लोकसत्ता टीम
अर्जेंटिनाने क्रोएशियावर विश्वचषक २०२२च्या पहिल्या उपांत्य सामन्यात ३-० अशी मात करून सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात ज्युलियन अल्वारेझने दोन गोल केले, तरी आधीच्या काही सामन्यांप्रमाणे याही सामन्यात अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेसीचा मैदानावरील वावर, वेग आणि प्रभाव त्यांच्या संघासाठी निर्णायक ठरला. मेसीने या सामन्यातला पहिला गोल केला, तर तिसऱ्या गोलसाठी पास देताना त्याने दाखवलेले कौशल्य जगभरातील फुटबॉल रसिकांना थक्क करून गेले.
विक्रमांची बरसात…
लिओनेल मेसीचा क्रोएशियाविरुद्धचा सामना विक्रमी २५वा सामना होता. विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळण्याच्या विक्रमाशी (लोथर मथेआउस, जर्मनी) त्याने बरोबरी केली. १९६६ विश्वचषक स्पर्धेनंतर प्रथमच मेसीने सलग चौथ्या सामन्यात गोल आणि गोलसाठी साह्य अशी दुहेरी कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत ५ गोल केलेले असून, तो संयुक्त अव्वल स्थानावर पोहोचला. फ्रान्सच्या किलियन एमबापेचेही ५ गोल झाले असून, या स्पर्धेच्या गोल्डन बूट (सर्वाधिक गोल) पुरस्कारासाठी या दोघांमध्ये स्पर्धा असेल. विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनातर्फे सर्वाधिक गोल (११) करण्याच्या विक्रमही मेसीच्या नावावर नोंदवला गेला. विश्वचषकात ८ गोलांसाठी साह्य करण्याच्या (असिस्ट) दिएगो मॅराडोनाच्या विक्रमाशी मेसीने या सामन्यात बरोबरी केली. अशा रीतीने प्रत्यक्ष गोल अधिक गोलसाह्य करत १९ गोलांमध्ये सहभागाच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली. हा विक्रम त्याच्याशिवाय जर्मनीचे मिरोस्लाव्ह क्लोसा आणि गेर्ड म्युलर, तसेच ब्राझीलचा रोनाल्डो यांच्या नावावर आहे. एकाच विश्वचषकात ५ गोल करणारा सर्वांत वयस्कर खेळाडूही मेसी ठरला.
अस्सल ‘मेसी मॅजिक’…
पण विक्रमांपेक्षाही हा सामना लक्षात राहिला, तो लिओनेल मिसेच्या जादूमयी पदलालित्यामुळे. तो सुरुवातीला थोडा निस्तेज होता आणि तीन-चार क्रोएशियन खेळाडूंनी सतत घेरल्यामुळे त्याला फारशी संधी मिळत नव्हती. परंतु ३४व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. त्यावर क्रोएशियाचा निष्णात गोलकीपर लिवोनोविचला सहज चकवत मेसीने गोल केला. या गोलाने अर्जेंटिनाच्या संघात चैतन्य फुंकले. मेसीदेखील अधिक आत्मविश्वासाने क्रोएशियन गोलक्षेत्रात चढाया करू लागला. उत्साह संचारलेल्या मेसीला रोखणे विशेषतः दुसऱ्या हाफमध्ये प्रतिस्पर्ध्यांना जड जाऊ लागले. बऱ्याचदा क्रोएशियन गोलक्षेत्राच्या जरा बाहेर मेसी केवळ एकटा चालत राहायचा, संधीची वाट पाहात. ती संधी त्याला ६९व्या मिनिटाला मिळाली. क्रोएशियन बचावपटूंना त्यांच्या गोलक्षेत्रातला चेंडू चटकन दूर धाडता आला नाही. मेसीने चेंडूवर झटक्यात ताबा मिळवत उजव्या बगलेवरून क्रोएशियन पेनल्टी क्षेत्रात मुसंडी मारली. या संपूर्ण स्पर्धेत अभेद्य बचाव करून दाखवलेला क्रोएशियाचा बचावपटू जोस्को ग्वार्डिओल मेसीसमोर उभा राहिला. पण मेसीला रोखताना त्याची तारांबळ उडाली. त्याच्या समोरून, बाजूवरून, मागून चेंडू काढत मेसी ज्या प्रकारे पुढे सरकला, ते पाहता त्याला या खेळत दैवत्व का प्राप्त झाले याची नीटच प्रचीती आली. झटक्यात मेसीने चेंडू क्रोएशियन गोलसमोर उभ्या असलेल्या अल्वारेझकडे सरकवला, अल्वारेझने तो गोलजाळ्याच्या उजव्या कोपऱ्यात धाडला. अर्जेंटिना ३ – क्रोएशिया ०. गो लागला अल्वारेझच्या नावावर, पण त्याचा शिल्पकार सर्वार्थाने मेसीच होता.
आधीच्याही सामन्यांमध्ये…
गटसाखळीत पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियाकडून १-२ असा धक्कादायक पराभव झाल्यानंतर मेसीने आपल्या सहकाऱ्यांना स्वतःच्या दर्जावर नव्हे, तर खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. नंतरच्या प्रत्येक सामन्यात मेसी स्वतः अतिशय आक्रमक आणि सक्रिय राहिला. मेक्सिको, मोलंडविरुद्ध २-० असे विजय, बाद फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक अफलातून मैदानी गोल, नेदरलँड्सविरुद्ध एक अफलातून पास, ज्यावर अर्जेंटिनाच्या मोलिनाने गोल केला.. ‘मेसी मॅजिक’ या स्पर्धेत वारंवार दिसून येत आहे. ती अंतिम फेरीतही राहावी, अशी त्याच्या लक्षावधी चाहत्यांची अपेक्षा राहील.
सहाव्यांदा अंतिम फेरीत…
या विजयासह अर्जेंटिनाने विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी सहाव्यांदा (१९३०, १९७८, १९८६, १९९०, २०१४, २०२२) गाठली. त्यांच्यापेक्षा अधिक वेळा अधिक फेरी केवळ जर्मनी (८ वेळा), ब्राझील (७ वेळा) या दोनच देशांनी गाठलेली आहे. इटलीनेही आतापर्यंत ६ वेळा अंतिम फेरी गाठली आहे.