दोन वर्षांपासून करोना विषाणू संसर्गाने ग्रासलेल्या जगात आजवर सुमारे ३० कोटी रुग्णांना करोना संसर्ग झाला आहे. डेल्टा उत्परिवर्तनाने जगभर निर्माण केलेल्या करोना संसर्गाच्या महाकाय दुसऱ्या लाटेतून सावरून सगळे जग काहीसे पूर्वपदावर येताना सर्वात वेगवान संक्रमण करणाऱ्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तनाने जगाला पुन्हा एकदा वेठीस धरले आहे. जगभर ओमायक्रॉनची रुग्णसंख्या वणव्यासारखी पसरत असताना ओमायक्रॉनचे होणारे उत्परिवर्तन अधिक गंभीर असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कॅथरिन स्मॉलवूड कोण? त्या काय म्हणतात?
जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ कॅथरिन स्मॉलवूड यांनी ओमायक्रॉनचा वेगवान प्रसार नव्या आणि अधिक घातक उत्परिवर्तनाला निमंत्रण देणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. करोना विषाणूच्या आतापर्यंत दिसलेल्या उत्परिवर्तनांमध्ये विषाणूच्या काटेरी आवरणातील प्रथिनांमध्ये दोन प्रकारचे बदल झाल्याचे आढळले होते. ओमायक्रॉनच्या प्रथिनांमध्ये तब्बल ३२ प्रकारचे बदल झाले आहेत. त्यामुळे हे उत्परिवर्तन आतापर्यंत आढळलेल्या सर्व उत्परिवर्तनांपेक्षा वेगळे आहे. एकाच वेळी ते वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. दुसरीकडे त्याचा संसर्ग अद्याप सौम्य असल्याचे दिसत आहे. मात्र, ओमायक्रॉनमुळे होणाऱ्या संसर्गाचे नेमके स्वरूप कसे आहे, ते कसे बदलते याचा अंदाज येण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असेही वैद्यक क्षेत्राकडून सांगण्यात येत आहे.
उत्परिवर्तन नेहमी केवळ गंभीर असते का?
कोणत्याही विषाणूचे उत्परिवर्तन ही तहहयात सुरू राहणारी प्रक्रिया आहे. विषाणू स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी करत असलेल्या धडपडीतून त्याच्या मूळ स्वरूपामध्ये बदल होतात. करोना महासाथ सुरू झाल्यापासून करोना विषाणूची अनेक उत्परिवर्तने होताना दिसून आली आहेत. इन्फ्लूएन्झासारख्या अनेक वर्षे अस्तित्वात असलेल्या विषाणूमध्येही आजही सातत्याने उत्परिवर्तन होत असते. विषाणू तज्ज्ञांच्या मते, उत्परिवर्तन नेहमी गंभीरच असते असे नाही. आजपर्यंतचा इतिहास बघता कालांतराने प्रत्येक विषाणूमध्ये होणारे उत्परिवर्तन त्या विषाणूला अधिकाधिक सौम्य करणारे ठरले आहे. त्याच्या वाढीचा वेग मात्र लक्षणीय होत गेला आहे. त्यामुळे सध्या दिसणाऱ्या ओमायक्रॉनच्या वाढीचा वेग हा नव्या आणि अधिक गंभीर उत्परिवर्तनाला कारणीभूत ठरेल असे म्हणण्यासाठी कोणताही सबळ शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. उलट, आतापर्यंत जगभरातील मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येला होऊन गेलेला संसर्ग आणि लसीकरण यांमुळे आपल्या समूह रोगप्रतिकारशक्तीमध्ये, म्हणजेच हर्ड इम्युनिटीमध्ये वाढ झाली आहे. त्यावर मात करत विषाणूलाही जिवंत राहायचे असल्याने तो अधिक प्रसार करणारा, तरी सौम्य होत जाण्याचीच शक्यता अधिक आहे. असे असले तरी, कर्करोग, एचआयव्ही, अवयव प्रत्यारोपण अशा सहव्याधींमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या रुग्णांमध्ये विषाणू संसर्ग झाला असता त्यातून उद्भवणारी गुंतागुंत यामुळे नवीन आणि अधिक गंभीर उत्परिवर्तन येण्याचा धोका नाकारताही येत नाही.
नव्या उत्परिवर्तनाचा धोका किती?
ओमायक्रॉन उत्परिवर्तनाची सद्य:स्थिती पाहता आतापर्यंत येऊन गेलेल्या सर्व करोना उत्परिवर्तनांच्या तुलनेत त्याच्या वाढीचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत होणारी वाढ अक्राळविक्राळ आहे. साहजिकच त्यामुळे जगभर भीतीचे वातावरण आहे. मात्र, ओमायक्रॉनच्या रुग्णांना असलेली लक्षणे सौम्य आहेत, त्यामुळे हे रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण मर्यादित आहे. ज्या रुग्णांना वयानुरूप विविध असंसर्गजन्य आजारांचा इतिहास आहे त्यांच्यामध्ये ओमायक्रॉनमुळेही गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका नाकारता येत नाही. ओमायक्रॉनच्या वेगवान प्रसारामुळे नवे उत्परिवर्तन येईल का, त्याच्या वाढीचा वेग कसा असेल किंवा तो किती गंभीर असेल याबाबत वैद्यकीय वर्तुळाकडून कोणताही शास्त्रीय निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.
ही वावटळ रोखणार कशी?
ओमायक्रॉनच्या वाढीचा वेग पाहता जानेवारी महिन्याच्या अखेरीस रुग्णसंख्या प्रचंड असेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ८० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवणारे आणि त्या पार्श्वभूमीवर खबरदारी आणि तयारीचे आवाहन करणारे पत्र आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरामध्ये ही वावटळ रोखायची कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने करोना लशींच्या वर्धक मात्रा देणे आणि काही प्रमाणात निर्बंध हे पर्याय अमलात आणण्यास सुरुवात झाली आहे. ज्या देशांमध्ये वर्धक मात्रा लसीकरण सुरू झाले आहे, तेथेही ओमायक्रॉन आहेच. शिवाय हे लसीकरण केवळ संसर्गाची तीव्रता कमी राखण्यास मदत करणार आहे. रुग्णाला झालेला संसर्ग ओमायक्रॉन आहे, याचे वेगवान निदान करण्यासाठी करोना रुग्णांचे जनुकीय क्रमनिर्धारण वेगवान करणे अत्यावश्यक आहे. मात्र, जगातील बहुसंख्य देशांमध्ये तसे होताना दिसत नाही, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. तूर्तास, सौम्य उत्परिवर्तनाच्या वेगवान प्रसारातून नव्या आणि घातक उत्परिवर्तनाचा जन्म होतो किंवा होत नाही असे सांगणारा कोणताही शास्त्रीय पुरावा समोर नाही.