्वगायक – पार्श्वगायिका ओळखले जायचे. केके हा अशा प्रकारे ओळखल्या जाणाऱ्या गायक – गायिकांच्या पिढीतला तसा शेवट शेवटचाच असं म्हटलं तर वावगं ठरू नये. हल्ली हिंदी चित्रपटांमधून अनेक नवे गायक – गायिका येतात आणि निघूनही जातात. त्यांची नावंही कोणाच्या लक्षात येत नाहीत. मात्र केकेसारख्या गायकाने दोन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनात आपली गाणी, आपला आवाज टिकवून ठेवण्यात यश मिळवलं. तेही व्यावसायिकतेच्या नफेखोरीत स्वतःतल्या गायकाचा बळी न देता… हे गणित त्याने कसं जमवलं, याचं उत्तर बहुधा त्याच्या स्वभावात असावं. त्याचा मुळातच विनयशील स्वभाव, प्रसिद्धीलोलुपतेचा स्वतःला स्पर्श होऊ नये यासाठी केलेली धडपड, गाणंच शिकावं – तेच वाढवावं हा अट्टहास आणि निखळ स्वभाव हे सगळं अलवार प्रेम त्याच्या गाण्यातही उतरलं. म्हणूनच तो म्हणायचा त्याप्रमाणे त्याच्या चाहत्यांनी त्याला कानात साठवलं आहे, मनात जपलं आहे.