लखनऊमध्ये PUBG गेम खेळण्यास विरोध केल्याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने आईची गोळ्या घालून हत्या केली. त्याने त्याच्या १० वर्षांच्या लहान बहिणीला धमकावून आईचा मृतदेह तीन दिवस घरात लपवून ठेवला. वडिलांना आईच्या मोबाईलवरुन मेसेज पाठवत राहिला. या घटनेने लोक हैराण झाले आहेतच, पण त्याचवेळी मोबाईल गेम खेळणाऱ्या मुलांच्या धोकादायक व्यसनावरही नवे प्रश्न उपस्थित होत आहेत.
लखनऊमध्ये आईची हत्या करणारा मुलगा दिवसातून १२ तास आपल्या स्मार्ट फोनवर ऑनलाइन गेम खेळत असे. त्याला गेम खेळण्यापासून कोणीही रोखू नये म्हणून त्याने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेत असे. हा मुलगा दररोज त्याच्या घरच्यांशी भांडत असे कारण ते त्याला ऑनलाइन गेम खेळण्यापासून रोखण्यात येत होते. या मुलाकडून अनेकवेळा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्याने घर सोडण्याची धमकी दिल्याने त्याला मोबाईल परत करावा लागला होता.
या घटनेवरून, ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाने किती गंभीर समस्या निर्माण केली आहे, याची कल्पना येऊ शकते. त्याचप्रमाणे, हैदराबादमधील एका १६ वर्षांच्या मुलाला एका गेमची अॅडव्हान्स लेव्हल गाठायची होती, त्यासाठी त्याने आईच्या बँक खात्यातून ३६ लाख रुपये काढले. या मुलाच्या कुटुंबीयांना पहिल्यांदा वाटले की, आपली काही बँक फसवणूक झाली आहे. मात्र हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि सर्व व्यवहार तपासले असता प्रत्येक खेळाच्या पुढील स्तरावर जाण्यासाठी हा मुलगा दीड ते दोन लाख रुपये खर्च करत असल्याचे दिसून आले. अशाप्रकारे त्याने हळुहळु ३६ लाख रुपये उधळले होते. दरम्यान, ऑनलाइन गेमिंगमुळे आता आपल्या देशातील मुले आपल्याच घरात चोरी, पालकांच्या बँक खात्यातून पैसे काढून खून, अपहरण यांसारखे गुन्हे करत आहेत.
ऑनलाइन गेम खेळण्यासाठी अन्न आणि झोप सोडण्यास तयार
केंद्र सरकारने PUBG गेमवर भारतात बंदी घातली होती. मात्र आता दक्षिण कोरियाच्या एका कंपनीने हा गेम भारतात बदललेल्या नावाने लॉन्च केला आहे. भारतातील अनेक मुले ऑनलाइन गेमिंग अॅप्सच्या व्यसनात ही वाईटरित्या अडकली आहेत.
डीएनच्या वृत्तानुसार,२०२० मध्ये केलेल्या सर्वेक्षणात, २० वर्षांखालील ६५ टक्के मुले ऑनलाइन गेम खेळण्यासाठी अन्न आणि झोप सोडण्यास तयार आहेत. यासाठी अनेक मुले आपल्या आई-वडिलांचे पैसे लुटायलाही तयार असतात. एक काळ असा होता की मुले शाळेतून आली की मित्रांसोबत खेळायला जायची. कदाचित तुम्हीही तुमच्या लहानपणी शाळेतून आल्यावर उद्यानात खेळला असाल. त्याकाळी लपाछपीचा खेळ असायचा, खो-खो, कबड्डी, रस्सीखेच असे खेळ असायचे. त्यानंतर काळ बदलला आणि मुले शाळांमधील उपक्रमांपुरती मर्यादित राहिली. आज त्यांचा लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि मोबाईल फोन हे मुलांसाठी नवीन खेळाचे मैदान बनले आहे.
ऑनलाईन गेम्सचा व्यापार
सध्या आपल्या देशातील मुले दिवसातून सरासरी २१८ मिनिटे ऑनलाइन गेम खेळतात. यापूर्वी ही वेळ २४ तासांत सरासरी १५१ मिनिटे होती. जेव्हा २०२० मध्ये पहिल्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आले, तेव्हा पहिल्या काही महिन्यांत भारतात वेगवेगळ्या डिजिटल उपकरणांवर ७०० कोटींहून अधिक ऑनलाइन गेम सुरु करण्यात आले. २०१८ मध्ये, भारतात ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांची संख्या २६ कोटी ९० लाख होती, जी या वर्षाच्या अखेरीस ५१ कोटी होईल. २०१९ मध्ये, भारतातील ऑनलाइन गेमिंग उद्योग ८,३०० कोटी रुपयांचा होता, परंतु या वर्षी हा उद्योग २१ हजार कोटी रुपयांचा होईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील चित्रपटांचे जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शन ३ लाख २३ हजार कोटी आहे. तर जागतिक मोबाइल गेमिंग उद्योग साडेबारा लाख कोटींचा आहे.
