पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून यामध्ये प्रामुख्याने राज्यातील एका नावाची रंगली आहे ती म्हणजे नारायण राणे यांची. महाराष्ट्रातील ज्या चार नेत्यांनी मंत्रीपद मिळणार आहे त्यामध्ये नारायण राणे यांचं नाव आघाडीवर होतं. आज नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झालं. मात्र नारायण राणेंना मंत्रीमंडळामध्ये घेण्याचे भाजपाला बराच फायदा होणार आहे. नारायण राणे भाजपासाठी राज्यात महत्वाची भूमिका कशाप्रकारे बजावू शकतात आणि मंत्रीमंडळात त्यांच्या समावेशामुळे भाजपाला काय फायदा होणार त्याचसंदर्भातील हा लेख…
कट्टर शिवसेना विरोधक :
कोकणचा वाघ अशी प्रतिमा असलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास त्यांच्या स्वभावाप्रमाणेच आक्रमक आहे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. मुंबईतील चेंबूर येथील घाटला गावात राहणारे नारायण राणे शिवसेनेचे शाखाप्रमुख झाले आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरवात झाली. आक्रमकता आणि मातोश्रीशी असलेली निष्ठा या जोरावर नारायण राणे शिवसेनेत वेगाने एक एक पायरी चढत गेले. घाटला गावातील बाळासाहेबांचा हा लाडका शिवसैनिक मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेला. १९९० साली राणे पहिल्यांदा कणकवली मतदार संघातून निवडून आले आणि आमदार नारायण राणे झाले. पुढे १९९५ साली युतीचा सरकार आल्यावर त्यांच्याकडे दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय , उद्योग, विशेष सहाय्य आणि पुनर्वसन अशा खात्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार देण्यात आला.
नक्की पाहा >> PM Modi Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळातून ‘हे’मंत्री OUT; राज्यातील दोन मंत्र्यांचाही समावेश
१९९८ साली नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री झाले. १९९८ ते १९९९ या काळासाठी नारायण राणे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. बाळासाहेबांशी असलेली निष्ठा आणि कडवट शिवसैनिक हे दोन गुण त्यांना महाराष्ट्रातील सर्वोच्च पदापर्यंत घेऊन गेले. मात्र महत्त्वाकांक्षा राणे यांना स्वस्थ बसू देईनात. २००५ साली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सक्रिय प्रवेशानंतर अस्वस्थ असलेल्या राणे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून काँग्रेसचा हात पकडला. उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या मतभेदांमुळे राणेंनी शिवसेना सोडल्याचं सांगितलं जातं. उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपली दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी गेली, असे राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केलं आहे.
काँग्रेसनं त्यांना राज्याच्या उद्योगमंत्रीपदाची जबाबदारी दिली. मात्र अपेक्षित असलेलं मुख्यमंत्रीपद सतत हुलकावणी देत असल्यामुळे राणे यांची काँग्रेसमध्ये घुसमट सुरू झाली. त्यानंतर त्यांनी २०१७ साली स्वाभिमानी पक्षाची स्थापना केलेली. २०१८ साली भाजपाच्या पाठींब्याने ते राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये निलेश आणि नितेश या आपल्या दोन्ही मुलांसोबत भाजपामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर ते सातत्याने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत असल्याचं चित्र दिसत आहे. मागील काही काळापासून करोना परिस्थिती हाताळ्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याची टीका राणेंकडून केली जात आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपाच्या निशाण्यावर आहे. अशा परिस्थितीमध्ये नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद दिल्याने अधिक सक्षमपणे शिवसेनेला विरोध करता येणार आहे.
नक्की वाचा >> शेतकऱ्याचा मुलगा ते केंद्रीय मंत्री; जाणून घ्या लातूरचे डॉ. कराड आहेत तरी कोण?
मराठा समाजाचा चेहरा :
महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटलेलं असतानाच महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणी वाढल्याचं चित्र दिसत आहे. हा विषय आगामी निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणात चर्चेत राहण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी रोकठोकमध्ये आपली मतं मांडत सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. अनेकदा या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही त्यांनी निशाणा साधलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राणेंनी थेट संभाजीराजे छत्रपतींवरही टीका केली होती.
नक्की वाचा >> Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ ४३ मंत्र्यांचा झाला समावेश, पाहा संपूर्ण यादी
“छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. खासदारकीची मुदत संपत आली की आंदोलनाची, राजीनामा देईन, पक्ष काढेन अशी भाषा सुरु आहे. छत्रपती संभाजीराजे कोकणात आले? कधी कुठे आले, मला भेटले नाही. मला समजलं असतं तर मी स्वागत केलं असतं, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आरक्षण मिळत नाही आणि असं पुढारी होत नसतात. राजे हे समाजानं म्हणावं लागतं. आता टर्म संपत आल्यावर राजेंनी राजीनामा देऊ नये. राजे फिरताहेत पण रयत दिसत नाही आजूबाजूला. राजांना रयत भेटायला येते हे का फिरतायत”, अशी टीका नारायण राणेंनी केली. यावर “छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे आणि ताकदच पहायची असेल, तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.” असं उत्तर संभाजीराजे छत्रपतींनी दिलं होतं.
छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू.
ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 4, 2021
अशा परिस्थितीमध्ये मराठा तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपाला नारायण राणेंची मदत होऊ शकते. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाची शिफारस सर्वात आधी राणे अध्यक्ष असणाऱ्या समितीने केली होती.
