नागरी उड्डान संचलनालयाने ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान प्रवास ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. करोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत भारताने मार्च २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लादले होते. याशिवाय सध्या भारताने अति जोखमीच्या देशांच्या यादीतही बदल केले आहेत. या यादीतील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची अधिक कठोर तपासणी केली जाते.
याचा अर्थ सर्व आंतरराष्ट्रीय विमानं रद्द आहेत असा आहे का?
भारताने ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लावले आहेत याचा अर्थ सर्व आंतरराष्ट्रीय विमानं रद्द झालेली नाहीत. भारताने जगातील ३२ देशांबाबत वेगळे नियम केले आहेत. याला बबल अरेंजमेंट असं म्हटलं जातं. या अंतर्गत अमेरिका, सिंगापूर, कतार, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी अशा ३२ देशांमधील विमान सेवे निश्चित वेळापत्रकाप्रमाणेच सुरू आहे. असं असलं तरी या प्रवाशांना केंद्र सरकारच्या करोना नियमावलीचे पालन करणं बंधनकारक ठेवण्यात आले आहे.
नियमित विमान प्रवास केव्हा सुरू होईल?
भारताने काही दिवसांपूर्वीच १५ डिसेंबरपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरळीत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय पुढे ढकलण्यात आलाय. आता भारतातील विमानसेवा ३१ जानेवारीपर्यंत निलंबित असेल. सध्या तरी ही सेवा पुन्हा कधी सुरू होणार याबाबत केंद्र सरकारकडून निश्चित सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे ३१ जानेवारीनंतर लावलेले निर्बंध हटवण्यात येतात की वाढवले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : राज्यात ३ वर्षांच्या मुलीसह आणखी ७ जणांना ओमायक्रॉन संसर्ग, संपूर्ण आकडेवारी एका क्लिकवर
अतिजोखमीच्या देशांच्या यादीत काय बदल?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अतिजोखमीच्या देशांच्या यादीतून सिंगापूर आणि बांगलादेशला काढलं आहे. त्यामुळे या देशातील नागरिकांना विलगीकरणाशिवाय भारतात येता येणार आहे. दुसरीकडे भारताने घाणा आणि तांझानिया या दोन देशांना जोखमीच्या देशांच्या यादीत समाविष्ट केलं आहे.