जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात रविवारी (२९ मे) सुरक्षा जवानांनी एक ड्रोन खाली पाडलं. या ड्रोनमधून सात चुंबकीय (Magnetic) किंवा स्टिकी बॉम्ब तसंच बॅरल ग्रेनेड लाँचर्सशी (यूबीजीएल) अनुरुप सात ग्रेनेड जप्त करण्यात आले. ड्रोन आंतरराष्ट्रीय सीमेवरुन भारतीय हद्दीत शिरल्यानंतर कठुआ जिल्ह्यात सुरक्षा जवानांकडून पाडण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तल्ली हरिया चक भागात रविवारी सकाळी या ड्रोनची हालचाल पोलिसांच्या एका शोधपथकाच्या नजरेला पडल्यानंतर त्यांनी या ड्रोनवर गोळीबार केला. या गोळीबारानंतर ड्रोन खाली कोसळलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही स्फोटकं जप्त करण्यात आल्याने मोठा कट उधळला असल्याचं कठुआचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आर सी कोतवाल यांनी सांगितलं आहे.

दक्षिण काश्मीर हिमालयातील अमरनाथ तीर्थस्थळाच्या वार्षिक यात्रेसाठी सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आलेली असतानाच ३० जूनला सुरु होणाऱ्या यात्रेपूर्वी ही घटना घडली आहे. पोलिसांना आधीच गुप्तचर यंत्रणांकडून चारधाम यात्रेवर दहशतवादी मॅग्नेटिक बॉम्बच्या सहाय्याने हल्ला करु शकतात अशी माहिती मिळाली होती.

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून वारंवार वापर होणाऱ्या या चुंबकीय किंवा स्टिकी बॉम्बबद्दल जाणून घेऊयात.

चुंबकीय बॉम्ब म्हणून ओळखले जाणारे हे स्टिकी बॉम्ब अशी स्फोटकं असतात जी वाहनावर किंवा ड्रोनवर बसवून त्याचा स्फोट केला जाऊ शकतो. यामुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. ही स्फोटकं रिमोटच्या सहाय्याने नियंत्रित केली जाऊ शकतात.

जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या बॉम्बच्या तळाशी छोट्या आकाराची चुंबकं लावलेली असतात. याचा वापर बॉम्ब प्लाण्ट करताना म्हणजेच एखाद्या विशिष्ट ठिकाणी ठेवण्यासाठी होतो. सामान्यपणे एखाद्या बॉक्स किंवा स्थिर ठिकाणी बॉम्ब ठेवण्याऐवजी या चुंबकाच्या मदतीने बॉम्ब थेट धातू असणाऱ्या पृष्ठभागावर चिटकवता येतो. स्टिकी बॉम्ब हे खासकरुन वाहनांमध्ये वापरले जातात आणि यासाठी पाच ते १० मिनिटांचा टायमर असतो.

काश्मीर खोऱ्यात चुंबकीय बॉम्बचा वापर का वाढत आहे?

रिपोर्टनुसार, चुंबकीय बॉम्ब तयार करणं सोपं आहे. मेकॅनिक शॉपमध्ये फक्त दोन हजारांत हे बॉम्ब तयार केले जाऊ शकतात. हे बॉम्ब पोर्टेबल असून त्यांचा शोध लावणंही कठीण आहे. मात्र भारतीय सैन्याने यापूर्वी अनेकदा दहशतवाद्यांचे चुंबकीय बॉम्बचा वापर करत आखण्यात आलेले कट उधळून लावले आहेत. सुरक्षा दल सध्या अशा बॉम्बपासून बचाव करण्यासाठी प्रशिक्षण देत असून ट्रेन, बस आणि इतर वाहनांच्या चालकांनाही यासंबंधी माहिती दिली जात आहे.

Story img Loader