मुंबई महानगरपालिका निवडणूक :
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकींवरही राणे मंत्रीमंडळात गेल्याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. पुढील वर्षी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. मागील २६ वर्षांपासून मुंबई माहानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. यंदा मात्र भाजपा शिवसेनेला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. या निवडणुकीची जबाबदारी अतुल भातखळकर यांच्यासारख्या मराठा समाजाच्या नेत्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळेच नारायण राणेंना मंत्रीमंडळात दिलेलं स्थान हे पुढील वर्षीच्या या निवडणुकीवर परिणाम करु शकतं, असं मानलं जात आहे.
नक्की वाचा >> सरपंच ते केंद्रीय मंत्री…! NCP मधून BJP उडी अन् थेट केंद्रात वर्णी; जाणून घ्या कपिल पाटलांबद्दल
भाजपामध्ये येणाऱ्यांचा सन्मान :
निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपाची सत्ता राज्यात येईल असं चित्र दिसत होते. मात्र शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्री पदावरुन झालेल्या वादानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केली. त्यानंतरही राज्यातील अनेक महत्वपूर्ण पदं ही आजही भाजपाच्या निष्ठावान नेत्यांकडेच आहेत. सध्या भाजपामध्ये ज्या नेत्यांनी प्रवेश केलाय त्यांना सत्ता नसतानाही योग्य सन्मान दिला जात आहे, असा संदेश देण्यासाठी राणेंना दिलेली मंत्रीपदाची जबाबादरी भाजपाला फायद्याची ठरु शकते.
७ फेब्रवारी २०२१ रोजी खासदार नारायण राणे यांच्या लाइफ टाइम मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ओरस पडवे येथे आले होते. या उद्घाटन प्रसंगी शाह यांनी दिलेल्या भाषणामध्ये राजकीय टोलेबाजी करण्याबरोबरच राणे यांचं कौतुकही केलं होतं. अनेकजण नारायण राणे यांच्या नेतृत्वासंदर्भात वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. मात्र जेव्हा मी नारायण राणे यांच्याकडे पाहतो तेव्हा मला त्यांच्यामध्ये जेथे जेथे अन्याय होतो तेथे ठामपणे भूमिका घेणारा आणि स्पष्टपणे बोलणारा नेता दिसतो, अशा शब्दांमध्ये अमित शाह यांनी नारायण राणेंचं कौतुक केलं होतं. पुढे बोलताना त्यांनी, सार्वजनिक आयुष्यामध्ये हे खूप महत्त्वाचं असतं कारण जी व्यक्ती स्वत:विरोधात होणाऱ्या अन्यायाविरोधात लढू शकत नाही ती जनतेविरुद्धच्या अन्यायाविरोधात आवाज उठवू शकत नाही असं म्हटलं होतं. जेव्हा जेव्हा नारायण राणे यांच्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं त्यांना वाटलं त्यांनी भविष्याचा जास्त विचार न करता त्या अन्यायाविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळेच राणेंच्या राजकीय प्रवासामध्ये फार वळणं असल्याचं दिसून येतं , असं शाह म्हणाले होते.
नक्की वाचा >> स्टॅनफोर्डमधून MBA ते केंद्रीय मंत्री; जाणून घ्या ज्योतिरादित्य शिंदेंचा प्रवास
Proud pic.twitter.com/WNqq9vrUCR
— nitesh rane (@NiteshNRane) February 8, 2021
नारायण राणेंवर तुमच्या पक्षाकडूनही अन्याय झाला तर काय करणार?, असा प्रश्न मला काही पत्रकारांनी विचारल्याचंही शाह यांनी या भाषणात म्हटलं. या प्रश्नाला उत्तर देताना, “मी त्यांना राणेंवर भाजपामध्ये अन्याय होणार नाही,” असं सांगितल्याचंही शाह यांनी नमूद केलं. भारतीय जनता पार्टीला नारायण राणेंसारख्या नेत्याला कशाप्रकारचा सन्मान द्यायचा आणि त्यांचा मान कसा राखायचा हे ठाऊक आहे असंही शाह यांनी यावेळी सांगितलं. भाजपा नारायण राणेंवर अन्याय करणार नाही. राणेंचा निश्चित सन्मान पक्षाकडून केला जाईल. तसेच कसा सन्मान करायचा याचा निर्णय पक्ष घेईल, असे अमित शाह यावेळी म्हणाले होतं.
नक्की वाचा >> महाराष्ट्रातील दोन बड्या मंत्र्यांना मोदींच्या मंत्रीमंडळातून डच्चू
मोठा जनाधार असणारा नेता :
मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये आधीच नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, रामदास आठवलेंसारख्या नेत्यांनी मंत्रीपद संभाळले आहे. या मंत्र्यांपैकी नितीन गडकरी वगळता मोठा जनाधार असणारा एकही नेता केंद्रात नाहीय. दानवेंचा प्रभावही त्यांच्या मतदारसंघापुरताच मर्यादीत आहे. तर नुकताच राजीनामा दिलेले जावडेकर, संजय धोत्रे हे मोदींच्या कृपेने मंत्रीमंडळात होते. अशातच नारायण राणेंसारखा चेहरा थेट केंद्रामध्ये घेतल्याने राज्यातील जनाधार असणाऱ्या नेत्याची संख्या वाढण्याबरोबरच राज्यावरील पकड मजबूत होण्यास मदत होईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच राणेंना मंत्री बनवल्याने महाराष्ट्रात आणि खास करुन कोकणामध्ये जो शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो तिथे जम बसवण्यास मदत होईल असा अंदाज बांधण्यात आला आहे.