आखाती देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर रविवारी भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेत पक्षाच्या दोन प्रवक्त्यांना निलंबित केले. इस्लाम व प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात अवमानकारक शब्द वापरल्याबद्दल सध्या देशातच नाही तर जगभरात या घटनेवर प्रतिक्रिया उमटत आहेत.
भाजपा हा स्वयंशिस्त असलेला कॅडर बेस्ड पक्ष मानला जातो आणि या पक्षाची स्वत:ची घटना आहे. राष्ट्रीय प्रवक्ता असलेल्या नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करताना पक्षाच्या घटनेतील १०(अ) या कलमाचा दाखला देण्यात आला आहे.
शर्मा यांना लिहिलेल्या पत्रामध्ये भाजपाच्या राष्ट्रीय शिस्तपालन समितीचे सदस्य ओम पाठक यांनी म्हटले आहे की, “विविध विषयांवरील पक्षाच्या मतांच्या विपरीत मते तुम्ही व्यक्त केली असून हे पक्षाच्या घटनेच्या १०(अ) या कलमाचा भंग करणारे आहे. तुमच्या विरोधातील चौकशी पूर्ण होईपर्यंत, तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात येत आहे तसेच पक्षातून त्वरीत निलंबित करण्यात येत आहे.”
भाजपाच्या घटनेतील धर्म
भाजपाच्या घटनेतील दुसरे कलम पक्षाचे उद्दिष्ट स्पष्ट करते. जनता पार्टीच्या विघटनानंतर स्थापन झालेल्या भारतीय जनसंघाने १९८० च्या सुमारास हे कलम तयार केले. भाजपाचे उद्दिष्ट अथवा ध्येय काय आहे: “लोकशाही असलेले राष्ट्र निर्माण करणे पक्षाचे ध्येय आहे. जात, धर्म, लिंग काहीही असो; राजकीय, आर्थिक व सामाजिक न्याय देणे, समान संधी देणे व धर्म व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देणे या सगळ्याची हमी पक्ष घेईल.”
भाजपाच्या घटनेत ३४ कलमांचा समावेश आहे. पक्षाच्या सदस्यत्वाचा अर्ज भरताना, प्रत्येकाला एक शपथ घ्यावी लागते, “सेक्युलर देशाच्या कल्पनेला व धर्मावर आधारित नसलेल्या देशाला मी मान्यता देतो… पक्षाच्या घटनेशी, नियमांशी व शिस्तीशी मी बांधील राहीन.”
पक्षाचे नियम
कलम २५-५ नुसार: “राष्ट्रीय कार्यकारिणी शिस्तपालन समितीसाठी शिस्तभंगाच्या संदर्भात वेगवेगळ्या स्तरांवर नियम आखेल. नियम घटनेच्या शेवटी नमूद करण्यात आले आहेत. शिस्तभंग झाल्यास काय कारवाई करण्यात येईल याची यादीही देण्यात आली आहे. सहा प्रकारची शिस्तभंगे नमूद करण्यात आली आहेत.”
भाजपाच्या घटनेतील नियम १० (अ)
सदस्यांना शिस्त लावण्यासाठी नियम १० पक्षाच्या अध्यक्षांना विशेष हक्क बहाल करते. हा नियम सांगतो, “राष्ट्रीय अध्यक्षाला उचित वाटल्यास तो कुठल्याही सदस्याला निलंबित करू शकतो तसेच त्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करू शकतो.” या नियमांतर्गत चौकशी करण्याआधीच शर्मा यांना निलंबित करण्यात आले.
शिस्तभंग काय हे सांगितलंय: “पक्षाच्या निर्णयाविरोधात अथवा कार्यक्रमाविरोधात प्रोपगंडा करणे.” पाचपेक्षा जास्त सदस्यसंख्या नसलेली शिस्तपालन समिती गठित करण्याबरोबरच आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्यांवरच शिस्तपालन समितीला कारवाई करण्यात येईल हे ही नमूद करण्यात आले आहे.
तक्रार मिळाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राज्यातील अध्यक्ष संबंधित सदस्यास निलंबित करू शकतो व या आदेशानंतर एका आठवड्याच्या आत कारणे दाखवा नोटीस बजावू शकतो. अशा व्यक्तीस प्रतिवाद करण्यासाठी कमाल दहा दिवसांची मुदत दिली जाते. पंधरा दिवसांच्या आत समितीने अध्यक्षांना अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
नुपूर शर्मांवर भाजपाच्या घटनेतील या तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे.