रवींद्र पाथरे
‘जोवर एखादा माणूस समोर काहीतरी करतो आहे आणि दुसरा ते कुतूहलाने न्याहाळतो आहे, तोवर नाटक जिवंत राहणार आहे…’ असे ‘थिएटर मॅजिक’ची भूल पडलेले तमाम रंगकर्मी मानतात… यावर विश्वास ठेवतात. परंतु याच्या अगदी उलट विधान काही वर्षांमागे पं. सत्यदेव दुबे यांनी केलं होतं : ‘थिएटर मर चुका है.’ प्रेक्षकांनी थिएटरकडे फिरवलेली पाठ हे जसं त्याचं एक कारण होतं, तसंच नाट्यक्षेत्रातील त्यांना डाचणाऱ्या काही गोष्टीही या उद्विग्नतेमागे होत्या. परंतु गंमत अशी की त्यानंतरही दुबेजी थिएटर करतच राहिले. रिकाम्या अवकाशात आपल्या सर्जनशील जादूने विस्मयचकित करणारं काहीतरी निर्माण करण्याची ओढ आणि असोशी त्यामागे होती, हे निश्चित. अशीच रिकाम्या अवकाशाची भूल पडली होती २०व्या शतकातील सर्वश्रेष्ठ नाट्य दिग्दर्शक पीटर ब्रुक यांना. नुकतेच त्यांचे निधन झाले. यानिमित्त या अवलियाच्या कारकिर्दीचा घेतलेला वेध –
या नाट्यउद्रेकाचा आरंभबिंदू कोणता होता?
पीटर ब्रुक यांना नाटकाच्या या भुताने फार लहानपणीच पछाडलं होतं. अवघे सात वर्षांचे असताना त्यांनी आपल्या माता-पित्यासमोर चार तासांचं लुटुपुटूचं ‘हॅम्लेट’ सादर केलं होतं. पुढे ऐन तरुण वयात वयाच्या २१ व्या वर्षी (१९४६ साली) त्यांनी एका नाट्यमहोत्सवासाठी शेक्सपीअरच्या ‘लव्हज् लेबर्स लॉस्ट’चं पुनरुज्जीवन केलं. या महोत्सवाचे संचालक होते सर बॅरी जॅक्सन. त्यांचं लक्ष पीटर ब्रुक यांच्या या नाटकानं वेधून घेतलं होतं. ‘मला माहीत असलेला हा सर्वांत तरुण भूकंप आहे!’ असं त्यांचं वर्णन जॅक्सन यांनी तेव्हा केलं होतं. त्यांच्या सादरीकरणातलं ताजेपण व धाडस त्यांना प्रचंड भावलं होतं. जॅक्सन यांनी त्यांना त्यांच्या बर्मिंगहॅम रेपर्टरी थिएटरमध्ये येण्याचं आवतन दिलं आणि तिथून पीटर ब्रुक यांचा नाट्यप्रवास सन्मार्गी लागला.
प्रस्थापित नाट्यतत्त्वांना ब्रुक यांनी कसा धक्का दिला?
पीटर ब्रुक यांनी शेक्सपीअर, जॉर्ज बर्नार्ड शॉ, ब्रेख्त, सार्त्र, चेकॉव्ह अशा निरनिराळ्या धारणांच्या लेखकांची नाटकं दिग्दर्शित केली. लॉरेन्स ऑलिव्हिए, विवियन ली, जॉन गिलगुड, पॉल स्कोफिल्ड, ग्लेन्डा जॅक्सन अशा तालेवार मंडळींसोबत काम करणारे ब्रुक यांनी आपल्या शर्तींवर या मंडळींना हाताळलं. ‘स्थळ : दिवाणखाना’ हा पारंपरिक शब्द त्यांनी नाटकातून मोडीत काढला. त्यासाठी त्यांनी स्टेडियम, खाणी, शाळा, बंद पडलेले कारखाने अशा कुठल्याही ठिकाणी नाटक सादर करण्याचा जगावेगळा ‘प्रयोग’ धाडसाने केला. त्याचबरोबर जगभरातील नाना वंश, वर्ण आणि प्रदेशांतील नटांना एकत्र घेऊन स्थानिक काळ आणि अवकाशाचे संदर्भ साफ पुसून टाकत त्यांनी एका नव्या, अनोख्या कालावकाशातील नाटक सादर केलं… जे या साऱ्या सीमा उल्लंघून रसिकांपर्यंत पोहोचू शकले. प्रकाश, शब्द, इम्प्रोव्हायझेशन्स आणि अभिनय यांच्या समन्वित मेळातून त्यांना जे सांगायचं असे ते, ते आपल्या नाटकांतून बिनदिक्कतपणे पेश करीत. कालातीत भारतीय महाकाव्य म्हणून गणल्या जाणाऱ्या ‘महाभारता’चं तब्बल नऊ तासांचं प्रयोगरूप सिद्ध करून त्यांनी त्याचे जगभर सर्वत्र प्रयोग केले. त्यांच्या या प्रचंड धाडसाची सबंध जगाने विस्फारित नेत्रांनी तारीफ केली. ‘ए मिडसमर नाइट्स ड्रीम’ या शेक्सपीअरच्या नाटकाचा वेगळ्याच फॉर्ममधला त्यांचा प्रयोगही जगभर वाखाणला गेला. ‘मी कुठल्याही रिक्त जागेत नाटक उभं करू शकतो…’ हा त्यांचा जबर आत्मविश्वास त्यांनी सार्थ करून दाखवला. यावर आधारित ‘द एम्प्टी स्पेस’ हे त्यांचं स्वानुभवांवर आधारित पुस्तक नाट्यकर्मींनी बायबलसारखं डोक्यावर घेतलं. वर्कशॉप्सद्वारे त्यांनी आपलं हे नाट्यतत्त्व नाट्यकर्मींपर्यंत पोहोचवण्याचे सायासही केले.
परंतु तरीही ते सामान्य प्रेक्षकांपर्यंत का पोहोचू शकले नाहीत?
असं असलं तरी सर्वसामान्य प्रेक्षकांना आवडतील, खिळवून ठेवतील अशी प्रेक्षकानुनयी नाटकं त्यांनी कधीच केली नाहीत. त्यामुळे नाट्यवर्तुळात जरी ते भीष्माचार्य म्हणून ओळखले जात असले तरी सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत मात्र ते पोहोेचले नाहीत. परंतु त्यांना याची बिलकूल खंत नव्हती.