भारताच्या परकीय चलन गंगाजळीत गत १० महिन्यांत ७० अब्ज डॉलरची घट झाली आहे. राखीव परकीय चलन संचितातील ही मोठी व तीव्र गतीने झालेली घसरण आहे. अत्यंत अपारंपरिक पद्धतीने जमा केलेला हा डॉलर साठा पुरवून-पुरवून वापरला जाण्याकडेच त्याचे नियंत्रण असलेल्या रिझर्व्ह बँकेचा कल असणे स्वाभाविकच. पण ढासळत्या रुपयाला तारण्यासाठी त्याचा वापर झाला आणि होत राहणे हे देखील स्वाभाविकच… पण असे कुठवर सुरू ठेवता येऊ शकेल?

गंगाजळीच्या भरभक्कमतेला ताजी झळ कितपत?

महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून

गतवर्षी ३ सप्टेंबरला ६४२.४५ अब्ज डॉलरच्या भरभक्कम शिखरावरून, सरलेल्या १५ जुलैपर्यंत भारताच्या परकीय चलन गंगाजळी ५७२.७१ अब्ज डॉलरपर्यंत ओसरली आहे. केवळ १० महिन्यांच्या अल्पावधीत जवळपास ७० अब्ज डॉलरची मोठी घसरण आहे. एवढ्या वेगाने चलन साठा कसा आणि का संपला, हा प्रश्न स्वाभाविकच आहे. पण याचे उत्तर, सर्वप्रथम हा साठा कसा जमा झाला हे समजून घेतले तर सहजपणे मिळू शकेल.

राखीव गंगाजळीचे महत्त्व काय आणि ती कशी तयार होते?

वस्तू आणि सेवांच्या निर्यातीतून देशाची होणारी कमाई जेव्हा त्या देशाकडून होणाऱ्या आयातीची देणी भागवल्यानंतरही जास्त असते, तेव्हा त्या देशाकडील परकीय चलन साठा फुगत जातो. आयातीपेक्षा निर्यातीचे पारडे जड राहिल्यास चालू खात्यावरील अधिशेष राखला जातो आणि परिणामी गंगाजळी वाढत जाते. देशातील हा अतिरिक्त विदेशी चलनाचा ओघ मध्यवर्ती बँक – रिझर्व्ह बँकेकडून जमा करून राखला जातो. अगदी कुटुंबातही जमा-खर्चाची तोंडमिळवणी केल्यानंतर, महिन्याकाठी वाचणारा पैसा बचतीत जमा होतो. ही बचत भविष्यात वापरासाठी, पर्यायाने कुटुंबाच्या भवितव्यासंबंधी निश्चिंतता प्रदान करणारी असते. त्याचप्रमाणे देशाच्या चालू खात्यावरील अधिशेष म्हणून जमा होणारी चलन गंगाजळी जितकी मोठी तितकी ती इतर देशांमध्ये उत्पादक कार्यात गुंतविली जाऊ शकते. अशा स्थितीत तो देश वस्तू आणि सेवांव्यतिरिक्त ‘भांडवला’चा निर्यातदार देशही बनतो.

भारताने चलन गंगाजळी उभारण्यासाठी स्वीकारलेली वाट वेगळी कशी?

