पावलस मुगुटमल
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मोसमी पावसाबद्दलचे अंदाज आणि ते वर्तविण्याच्या पद्धतीवर नोंदविण्यात येणाऱ्या आक्षेपांच्या वातावरणातच नैर्ऋत्य मोसमी पाऊस कधी वेगवान, तर कधी संथपणे वाटचाल करतो आहे. हवामान लहरी असते आणि ते संपूर्णपणे कोणत्याही शास्त्राच्या किंवा अभ्यासकाच्या आवाक्यात येत नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. याच लहरी हवामानाच्या बदलत्या स्थितीनुसार मोसमी पाऊस आणि त्याचा प्रवासही मनमौजी असतो. पावसाचे काही आडाखे आणि गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासानुसार काही तांत्रिक गोष्टी लक्षात घेऊनच मोसमी वाऱ्यांचा प्रवास जाहीर केला जातो. केरळमध्ये २९ मे रोजी मोसमी पाऊस पोहोचल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आणि नंतर त्याचा प्रवास मंदावला. त्यामुळे तो केरळमध्ये पोहोचला की नाही, याबाबत साशंकता व्यक्त झाली. आता तो कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल झाल्याचेही जाहीर झाले आहे. त्यामुळे तो केरळपासून महाराष्ट्रापर्यंत नेमका कसा पोहोचला आणि खरंच पोहोचला का, हेही पाहावे लागेल.
मान्सूनचा प्रवेश कशाच्या आधारावर?
भारताच्या भूभागावर मोसमी पाऊस दाखल होण्यापूर्वी त्याचा प्रवास समुद्रातून आणि बेटांवरून होत असतो. त्याच्या दोन शाखा असतात. त्यातील एक अरबी समुद्रातील आणि दुसरी बंगालच्या उपसागरातील. दोन्ही बाजूने मोसमी पावसाचा प्रवास वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. मात्र, समुद्रातून भूभागाकडे येताना त्याची काही लक्षणे दिसतात. पूर्वमोसमी किंवा अवकाळी पाऊस विजांच्या कडकडाटात वाजत, गर्जत आणि सोसाट्याचा वारा घेऊन दुपारी किंवा सायंकाळी कोसळतो. काही काळ दमदार कोसळून, काही वेळेला मोठे नुकसान करून गायबही होतो. मोसमी पाऊस मात्र कमी-अधिक प्रमाणात बहुतांश वेळेला शांतपणे कोसळतो. कधी तो सकाळपासून पहाटेपर्यंत दीर्घकाळ म्हणजेच संततधारही धरून असतो. हा ढोबळ फरक कोणीही लक्षात घेऊ शकतो. पूर्वमोसमी पाऊस सुरू असतानाच अचानक पावसाचा बदललेला स्वभाव आणि समुद्रातून बाष्प घेऊन येणारी हवा, तिची दिशा, आवश्यक त्या प्रमाणात ढगांची निर्मिती, त्यांची दाटी आदी गोष्टी लक्षात घेऊनच त्या-त्या भागातील मोसमी पावसाचा प्रवेश जाहीर केला जातो.
केरळमधील प्रवेश कशामुळे जाहीर झाला?
अंदमानमध्ये १६ मे रोजी सर्वसाधारण वेळेच्या सहा दिवस आधीच दाखल झालेल्या मोसमी पावसाचा प्रवास रडतखडतच सुरू असला, तरी त्याने समुद्रातून १३ दिवसांचा प्रवास करून २९ मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला. त्यानुसार पावसाचा प्रवेश भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला. त्यानंतर त्याची प्रगती पुन्हा मंदावली. परिणामी केरळ प्रवेशाबाबत अनेक आक्षेप निर्माण झाले. मात्र, हा प्रवेश जाहीर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाच अटी पूर्ण झाल्याचा दावा तेव्हा आणि आताही केला जात आहे. अरबी समुद्रातून पश्चिमेकडून पूर्वेकडे समुद्रसपाटीपासून उंच आकाशात साडेचार किलोमीटरच्या जाडीत वाहणारे सागरी वारे, केरळच्या दिशेने जमिनीला समांतर ताशी ३० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, समुद्रात केरळ किनारपट्टीजवळ होणारी ढगांची मोठी गर्दी, केरळमधील १४ वर्षामापक केंद्रांपैकी दहा केंद्रांवर होणारी आवश्यक पावसाची नोंद आदी तांत्रिक गोष्टी पूर्ण झाल्या, की केरळमधील मोसमी पावसाचा प्रवेश जाहीर होतो. त्यानुसारच तो झाल्याचे सांगण्यात येते.
