अनिकेत साठे
बलाढ्य रशियन सैन्याने युद्धाच्या दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच युक्रेनच्या हवाई क्षेत्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पण, हल्ल्यांची तीव्रता वाढवूनही जमिनीवर प्रभुत्व मिळवण्यात ती गतिमानता दिसली नाही. युक्रेनमध्ये शिरकाव करताना रशियन सैन्याला स्थानिकांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. शस्त्रसामग्री हाती नसणारे युक्रेनियन मोलोटोव्ह कॉकटेल अर्थात ज्वलनशील बॉम्बफेकीने शहरांच्या वेशीवर रशियाशी झुंज देत आहेत.
मोलोटोव्ह कॉकटेल म्हणजे काय ?
ज्वलनशील घटकाने भरलेली काचेची बाटली, जी हाताने भिरकावल्यास आग लावण्यास पुरेशी ठरते. कठीण पुष्ठभागावर ती आदळली की, क्षणार्धात भडका उडतो. तिला मोलोटोव्ह कॉकटेल म्हणजे पेट्रोल बॉम्ब म्हणतात. अल्पावधीत सहजपणे त्याची निर्मिती करता येते. ज्वलनशील पदार्थ म्हणून मद्य वा पेट्रोल आणि बाटलीच्या झाकणाभोवती कापडाचे वेष्टन वापरले जाते. ते वातीचे काम करते. घरातच हा बॉम्ब कसा तयार करता येईल, तो कसा फेकावा याविषयी युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रशिक्षण दिले. त्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांतून देशभर पसरल्या.
हे नाव पडले कसे ?
मोलोटोव्ह कॉकटेल या नावाबद्दल मनोरंजक किस्सा आहे. त्याचे धागे पूर्वीच्या सोव्हिएत रशियाशी जोडलेले आहेत. १९३९ मध्ये नोव्हेंबर महिन्यात, म्हणजे दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर दोनच महिन्यांनी सोव्हिएत रशियाने फिनलँडवर हल्ला चढवला. फिनलँडवर बाँबवर्षावासाठी बाँबर विमाने घोंघावू लागली, त्यावेळी ती तेथे अन्नपाकिटे टाकण्यासाठी जात असल्याची भन्नाट बतावणी सोव्हिएत रशियाचे मंत्री याचेस्लेव्ह मोलोटोव्ह यांनी रशियन नभोवाणीवरून केली! प्रत्यक्षात विमानातून क्लस्टर बॉम्बचा वर्षाव होत असे. फिनलँडवासीयांनी या कृतीला उपरोधाने ‘मोलोटोव्ह ब्रेड बास्केट’ संबोधले. रशियन रणगाडे पेटवण्यासाठी फिनलँडवासीयांनी बाटलीत मद्य भरून हाताने भिरकावता येतील, अशा बॉम्बची निर्मिती केली. रशियन भोजनाबरोबर मद्य हवेच! त्यामुळे ‘अन्न पाकिटां’ना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी आपल्या घरगुती बॉम्बला ‘मोलोटोव्ह कॉकटेल’ हे नाव दिले. सोव्हिएत रशियाची शकले पडून बराच काळ लोटला. पण, रशियन सैन्याची त्यापासून आजही सुटका झालेली नाही.
इतिहास काय सांगतो?
जगभरात मोलोटोव्ह कॉकटेल अनेक दशकांपासून आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. दंगल, गनिमी कावा, दहशतवादी कृत्यात त्याचा आधिक्याने वापर झाला. १९३६-३९ मध्ये स्पॅनिश गृहयुद्धात त्याचा प्रथम वापर झाल्याचे सांगितले जाते. खालखिन गोईच्या लढाईत हेच तंत्र जपानने रणगाडा विरोधी मोहिमेत वापरले. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन नौदलाच्या कमांडोजकडून त्याचा वापर झाला. तेव्हापासून ते जागतिक दहशतवाद विरोधातील लढाईपर्यंत या बॉम्बचा जगात वेगाने प्रसार झाला. संघर्षात विरोधकाला हताश करण्याचे साधन म्हणून ते पुढे आले. फारशी शस्त्रास्त्रे हाती नसणाऱ्यांचे ते प्रतीक बनले. २०१४ मधील बांग्लादेश सरकारच्या विरोधातील निदर्शन असो वा, २०१९-२० दरम्यान हॉगकाँगमधील आंदोलने असोत, नागरिकांनी त्याचा आधार घेतला. अमेरिकेत दंगली व आंदोलनांमध्ये हे बॉम्ब प्रदीर्घ काळापासून वापरले जात आहेत.
किफायतशीर आयुधांचा शोध?
रशियन सैन्याने युक्रेनच्या ईशान्यकडील भागात प्रथम हल्ला चढविला होता. तेव्हापासून गुगलवर मोलोटोव्ह कॉकटेलचा शोध घेणाऱ्यांमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली. देशासाठी लढण्याची ऊर्मी बाळगणाऱ्यांनी हा बॉम्ब तयार करण्याची पद्धत जाणून घेतली. काहींनी तो जंगलात बनविता येईल का, याचाही शोध घेतला. रशियन सैन्य किव्ह या राजधानीकडे मार्गक्रमण करू लागले, तसे अग्निबाण कसा तयार करता येईल, हे तीन दशलक्ष जणांनी शोधले. या युद्धात मोलोटोव्ह कॉकटेल हे सर्वांत किफायतशीर आयुध ठरले.
अल्पावधीत निर्मिती कशी?
रशिया-युक्रेनच्या सैन्य दलात कुठल्याही पातळीवर तुलना होऊ शकत नाही. युक्रेनने नागरिकांना शस्त्र देऊन देशाच्या रक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. पण शस्त्र वाटपास मर्यादा होती. मोलोटोव्ह कॉकटेलचे तसे नव्हते. रशियन आक्रमणाने संतापलेल्या युक्रेनवासीयांना मोलोटोव्ह कॉकटेलने प्रत्युत्तराची संधी मिळाली. संगणक तज्ज्ञ, शिक्षक, युवक, पालक, कला संग्रहातील कर्मचारी आदींनी बॉम्ब निर्मितीच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. त्यामुळे अतिशय कमी वेळेत मोठ्या प्रमाणात हे बॉम्ब तयार झाले. रशियाविरोधात नागरिक त्याचा सर्वत्र वापर करीत आहेत.
(aniket.sathe@expressindia.com)