मुलांमध्ये शारीरिक समस्यांची वाढ
आपल्या देशात ही सुरुवातीला ही समस्या फारशी गंभीर मानली जात नाही. पालकही ते फारसे गांभीर्याने घेत नाहीत. पण ऑनलाइन गेम मुलांचा शारीरिक आणि मानसिक ऱ्हास करत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. एका अहवालानुसार, कोविडनंतर भारतातील मुलांचे वजन चार ते पाच किलोग्रॅमने वाढले आहे. याचे कारण म्हणजे ऑनलाइन गेमिंगसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. दिवसभर एकाच ठिकाणी बसून हे खेळ खेळू शकता. याचा परिणाम मुलांच्या डोळ्यांवरही होत आहे. मुलांची झोपेची पद्धत बिघडली असून त्यामुळे त्यांची झोप कमी होत आहे. मुलांना भूक कमी लागत आहे.
एका अभ्यासात असेही आढळून आले आहे की ऑनलाइन गेम खेळणाऱ्या मुलांना इतर गोष्टी आवडत नाहीत. म्हणजेच, ते त्यांच्या पालकांशी बोलणे बंद करतात, ते वेगळे राहू लागतात. त्यांचा अभ्यासातही चांगली कामगिरी करु शकत नाहीत. त्यामुळे ऑनलाइन गेमिंग हे व्यसनच आहे. जर एखाद्या मुलाला व्यसनाधीनतेची सवय लागली, तर आपण काय बरोबर करतो आणि काय चूक करतो हे समजणे त्याच्यासाठी कठीण होते.
ऑनलाइन गेममुळे मुले हिंसेकडे आकर्षित
प्रत्येक गेममध्ये जसा जय-पराजय असतो, तसाच प्रकार ऑनलाइन गेममध्येही होतो. पण यात पैसा गुंतल्याने मुले हरली तर चिडचिडी होऊ लागतात आणि लहानपणापासूनच नैराश्यामध्ये जाण्याचा धोका असतो. याशिवाय ऑनलाइन गेममध्ये इतका हिंसाचार आहे की मुले हिंसेकडे आकर्षित होतात.
८०.४३ टक्के मुले रात्रंदिवस गेम्सच्या विचारात
मोबाईल गेम खेळणारी ९५.६५ टक्के मुले सहज तणावाखाली येतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ८०.४३ टक्के मुले रात्रंदिवस या गेमचा विचार करतात. शाळेतही त्यांना या ऑनलाईन गेमबाबतच विचार येत असतात. त्यांना ऑनलाइन गेममध्ये आपण मागे राहण्याची चिंता असते. केजीएमयूच्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. मानसिक आरोग्य विभागाचे डॉ.पवनकुमार गुप्ता यांनी ४६ मुलांवर संशोधन केले. ही मुले ऑनलाईन गेमच्या विळख्यात सापडली होती.
डॉ. पवन सांगतात की, ५६.५२ टक्के मुलांनी मोबाईल गेम्ससमोर त्यांचे जुने छंद सोडले. क्रिकेट, लुडो, बुद्धिबळ, पतंग उडवणं, उद्यानात खेळणं याचं वेड लागलेली मुले मोबाईल गेम्सचे व्यसन लागल्यावर सर्व विसरली. सध्या अशी परिस्थिती आहे की मुले आवडीच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींनाही नकार देतात. ५४.३४ टक्के मुले या गेममुळे खोटे बोलण्यात पटाईत झाली आहेत. हे गेम खेळण्यात मुलीही मागे नाहीत.
चीनकडून खूप काही शिकण्यासारखे
भारताला हवे असेल तर आज चीनकडून खूप काही शिकता येईल. भारताप्रमाणेच, चीन देखील ऑनलाइन गेमिंगसाठी एक मोठी बाजारपेठ आहे, परंतु गेल्या वर्षी चिनी सरकारने मुलांना त्याच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी नवीन नियम केले आहेत. त्यानुसार चीनच्या ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना हे सुनिश्चित करावे लागेल की मुलांना फक्त आठवड्यात तीन तासच ऑनलाइन गेम खेळता येईल. असे न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाईल. भारतातही याबाबत कठोर नियम बनवण्याची गरज आहे.