लोकसत्ता टीम
‘क्रिकेटमधील पितामह’ असा नावलौकिक असलेले डब्ल्यू. जी. ग्रेस यांनी १८६५ ते १९०८ या कालावधीत ८७० प्रथम श्रेणी सामन्यांत १२६ शतकांसह ५४,५९६ धावा केल्या. याच कालावधीत २,८०६ बळीसुद्धा मिळवले. मात्र असोसिएशन ऑफ क्रिकेट स्टॅटिस्टिशियन अँड हिस्टोरियन्सच्या ताज्या नोंदीनुसार ‘विस्डेन’ या क्रिकेट मासिकाने ग्रेस यांच्या काही धावा, काही बळी आणि दोन शतके वजा केल्याचे म्हटले आहे. कारण त्यांच्या कारकीर्दीतील १० सामने प्रथम श्रेणी दर्जाचे नसल्याचे सिद्ध झाले आहे.
ग्रेस यांनी २२ कसोटी सामन्यांत फक्त १,०९८ धावा केल्या. या आकडेवारीतून ग्रेस हे सामान्य दर्जाचे क्रिकेटपटू होते, असे भाष्य जाणकार करू शकतील. परंतु क्रिकेटजगतामधील पहिल्या महानायकाच्या तुरळक आकड्यांआधारे तुलना करणे चुकीचे ठरेल. इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाच्या युगातील ग्रेसचे मोठेपण हे सध्याचा अव्वल अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सच्या १० पट होते. जर त्या काळात समाजमाध्यम अस्तित्वात असते, तर कदाचित डेव्हिड बेकहॅमपेक्षाही कित्येक पटीने अधिक चाहते ग्रेस यांचे असले असते. १९व्या शतकात क्रिकेट हा ब्रिटनचा राष्ट्रीय खेळ होता, फुटबॉल नव्हे. हा मुद्दासुद्धा ग्रेसच्या खेळाला महत्त्व देणारा आहे. या निमित्ताने ग्रेस यांची वादग्रस्त कारकीर्द समजून घेऊया –
ग्रेससह काही क्रिकेटपटूंच्या आकडेवारीत कोणते बदल झाले आहेत?
असोसिएशन ऑफ क्रिकेट स्टॅटिस्टिशियन अँड हिस्टोरियन्स (एसीएस) यांच्या सांख्यिकी ‘विस्डेन’कडून प्रमाण मानल्या जातात. ‘एसीएस’च्या ताज्या अहवालाचा अनेक नामांकित क्रिकेटपटूंच्या आकडेवारीवर परिणाम झाला आहे. ग्रेस यांच्या कारकीर्दीतील १० सामने प्रथम श्रेणी दर्जाचे नसल्याने वजा करण्यात आले. त्यामुळे ग्रेस यांच्या धावा ५४,८९६ ऐवजी ५४,२११, बळी २,८७६ ऐवजी २,८०९ स्पष्ट करण्यात आले. ‘एसीएस’ने १९३०-३१मधील काही सामने प्रथम श्रेणी दर्जाचे असल्याचे मांडल्याने जॅक हॉब्ज यांच्या आकडेवारीत दोन शतकांची (१९७ऐवजी १९९ शतके) भर पडली. हर्बर्ट सटक्लिफ आणि विल्फ्रेड ऱ्होड्स यांच्या आकडेवारीवरही त्याचा परिणाम झाला आहे.
ग्रेस यांचे मोठेपण वादातीत होते का?
ग्रेस यांचा जन्म १८ जुलै १८४८मध्ये झाला. त्यांच्यामुळेच क्रिकेट रुजला आणि लोकप्रिय झाला. ग्रेस यांना क्रिकेटच्या प्रारंभीच्या युगातील महान क्रिकेटपटू जरी म्हटले तरी त्यांच्या या हौसेने व्यावसायिकतेपेक्षा अधिक कमाई केली. मिथक आणि अर्धसत्ये यांनी ग्रेस यांच्याशी उत्तम सांगड घातली. कारण व्हिक्टोरीयाकालीन इंग्लंड त्यांच्या दिव्यत्वातच रममाण झाले. ते बाद झाल्यावरही फलंदाजी करीत राहायचे. ते धाव घेताना क्रिझ गाठण्यात अपयशी ठरले, तरी प्रतिस्पर्धी फलंदाज धावचीत व्हायचा. पायचीत कौल देणाऱ्या पंचालाही ‘हे प्रेक्षक माझी फलंदाजी पाहायला आले आहेत’, असे सुनवायचे. त्यामुळे ग्रेस यांना बाद ठरवणे, हे अशक्यकोटीचे मानले जायचे.
ग्रेस यांनी मिडविंटर यांचे अपहरण का केले?
ग्लुस्टरशायरकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाचे अपहरण केल्याचा आरोपही ग्रेस यांच्यावर केला जातो. ग्लुस्टरशायरमध्ये जन्मलेले बिली मिडविंटर यांनी ऑस्ट्रेलियात स्थलांतर केले आणि व्हिक्टोरियाकडून खेळू लागले. परंतु देशात आवश्यकता असेल तेव्हा खेळण्याचे वचन मिडविंटर यांनी ग्रेस यांना दिले होते. एका सामन्यासाठी ग्रेस यांच्या संघाला एक खेळाडू कमी पडत होता. तेव्हा ग्रेस यांनी कारने लॉर्ड्स गाठले. ऑस्ट्रेलिया संघासमवेत आलेल्या मिडविंटर यांना गाडीत कोंबले आणि ओव्हलवर सामन्यासाठी आणले. याबाबत ग्रेस यांची तक्रारसुद्धा झाली. ऑस्ट्रेलियाने दौरा अर्धवट सोडण्याची धमकी दिली. परंतु ग्रेस यांनी दिलगिरी प्रकट करीत हे प्रकरण शमवले.
धोकेबाज ग्रेस यांचे सामाजिक दायित्व…
ऑगस्ट १८८२मधील ॲशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज फ्रेड स्पोफोर्थ यांनी आपल्या वेगवान माऱ्याच्या बळावर ४४ धावांत ७ बळी घेतले. हा सामना इंग्लंडने ७ धावांनी गमावला. ग्रेस यांनी आपला सहकारी सॅमी जोन्सला या सामन्यात धावचीत केल्याबद्दल स्पोफोर्थ यांनी इंग्लंडच्या ड्रेसिंग रूमबाहेर जाऊन ग्रेस यांना ‘धोकेबाज’ म्हटले. ग्रेस यांच्याशी वाद उकरून काढण्याच्या इराद्याने स्पोफोर्थ यांनी ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केला. तेव्हा पेशाने डॉक्टर असलेले ग्रेस रक्ताची उलटी करणाऱ्या एका प्रेक्षकावर उपचार करीत होते. हे पाहून स्पोफोर्थ स्तब्ध झाला.