अन्वय सावंत
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी आणि बलाढ्य संघ अशी ख्याती असलेल्या मुंबईला तब्बल ४७व्यांदा रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश आले आहे. उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात मिळवलेल्या आघाडीच्या बळावर मुंबईने स्पर्धेत आगेकूच केली. मात्र, केवळ या सामन्यातच नाही, तर मुंबईच्या संघाने यंदा संपूर्ण हंगामात वर्चस्वपूर्ण कामगिरी केली आहे. विविध खेळाडूंनी वेळोवेळी पुढे येत मुंबईला सामने जिंकून दिले आहे. मुंबईच्या याच यशाचा आणि अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीचा घेतलेला आढावा.
मुंबईने या हंगामात कशी कामगिरी केली आहे?
४१ वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबईला गेल्या काही हंगामांमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. यंदा मात्र अमोल मुझुमदारच्या मार्गदर्शनाखाली खेळताना मुंबईच्या संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात यश आले. मुंबईने गतविजेत्या सौराष्ट्रविरुद्धचा सलामीचा साखळी सामना अनिर्णित राखला. त्यानंतर त्यांनी गोवा (११९ धावांनी) आणि ओडिशा (एक डाव व १०८ धावांनी) यांच्याविरुद्ध मोठ्या विजयांची नोंद करत बाद फेरीचा टप्पा गाठला. साखळी फेरी आणि बाद फेरी यांच्यादरम्यान ‘आयपीएल’ झाल्याने तीन महिने रणजीचे सामने झाले नाहीत. मात्र, याचा मुंबईच्या खेळाडूंवर परिणाम झाला नाही. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत तुलनेने दुबळ्या उत्तराखंडच्या संघाला ७२५ धावांच्या विक्रमी फरकाने नमवत विजयी घोडदौड कायम ठेवली.
उपांत्य फेरीतील सामन्यावर कसे वर्चस्व गाजवले?
उपांत्य फेरीत मुंबईपुढे उत्तर प्रदेशचे आव्हान होते. प्रतिभावान फलंदाज आणि अनुभवी गोलंदाजांचा समावेश असलेल्या उत्तर प्रदेशने उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य कर्नाटकाला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला होता. मात्र, पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील मुंबईपुढे त्यांचा निभाव लागला नाही. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ३९३ धावांची मजल मारली. मग उत्तर प्रदेशला १८० धावांवर रोखत पहिल्या डावात २१३ धावांची आघाडी मिळवली. यानंतर त्यांनी पुन्हा उत्तर प्रदेशला फलंदाजी देणे टाळले. मुंबईने अखेरचे जवळपास अडीच दिवस फलंदाजी करताना दुसरा डाव ४ बाद ५३३ धावांवर घोषित केला. तोपर्यंत मुंबईकडे एकूण तब्बल ७४६ धावांची आघाडी होती. त्यानंतर सामना संपवण्यात आला आणि मुंबईने २०१७ नंतर पहिल्यांदा अंतिम फेरीचा टप्पा गाठला.
मुंबईच्या वाटचालीत कोणत्या खेळाडूंची महत्त्वाची भूमिका?
मुंबईला यंदा सांघिक खेळ करण्यात यश आले असले, तरी काही खेळाडूंची कामगिरी खास ठरली आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये मुंबईचा सर्फराज खान अव्वल स्थानावर आहे. त्याने पाच सामन्यांत ११३.८३च्या सरासरीने ८०३ धावा फटकावल्या असून यात तीन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याचा दुसरा डाव (१०३), तर उपांत्य फेरीतील सामन्याच्या दोन्ही डावांत (१०० आणि १८१) शतके साकारण्याची किमया साधली. त्याचा सलामीचा साथीदार आणि कर्णधार पृथ्वीनेही काही चांगल्या खेळी केल्या आहेत. त्याचप्रमाणे उपांत्यपूर्व फेरीत पदार्पणातच सुवेद पारकरने द्विशतक झळकावले. तर उपांत्य फेरीत हार्दिक तामोरे आणि अरमान जाफर यांनी शतके केली. गोलंदाजीत डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यंदा रणजीमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये मुलानी अग्रस्थानी आहे. त्याने पाच सामन्यांतच ३७ बळी घेतले आहेत. त्याने फलंदाज म्हणूनही प्रभावित केले आहे.
अंतिम फेरीत कोणत्या संघाचे आव्हान?
२२ जूनपासून बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम रंगणाऱ्या अंतिम सामन्यात मुंबईपुढे मध्य प्रदेशचे आव्हान असेल. मध्य प्रदेशने उपांत्य फेरीत बंगालवर १७४ धावांनी विजय मिळवला आणि २३ वर्षांनंतर रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली. मध्य प्रदेशला १९५३ सालानंतर रणजी करंडकावर आपले नाव कोरता आलेले नाही. त्यामुळे यंदा हा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, मुंबईचा संघही २०१६ नंतर पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे अंतिम सामना चुरशीचा होणे अपेक्षित आहे. त्यातच मुंबई आणि मध्य प्रदेशच्या संघाचे अनुक्रमे अमोल मुझुमदार आणि चंद्रकांत पंडित हे माजी मुंबईकर क्रिकेटपटू प्रशिक्षकपद भूषवत आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणता प्रशिक्षक बाजी मारणार, याकडेही चाहत्यांचे लक्ष असेल.