राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्राविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला गेला. भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटवावे तसेच त्यांनी राज्याची माफी मागावी, अशी मागणी सर्वपक्षीयांनी केली. सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर कोश्यारी यांना स्पष्टीकरणही दिले. दरम्यान, कोश्यारी यांच्या या वक्तव्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, मुंबईचा समावेश महाराष्ट्रात व्हावा म्हणून उभारण्यात आलेला लढा तसेच मुंबईतील गुजराती आणि मराठी माणसांचे संबंध यावर पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, मुंबईची कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून असलेली ओळख यावर प्रकाश टाकुया.
मुंबई शहरात राहणारा प्रत्येक नागरिक स्वत:ला मुंबईकर म्हणवून घेतो. मुंबईत वेगवेगळ्या जाती-धर्माचे, पथांचे लोक राहतात. मात्र सार्वजनिक ठिकाणी हे सर्व भेद नाहीसे होतात. असे असले तरी मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद खूप जुना आहे. १ मे १९६० रोजी बॉम्बे राज्याचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन द्विभाषिक राज्यांची निर्मिती करण्यात आली. भाषेच्या आधारावर हे विभाजन करण्यात आले होते. त्यामुळे गुजराती भाषिकांचे गुजरात तर मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. बॉम्बे राज्याची विभागणी होत असताना मुंबई हा केंद्रशाशित प्रदेश करावा किंवा मुंबईचा गुजरातमध्ये समावेश करावा, अशी मागणी केली गेली. मात्र महाराष्ट्रातील लोकांनी ही मागणी फेटाळत मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली जावी, अशी मागणी केली गेली.
हेही वाचा >> विश्लेषण : मद्यप्राशनाची सवय सर्वात धोकादायक का आहे? जाणून घ्या
मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली जावी, या मागणीचा पाठपुरावा संयुक्त महाराष्ट्र समितीने केला. या समितीमार्फत १९५६ साली मुंबईमध्ये एक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे तब्बल १०६ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला चालना मिळाली. मुंबई शहराच्या मध्यभागी असलेला हुतात्मा चौक या लढ्याचे प्रतिक आहे. या मोर्चानंतर १९५६ ते १९६० या काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक तीव्र झाली. तत्कालीन कम्यूनिष्ट आणि समाजवादी नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती व्हावी ही मागणी लावून धरली. या चळवळीचे नेतृत्व श्रीपाद अमृत डांगे, श्रीधर महादेव जोशी, नारायण गोरे, उद्धवराव पाटील, अण्णाभाऊ साठे, अमर शेख, प्रल्हाद केशव अत्रे, केशव सीताराम ठाकरे, पांडुरंग महादेव बापट, भाऊसाहेब राऊत, जी टी मधोळकर, माधुरी दंडवटे, वाय के सैनी, केशवराव जेधे या नेत्यांनी केले.
हेही वाचा >> विश्लेषण : मान्सूनवर देशाची अर्थव्यवस्था का अवलंबून आहे ?
मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतरही आता मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी नाही. मुंबई हे शहर मराठी अस्मितेचा केंद्रबिंदू नाही. उलट मुंबईवर आर्थिक तसेच सांस्कृतिक दृष्टीकोनातून गुजराती लोकांचे वर्चस्व आहे, असा समज पसवरण्यात येतो. याबाबत कम्यूनिष्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते प्रकाश रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भांडवलदार नेहमी वेगळ्या मुंबईची मागणी करत असतात. मुंबई महाराष्ट्रामध्ये राहण्याचे श्रेय येथील सामान्य माणसाला, संघर्ष करणाऱ्या वर्गाला जाते. या वर्गाचे नेतृत्व तेव्हा कम्यूनिष्ट तसेच समजावादी नेत्यांनी केले होते. दुर्दैवाने आजदेखील काही भांडवलदारांचे मुंबईवर नियंत्रण आहे. भांडवलदार आजदेखील मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचे काम करतात,” असे मत रेड्डी यांनी मांडले.
हेही वाचा >> विश्लेषण : ४९ किलो वजन असलेल्या मीराबाई चानूने ११३ किलो वजन कसे उचलले असेल? जाणून घ्या सविस्तर माहिती
मुंबई आणि राजकीय ध्रुवीकरण
मुंबई हे शहर सध्या महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असला आहे. मात्र येथे राजकीय दृष्टीकोनातून गुजराती आणि मराठी भाषिक असे ध्रुवीकरण पाहायला मिळते. मुंबईतील मराठी माणसाचे रक्षण करणारा पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिले जाते. तर येथील गुजराती मतदार भाजपाकडे वळलेला आहे. असे असले तरी मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून ओळखले जाते. याच कारणामुळे सर्वच पक्षांकडून मराठी, गुजराती तसेच इतर भाषिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी “खाओ जलेबी, फाफडा; उद्धव ठाकरे आपडा (जलेबी आणि फाफडा खा, उद्धव ठाकरे आपलेच आहेत)” असे घोषवाक्य घेऊन गुजराती लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा >> विश्लेषण : देशात किती खटले प्रलंबित? सर्वोच्च, उच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची संख्या किती? जाणून घ्या सविस्तर
मुंबई आणि येथील भाषेच्या आधारावर केल्या जाणाऱ्या ध्रुवीकरणारवर काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुंबईने सर्व वर्ग, धर्म तसेच वेगवेगळ्या जातीतील लोकांना सामावून घेतलेले आहे. मात्र या शहराची सर्वसमावेशकता मोडीत काढण्याचा काही लोकांचा छुपा अजेंडा आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान याच अजेंड्याचा एक भाग आहे. दोन समाजाला एमेकांविरुद्ध भडकवण्याचा हा प्रयत्न आहे. विभाजनाचे राजकारण हे मुंबईसाठी कायम हानिकारक राहिलेले आहे,” असे मत दलवाई यांनी मांडले.