पृथ्वी एक तप्त गोळा होती, कालांतराने थंड होत गेली, निसर्गाने एक प्रकारे चमत्कार घडवत जीवसृष्टी जन्माला घातली. त्यातही सर्वप्रथम जीव हा पाण्यात निर्माण झाला आणि मग काळाच्या ओघात जमिनीवर आला असा एक सिद्धांत आहे. पृथ्वीवरील जमीन आता विविध खंडात विभागली गेली आहे. पण हे विविध खंड कसे निर्माण झाले याबाबत अनेक वर्ष संशोधन सुरु आहे. यापैकी एक सर्वसान्य सिद्धांत हा आहे की एका मोठ्या उल्केच्या धडकेमुळे खंड निर्माण होण्याची प्रक्रिया सुरु झाली. पण नेमकं हे कधी झालं याबाबात अंदाज वर्तवले जात होते. आता याबाबत ठोस पुराव्यानिशी माहिती उपलब्ध झाली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या Curtin’s School of Earth and Planetary Sciences या संशोधन संस्थेमधील प्राध्यापक डॉ टीम जॉन्सन यांचा एक लेख ‘नेचर’ (Nature) या मासिकात १० ऑगस्टला प्रसिद्ध झाला आहे. एक अब्ज वर्षांपूर्वी मोठ्या उल्केच्या आघातामुळे खंड निर्मितीची प्रक्रिया सुरु झाली असा दावा या लेखात करण्यात आला आहे. जॉन्सन यांच्या म्हणण्यानुसार “ऑस्ट्रेलियाच्या वायव्य भागात असलेल्या Pilbara Craton या भागातील झिरकॉन या मुलद्रव्याच्या स्पटिकांचा अभ्यास केला. तेव्हा असं लक्षात आलं की या स्फटिकांनी पृथ्वीचा एक अब्जापूर्वीचा इतिहास जणू जतन करुन ठेवला आहे.”
या झीरकॉन स्पटिकांत असलेल्या ऑक्सिजनच्या समस्थानिकांचा अभ्यास केला असता अशनीच्या आघातामुळे खडक वितळण्याची प्रक्रिया सुरु झाली. जमिनीच्या वरच्या थरापासून हे काही खालच्या थरांमध्ये वितळण्याचे प्रमाण हे कमी होत गेलं आहे. या सर्व स्फटिकांचे वय काढलं असता ते पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतरचा कालखंड दाखवत असल्याचं दिसून येतं आहे. साधारण पाच अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली असावी असा अंदाज आहे. तेव्हा पृथ्वी निर्माण झाल्यावर एक अब्ज वर्षानंतर महाकाय असावा उल्का आघात झाला असावा असा अंदाज या संशोधनातून दाखवण्यात आला आहे.
या महाकाय उल्केच्या आघातामुळे पृथ्वीचा सर्वात वरचा स्तर हा मुळापासून हलला आणि उष्णतेमुळे वितळला. जिथे उष्णात जास्त तिथे वितळण्याचे प्रमाण जास्त. त्यामुळे त्या ठिकाणी खंड निर्मितीची प्रक्रिया सुरु झाली असा अंदाज आहे.
खंड निर्मितीचे महत्व काय?
खंड निर्मितीमुळे जैवविधता निर्माण होण्यास खऱ्या अर्थाने मदत झाली आहे. खंडांमुळे विविध भौगौलिक रचना निर्माण झाल्या आणि त्याला अनुसरुन जैवविविधता बहरली. विविध प्रकारचे हवामान निर्माण होण्यास एक प्रकारे मदतही झाली. एवढंच नाही तर या खंडांमुळे माणसाने समुद्र पल्याड प्रवास करत नवे शोध लावले, माणसाची वेगाने प्रगती होण्यास याच खंडामुळे हातभार लागला असं म्हटलं तर चुकीचे होणार नाही.