लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे पुढील लष्करप्रमुख असणार आहेत. या पदावर पोहोचणारे ते पहिले अभियंता अधिकारी आहेत. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करप्रमुख एमएम नरवणे यांची जागा घेतील. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे एमएम नरवणे यांच्यानंतर लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. सध्या लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्कराचे उपप्रमुख आहेत. दरम्यान, प्रथमच एक कोर ऑफ इंजिनियर अधिकारी लष्करप्रमुख होत आहेत.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे १ मे रोजी २९ वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. लष्करप्रमुख एमएम नरवणे यांचा ३० एप्रिल रोजी २८ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. नॅशनल डिफेन्स अकादमीचे पदवीधर असलेले मनोज पांडे १९८२ मध्ये कोर ऑफ इंजिनियर्समध्ये नियुक्त झाले. जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ पल्लनवाला सेक्टरमध्ये ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांनी इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले असून दहशतवादविरोधी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता.
१ फेब्रुवारी रोजी लष्कराचे उपप्रमुख होण्यापूर्वी ते लष्कराच्या पूर्व कमांडचे प्रमुख होते. ही कमांड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे रक्षण करण्यासाठी जबाबदार आहे. लेफ्टनंट जनरल पांडे यांनी अंदमान आणि निकोबार कमांडचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे. मनोज पांडे हे जून २०२० ते मे २०२१ पर्यंत अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ होते.
याशिवाय जनरल मनोज पांडे यांनी पश्चिम लडाखच्या उंच भागात पर्वतीय विभाग आणि ईशान्येकडील एका सैन्यदलाचे नेतृत्व केले. “सेनाप्रमुख जनरल एमएम नरवणे आणि सर्व कर्मचारी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची २९ वे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे १ मे २०२२ रोजी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील, अशी माहिती लष्कराने दिली आहे.
ऑपरेशन पराक्रममध्ये महत्त्वाची भूमिका
डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन पराक्रमचा भाग म्हणून पश्चिम सीमेवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि सैन्य तैनात करण्यात आले होते. ही घटना घडली तेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती होती. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील ऑपरेशन पराक्रम दरम्यान नियंत्रण रेषेजवळ इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले. यासह, त्यांनी पश्चिम सेक्टरमध्ये एक अभियंता ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड आणि पश्चिम लडाखच्या उच्च उंचीच्या भागात एक हिल डिव्हिजन आणि ईशान्येकडील एका कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे.
नागपूरकर मनोज पांडे
मनोज पांडे हे नागपूरचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सी.डी. पांडे आणि आकाशावणीच्या उद्घोषिका प्रेमा पांडे यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. पांडे कुटुंबीय अमरावती रोडवरील हिंदुस्थान कॉलनी येथे वास्तव्यास आहेत. मनोज पांडे यांचा एकुलता एक मुलगा अक्षय पांडे भारतीय वायुसेनेत कमिशन्ड ऑफिसर असून, त्यांची नेमणूक बंगलोर येथे आहे. लेफ्टनन्ट जनरल मनोज पांडे यांच्या पत्नी अर्चना पांडे दंत चिकित्सक आहेत.