मागील ११ वर्षांत (२०११ ते २०२१) सर्वाधिक परकीय चलन साठा उभारणाऱ्या जगातील आघाडीच्या १२ देशांमध्ये भारताचे पहिल्या पाचांत स्थान आहे. मात्र प्रचंड मोठा परकीय चलन साठा आहे, अशा अन्य देशांच्या तुलनेत भारताने जमविलेल्या चलन साठ्यात मूलभूत फरक आहे. मागील ११ पैकी फक्त एका वर्षाचा – २०२० सालाचा – अपवाद केल्यास, आपल्या आयात-निर्यात ताळेबंद शिलकीचा कधीही न राहता, तो कायम तुटीचा राहिला आहे. २०२१ अखेर जरी ६३८.५ अब्ज डॉलरची गंगाजळी भारताकडे जमा असली तरी चालू खात्यातील तूट ११ वर्षांमध्ये ४०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त फुगत आली आहे. म्हणजेच १२ देशांच्या सूचीतील चीन, जपान, स्वित्झर्लंड, रशिया, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, सिंगापूर, जर्मनी यांनी धडधाकट निर्यातीतून, पर्यायाने चालू खात्यातील अधिशेषांतून परकीय चलन साठा तयार केला. तर भारताने विदेशातून ‘भांडवला’च्या आयातीतून हा साठा तयार केला. भारताप्रमाणेच अमेरिका, ब्राझीलचीदेखील स्थिती आहे. किंबहुना त्यांची चालू खात्यावरील तूट भारताच्या तुलनेत जास्तच आहे. तथापि बहुतांश आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये वापरात येणारे जगाचे राखीव चलन अर्थात डॉलरची मालकी ज्या देशाकडे आहे, त्या अमेरिकेसाठी परकीय चलन साठा आणि चालू खात्यातील तुटीचा मापदंडच गैरलागू ठरतो.

मग भारताच्या चलन गंगाजळीत वाढीचे स्रोत काय?

भारताची परकीय चलन गंगाजळी ३१ मार्च १९९० अखेर अवघी ३.९६ अब्ज डॉलर होती. त्या पातळीपासून ती ३१ मार्च २०२२ अखेर ६०७.३१ अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. या ३२ वर्षांच्या काळाची प्रत्येक आठ वर्षांच्या कालावधीच्या चार टप्प्यांमध्ये विभागणी केल्यास, चलन गंगाजळीतील सर्वाधिक वाढ ही नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात गेल्या आठ वर्षांत झाली आहे. किंबहुना ६०७.३१ अब्ज डॉलरमधील निम्म्याहून अधिक भर मागील आठ वर्षांतच पडली आहे. पण लाखमोलाचा प्रश्न ही भर नेमकी कशी? उल्लेखनीय बाब म्हणजे, परकीय चलनाचा संचय हा आयातीपेक्षा दमदार निर्यातीच्या परिणामी वाढत गेल्याचे आठ-आठ वर्षांच्या सर्व चार टप्प्यांमध्ये केव्हाही दिसून आलेले नाही. याउलट, २०१४-१५ ते २०२१-२२ या आठ वर्षांत एकत्रित व्यापार तूट (आयात-निर्यात दरी) तब्बल १.२ लाख कोटी डॉलरच्या जवळपास पोहचली आहे. ही तूट अंशतः आयात-निर्यात ताळेबंदाच्या ‘अदृश्य’ खात्यावरील ९६८ अब्ज डॉलरच्या नक्त अधिशेषाने भरून काढली गेली आहे. या अदृश्य आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये प्रामुख्याने भारतीय माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या सॉफ्टवेअर सेवारूप निर्यातीतून झालेली प्राप्ती, परदेशस्थ भारतीयांनी मायदेशातील स्वकियांना पाठवलेला पैसा आणि पर्यटन व्यवसायाच्या कमाईचा समावेश होतो. भारताच्या बाबतीत, या ‘अदृश्य’ मिळकती या नेहमीच विदेशातून उभारलेल्या कर्जावरील व्याजाची परतफेड, लाभांश, भारतात कार्यरत बहुराष्ट्रीय कंपन्यांचे स्वामित्व-धन (रॉयल्टी), परवाना शुल्क, परदेशी प्रवास आणि विविध व्यवसाय व वित्तीय सेवांवरील खर्चापेक्षा जास्त राहत आल्या आहेत.

भारताला तारणारे ‘अदृश्य’ घटक कोणते?

