दत्ता जाधव
केंद्र सरकारने ४ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली आहे. हे मंडळ कसे काम करणार आहे, मसाले मंडळात हळदीचा समावेश असतानाही वेगळे मंडळ स्थापन करण्याची गरज भासली, त्याविषयी..
राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना का?
सरकारने नुकतेच स्थापन केलेले राष्ट्रीय हळद मंडळ देशातील हळद आणि हळद उत्पादनांच्या विकास आणि वाढीवर लक्ष केंद्रित करणार आहे. ते हळदीशी संबंधित सर्वच बाबतीत पुढाकार घेऊन भूमिका बजावणार आहे. हळद क्षेत्राचा विकास आणि वृद्धीसाठी मसाले मंडळ आणि इतर सरकारी संस्थांमध्ये समन्वय साधून विविध योजनांची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करण्याचे कामही ते करणार आहे.
हेही वाचा >>>‘मानसिक क्रूरते’मुळे शिखर धवनचा घटस्फोट मंजूर; क्रूरतेचे प्रकार काय आणि कायदा काय सांगतो?
हळद मंडळात कोणाचा सहभाग असेल?
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय हळद मंडळाचे काम केंद्र सरकारने नियुक्त केलेले अध्यक्ष पाहणार आहेत. आयुष मंत्रालय, केंद्र सरकारचा औषधनिर्माण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील सदस्य, तीन राज्यांतील राज्य सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी (फिरत्या तत्त्वावर), संशोधनात सहभागी असलेल्या राष्ट्रीय/राज्यस्तरीय निवडक संस्था, हळद उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार यांचे प्रतिनिधी आणि वाणिज्य विभागाद्वारे नियुक्त केलेले सचिव यांचा समावेश या राष्ट्रीय हळद मंडळात असेल.
राष्ट्रीय हळद मंडळ नेमके काय करणार?
हजारो वर्षांपासून जगभरात हळदीचा वापर होतो. तरीही जगभरात हळदीबाबत जागरूकता वाढविणे, हळदीचा दैनंदिन आयुष्यात वापर वाढविणे आणि निर्यातीला चालना देणे यासाठी हे राष्ट्रीय हळद मंडळ काम करणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन बाजारपेठ विकसित करणे, नवीन उत्पादनांचे संशोधन आणि विकासाला चालना देणे यासाठी हे मंडळ काम करेल. हळदीविषयीच्या आपल्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारावर हळदीचे मूल्यवर्धन करणे, मूल्यवर्धित उत्पादने विकसित करणे, मूल्यवर्धित उत्पादनांसाठी बाजारपेठ शोधणे आदी कामेही हळद मंडळ काम करेल. त्यासाठी हळद उत्पादकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या क्षमतांचा, कौशल्यांचा विकास करणे यावर भर दिला जाणार आहे.
हेही वाचा >>>सायबर क्राईमचे बळी ठरला आहात? तक्रार कुठे आणि कशी कराल?
हळद मंडळ का महत्त्वाचे?
भारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक देश आहे. सन २०२२-२३ मध्ये भारतातील २० पेक्षा जास्त राज्यांत ३.२४ लाख हेक्टर क्षेत्र हळद लागवडीखाली होते. देशातील एकूण हळदीचे (३० पेक्षा जास्त जाती) उत्पादन ११.६१ लाख टनांवर गेले आहे. जगातील एकूण हळद उत्पादनापैकी ७५ टक्क्यांहून जास्त हळद उत्पादन भारतात होते.
जागतिक व्यापारात भारताची भूमिका?
हळदीच्या जागतिक व्यापारात भारताचा वाटा ६२ टक्क्यांहून जास्त आहे. सन २०२२-२३ मध्ये ३८० पेक्षा जास्त निर्यातदारांनी २०७.४५ दशलक्ष डॉलर किमतीची १.५३४ लाख टन हळद आणि हळदीची उत्पादने निर्यात केली आहेत. बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, रशिया आणि मलेशिया हे देश भारतीय हळदीचे प्रमुख ग्राहक आहेत. राष्ट्रीय हळद मंडळाने २०३० पर्यंत हळदीची निर्यात एक अब्ज डॉलरवर पोहोचविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
हेही वाचा >>>दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण काय आहे? ‘आप’ नेत्यांवर ईडीने कोणते आरोप केले आहेत?
हळद उत्पादनात महाराष्ट्रात कुठे?
प्रामुख्याने तेलंगणा, महाराष्ट्र, तमिळनाडू, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, इ. राज्यांत हळदीचे उत्पादन घेतले जाते. सन २०१९-२० मध्ये देशात हळद पिकाखाली एकूण २.१८ लक्ष हेक्टर क्षेत्र होते. त्यापैकी ०.५५ लक्ष हेक्टर क्षेत्र फक्त महाराष्ट्रात होते. महाराष्ट्र हे तेलंगणानंतर हळद पिकाखालील क्षेत्रानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. सन २०२१-२२ मध्ये राज्यात हळद लागवडीखालील एकूण क्षेत्र सुमारे ८४०६६ हेक्टर होते. त्यापैकी एकटय़ा हिंगोलीत ४९७६४ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड झाली होती. त्याखालोखाल नांदेड (१३१३१ हेक्टर), वाशिम (४१४९ हेक्टर), यवतमाळ (३,७३६ हेक्टर), परभणी (३१५१ हेक्टर), सातारा (१७८८ हेक्टर), बुलडाणा (१७६३ हेक्टर), जालना (१०७७ हेक्टर), जळगाव (९८४ हेक्टर), चंद्रपूर (७८७ हेक्टर), सांगली (७७४ हेक्टर), गोंदिया (३८२ हेक्टर), भंडारा (३७५ हेक्टर) आणि नागपूर (३५१ हेक्टर) असा जिल्हावार लागवडीचा क्रम लागतो. आजवर हळदीसाठी प्रसिद्ध असलेला सांगली जिल्हा हळदीच्या लागवड क्षेत्राचा विचार करता अकराव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.