केरळ ते महाराष्ट्र प्रवासात नेमके काय झाले?
भारतीय हवामानाशास्त्र विभागाकडून मोसमी पावसाबाबत जाहीर करण्यात येणाऱ्या कोणत्याही अंदाजित तारखांमध्ये पुढे किंवा मागे चार दिवसांचा फरक गृहीत धरलेला असतो. मोसमी पावसाच्या केरळमधील प्रवेशाची तारीख यंदा २७ मे देण्यात आली होती. त्याचा प्रवेश २९ मे रोजी झाला. केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन दिवसांनी ३१ मे रोजी मोसमी पावसाने कर्नाटकमधील कारवारपर्यंत मजल मारली होती. त्या वेळी वाऱ्यांना वेग होता. समुद्रातून बाष्पही येत होते. त्यातून हवामानशास्त्र विभागाकडून महाराष्ट्र प्रवेशाची ५ जून ही तारीख जाहीर झाली. परंतु, त्यानंतर वातावरणात मोठे बदल होत गेले. समुद्राकडून भारताच्या भूभागावर येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग अचानक मंदावला. मोसमी पाऊस पुढे जाण्यासाठी आवश्यक असणारे कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय वाऱ्यांची प्रणालीही मंदावली. त्यातून पूर्वमोसमी पावसाचा अभाव निर्माण झाला. याच काळात उत्तरेकडून उष्णतेची लाट आली. या सर्व स्थितीत मोसमी पाऊस महाराष्ट्राकडे झेपावण्यास विलंब झाला.
आता महाराष्ट्रातील प्रवेश कशामुळे?
लहरी हवामानाच्या प्रतिकूल स्थितीमुळे मोसमी पाऊस अनेक दिवस कर्नाटकात कारवारपर्यंतच येऊन थबकला होता. ३१ मे रोजी कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यांत प्रवेश केल्यानंतर त्याचा प्रवास थांबला. गोवा-कोकणच्या उंबरठ्यावर येऊन तो अडखळल्याने चिंता व्यक्त केली जात होती. ३१ मेपासून ९ जूनपर्यंत म्हणजे तब्बल नऊ दिवस अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाचा प्रवास झाला नव्हता. परिस्थिती अनुकूल नसल्याने हवामानशास्त्र विभागाकडूनही त्याच्या प्रवासाबाबत या काळात कोणतेही भाकीत करण्यात आले नाही. मात्र, उत्तरेकडील उष्णतेची लाट निवळत असताना ९ जूनला समुद्रातील वाऱ्यांची स्थिती बदलली. मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त वारे भूभागाकडे येऊ लागले. त्यामुळे पुढील ४८ तासांत मोसमी पाऊस गोवा-कोकणात प्रवेश करेल, असे जाहीर करण्यात आले. त्यानुसार मोसमी पाऊस १० जूनला कोकणातून महाराष्ट्रात प्रवेशला.
महाराष्ट्रातील पुढील प्रगती कशी?
मोसमी वाऱ्यांनी १० जूनला दक्षिण कोकणातील वेंगुर्ल्यापर्यंत मजल मारली. त्याचबरोबरीने राज्याच्या बहुतांश भागात मोसमी पावसाने जोर धरला. मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला सध्या तरी पोषक वातावरण असल्याचे हवामानशास्त्र विभागाचे म्हणणे आहे. १२ जूनपर्यंत तो महाराष्ट्रातील इतर काही भागांत दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मोसमी पावसाच्या महाराष्ट्रातील प्रवेशाची सर्वसाधारण तारीख ७ जून, तर पाऊस संपूर्ण राज्यात दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख १० जून आहे. त्यामुळे आता तो महाराष्ट्र व्यापण्यास किती वेळ घेणार हे पहावे लागेल. मोसमी पाऊस महाराष्ट्रात सक्रिय झाला, तरी तो लगेचच सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात बरसणार नाही. जून महिन्यामध्ये महाराष्ट्रात काही भागात सरासरीच्या प्रमाणात पाऊस होणार असला, तरी अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. कोकणातील किनारपट्टीचा भाग, विदर्भात तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल. या महिन्यात उत्तर महाराष्ट्रात मात्र जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच दिला असल्याचेही लक्षात घेणे महत्त्वाचे ठरेल.