आधी म्हटल्याप्रमाणे देशाच्या चालू खात्यातील तुटीला आवर घालण्यात आणि पर्यायाने डॉलरचे संचित वाढवत नेण्यास अदृश्य अधिशेषांचा मोठा वाटा राहिला आहे. १९९८-९९ ते २००५-०६ या आठ वर्षांमध्ये त्या परिणामी चालू खात्यावर ०.०५४ अब्ज (५.४ कोटी) डॉलरचा अधिशेष अपवादात्मकरीत्या दिसू शकला आहे. त्याचप्रमाणे २००१-०२ ते २००३-०४ या तीन वर्षांत आणि पुन्हा २०२०-२१ या आर्थिक वर्षातही अधिशेष नोंदवला गेला आहे. मागील १० वर्षांत तर अनुक्रमे २५.२ अब्ज डॉलर आणि ६८.४ अब्ज डॉलर असा देशात सुरू राहिलेला भांडवलाचा प्रवाह आणि आटोपशीर चालू खात्यातील तुटीच्या सरासरीचा संयोग चलन गंगाजळीत वाढीसाठी सकारात्मक राहिला आहे. मात्र या दोन घटकांव्यतिरिक्त, परकीय चलनाचा साठ्यातील डॉलर तसेच डॉलरेतर चलने आणि सोन्याचे मूल्य आणि विनिमय दर या घटकांनीही चलन गंगाजळीचे एकूण मोल वाढविले अथवा घटविले आहे.

राखीव गंगाजळीच्या सुदृढतेपुढील आव्हाने कोणती?

सरलेल्या एप्रिल-जून २०२२ तिमाहीत देशाची व्यापार तूट ७०.८ अब्ज डॉलर होती. संपूर्ण आर्थिक वर्षात ती २५० अब्ज डॉलरचा टप्पा पार करू शकते. निव्वळ निर्यात उत्पन्नाव्यतिरिक्त ‘अदृश्य’ खात्यावरील प्राप्ती ही २०२१-२२ मध्ये १५०.७ अब्ज डॉलरच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहचली होती. आधीच्या दोन वर्षांत ती अनुक्रमे १२६.१ अब्ज डॉलर आणि १३२.९ अब्ज डॉलर पातळीवर होती. अमेरिका आणि युरोपमध्ये येऊ घातलेल्या मंदीचा भारताच्या सॉफ्टवेअर निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात नक्त अदृश्य प्राप्तीही घटून १४० अब्ज डॉलरच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. परिणामी चालू खात्यावरील तूट वर्षाअंती १०० ते ११० अब्ज डॉलरच्या वर पोहचलेली असेल, जी २०१२-१३ मधील ८८.२ अब्ज डॉलर आणि २०११-१२ मधील ७८.२ अब्ज डॉलरच्या तुटीचाही विक्रम मोडेल. असे असले तरी, एप्रिल-डिसेंबर २०२१ दरम्यान ८७.५ अब्ज डॉलरचा नक्त भांडवल प्रवाह आपल्या दृष्टीने जमेची बाब होती. मात्र २०२१-२२च्या शेवटच्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) १.७ अब्ज डॉलरचे नक्त बहिर्गमन झाले आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हसह, इतर मध्यवर्ती बँकांनी कठोर पतधोरण अनुसरल्यामुळे वाढणारे जागतिक व्याजदर आणि रोख्यांवरील उत्पन्न पाहता, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून, खासगी गुंतवणूकदार संस्था किंवा नवउद्यमी उपक्रमांना निधी पुरवणाऱ्या साहसी भांडवलदारांकडून चालू आर्थिक वर्षातही भांडवलाचा बहिर्प्रवाह अधिक तेज होण्याची शक्यता दिसून येते. याचे परिणाम काय, हे चालू आर्थिक वर्षात एप्रिलपासून चलन गंगाजळीतील ३५.६ अब्ज डॉलरच्या ओहोटीने दाखवून दिलेच आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने ढासळत्या रुपयाला तारण्यासाठी राखीव चलन गंगाजळी सढळपणे वापरल्याचे स्पष्टच दिसत आहे. रुपयाचे विशिष्ट मूल्य निश्चित केले नसले तरी त्यातील अस्थिर आणि वादळी चढ-उतारांबद्दल मध्यवर्ती बँक शून्य सहनशीलतेची भूमिका राहिल, अशी गव्हर्नर शक्तीकांत दास यांची स्पष्टोक्ती आहे. त्यामुळे राखीव गंगाजळी ५५० अब्ज डॉलरच्या खाली घरघरणे नाकारता येत नाही.

Story img Loader