IPL Media Rights 2023-27, 12 June 2022: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पुढील वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तयारीला लागले आहे. येत्या १२ जून रोजी बीसीसीआयने आयपीएलचे माध्यम हक्कांचा (मीडिया राईट्स) लिलाव आयोजित केला आहे. मागील पाच वर्षांपासून आयपीएलचे माध्यम हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे होते. २०१८मध्ये स्टारने १६ हजार ३४७ कोटी रूपये खर्च करून हे हक्क विकत घेतले होते. यावर्षी त्यांचा करार संपला आहे. त्यामुळे बीसीसीआयने आता पुढील पाच वर्षांसाठी म्हणजेच २०२३ ते २०१७ या काळासाठी आयपीएलच्या माध्यम हक्कांसाठी निविदा काढल्या आहेत.
काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी या निविदांमध्ये रस दाखवला आहे. त्यामुळे यावेळी बीसीसीआयला बक्कळ पैसा मिळेल अशा अटकळी आत्तापासूनच सुरू झाल्या आहेत. ब्रोकरेज फर्म एलारा सिक्युरिटीजने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, बीसीसीआयला या लिलावातून ६० हजार कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. या आकडेवारीमागील गणित जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर या भल्यामोठ्या रकमेबाबत काहीही अतिशयोक्ती वाटणार नाही.
हेही वाचा – बीसीसीआयला मिळणार घबाड! आयपीएल प्रसारण हक्कांच्या विक्रीतून मिळणार इतके कोटी
२०२३ ते २०२७ या कालवधीसाठी एकूण चार भागांमध्ये आयपीएलचे माध्यम हक्क विकले जाणार आहेत. अशा प्रकारची विक्री पहिल्यांदाच होत आहे. यापूर्वी सर्व हक्क एकत्रितपणे विकले जात होते. डिजिटल माध्यमांच्या वाढीमुळे बीसीसीआयने यावेळी एकाच पॅकेजऐवजी चार वेगवेगळ्या पॅकेजमध्ये हे हक्क विकण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएलच्या भारतातील टेलिव्हिजन हक्कांचे पॅकेज सर्वात आकर्षक असणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने १८ हजार १३० कोटी रुपयांची मूळ किंमत निश्चित केली आहे. पुढील पाच वर्षांच्या काळात प्रत्येकी ७४ सामन्यांच्या आधारे ही किंमत ठरवण्यात आली आहे. प्रत्येक सामना ९० कोटी रुपयांचा असेल, या हिशोबाने एकूण पाच वर्षांची मूळ किंमत निश्चित केली गेली आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयने सामन्यांची संख्या वाढवण्याचा अधिकार स्वत:कडे राखून ठेवला आहे.
दुसऱ्या पॅकेजमध्ये भारतातील डिजिटल प्रसारणाच्या हक्कांचा समावेश आहे. त्यासाठी बीसीसीआयने १२ हजार २०० कोटी रुपये मूळ किंमत निश्चित केली आहे. ही किंमत बघून डिजिटल माध्यमांच्या लोकप्रियतेमध्ये आणि लोकांच्या वापरामध्ये किती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, याचा अंदाज येतो.
तिसऱ्या पॅकेजमध्ये सलामीचा आणि चार प्ले-ऑफ सामन्यांसह १८ सामन्यांचा समावेश आहे. ज्या प्रसारण कंपनीकडे एकच प्लॅटफॉर्म आहे, अशाच कंपन्या यासाठी बोलू लावू शकतात. हे पॅकेज यावर्षी नव्यानेच सादर केले गेले असून त्यासाठी एक हजार ४४० कोटी रुपयांची मूळ किंमत निश्चित केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी २९ मार्च २०२२ याबद्दल ट्विट केले होते. केवळ महसूल वाढवण्याचा नव्हे तर आयपीएल मूल्य वाढवण्याचा हा एक पर्याय असल्याचे ते म्हणाले होते.
चौथ्या पॅकेजमध्ये परदेशातील टीव्ही प्रसारण आणि डिजिटल हक्कांचा समावेश आहे. ज्यातून बीसीसीआयला किमान एक हजार १०० कोटी रुपयांची अपेक्षा आहे. १२ जून २०२२ रोजी वरील प्रत्येक पॅकेजसाठी ई-लिलाव घेतला जाणार आहे. दिवसभरात योग्य खरेदीदार मिळाल्यास त्याच दिवशी विजेते घोषित केले जाण्याची शक्यता आहे.
आयपीएलची लोकप्रियता बघता माध्यमांदेखील यातून भरपूर नफा मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे सुमारे डझनभर कंपन्यांनी आयपीएल माध्यम हक्क निविदा घेतल्या आहेत. डिस्ने हॉटस्टार, सोनी नेटवर्क, वायाकॉम १८, झी एंटरटेन्मेंट यांसारख्या देशांतर्गत कंपन्यांशिवाय अमॅझॉन, अॅपल आणि गुगलसारख्या विदेशी कंपन्याही या लिलाव प्रक्रियेमध्ये स्वारस्य दाखवताना दिसत आहेत. त्यामुळे संपूर्ण लिलाव प्रक्रियेतून बीसीसीआयला ५० ते ६० हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बीसीसीआयने चार वेगवेगळ्या पॅकेजमध्ये माध्यम हक्कांची विक्री मांडली आहे. त्यामुळे प्रत्येक पॅकेजसाठी एक वेगळी कंपनी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सोप्या भाषेत सांगयचे झाल्यास परदेशातील प्रसारण हक्कांसाठी आणि भारतातील प्रसारण हक्कांसाठी दोन वेगळ्या कंपन्या पुढे येऊ शकतात. परिणामी, आयपीएल २०२३ भारत आणि जगभरात अनेक प्लॅटफॉर्मवर दिसू शकते.
गेल्यावेळची लिलाव प्रक्रिया आणि यावेळची लिलाव प्रक्रियेमध्ये दोन मुख्य फरक असणार आहेत. मागच्यावेळी सर्व प्रकारच्या माध्यम हक्कांसाठी एकत्रित बोली लावण्याची परवानगी होती. त्यामुळे स्टार नेटवर्कने एकत्रित बोली लावून सर्व हक्क मिळवले होते. यावेळी एकत्रित बोलीला परवानगी नाही. दुसरा फरक म्हणजे तिसऱ्या १८ सामन्यांच्या पॅकेजचा असणार आहे.
या नवीन बदलांसह होणाऱ्या लिलाव प्रक्रियेतून बीसीसीआयच्या तिजोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे.