गांबियामध्ये भारतात तयार झालेल्या खोकल्याच्या औषधांमुळे ६६ लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या औषधांबाबत इशारा जाहीर केला आहे. डब्ल्यूएचओच्या या इशाऱ्यानंतर भारतात केंद्र सरकारने या औषधांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच ही औषधं निर्माण करणाऱ्या कंपनीची चौकशीही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर गांबियात लहान मुलांच्या मृत्यूचं कारण ठरल्याचा संशय असलेली खोकल्याची औषधं कोणती, ही औषधं नेमकी कोठे तयार होतात, त्याच लहान मुलांवर काय परिणाम होतो आणि जागतिक आरोग्य संघटनेने काय इशारा दिला आहे याचा हा आढावा…
गांबियात ६६ मुलांचा जीव घेतल्याचा संशय असणारी औषधं हरियाणातील एका औषध निर्मिती कंपनीत तयार झाली आहेत. या कंपनीचं नाव मेडेन फार्मास्युटिकल्स असं आहे. त्यांनी तयार केलेल्या चार खोकल्याच्या औषधांमुळे विषबाधा होऊन मुलांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्यामुळेच या चारही औषधांचे नमुने तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचे अहवाल आल्यानंतरच औषधात नेमके कोणते विषारी घटक आहेत हे स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे केंद्र सरकारला जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचीही प्रतिक्षा आहे.
जागतिक आरोग्य संघटना काय म्हणाली?
WHO ने म्हटलं, “गांबियातील ६६ मुलांचा मृत्यू होण्यामागे भारतात तयार झालेल्या चार औषधांचा संशय आहे. ही औषधं मेडेन फार्मास्युटिकल्सने बनवली आहेत. जागतिक आरोग्य संघटना ही कंपनी आणि केंद्र सरकारशी समन्वय करून तपास करत आहे. या औषधांमुळे झालेले मृत्यू अत्यंत दुःखद आहेत. औषध कंपनीकडून औषधाची सुरक्षितता आणि गुणवत्ता याबाबत WHO चं समाधान झालेलं नाही. ही औषधं पश्चिम आफ्रिकेशिवाय जगातील इतर भागातही वितरित झाल्याचा धोका आहे. या औषधांचा किडनीला गंभीर जखमा होऊन ६६ मुलांच्या मृत्यूशी संबंध असू शकतो.”
असं असलं तरी अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून मुलांच्या मृत्यूबाबतचे अहवाल केंद्र सरकारला मिळालेले नाहीत. त्यामुळे अहवाल आल्यानंतरच या प्रकरणी अधिक स्पष्टता येणार आहे.
केंद्र सरकारचं म्हणणं काय? भारतात या औषधांची विक्री होते?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या सर्व घटनाक्रमानंतर निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलं आहे, “राज्य औषध नियंत्रकांनी संबंधित कंपनीला चार औषधांच्या केवळ निर्यातीसाठी परवानगी दिली होती. यात प्रोमेथाजिन ओरल सॉल्यूशन बीपी, कोफेक्सनालिन बेबी कफ सिरप, माकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरपचा समावेश आहे. भारतात विक्रीसाठी या औषधांनी परवानगी नव्हती. त्यामुळे भारतात ही औषधं विकली गेलेली नाहीत.”
हेही वाचा : आरोग्य – ‘डिमेन्शिया’ग्रस्त व्यक्तींचे वागणे का बदलते?
या औषधांपासून धोका का?
डब्ल्यूएचओच्या प्राथमिक तपासानुसार, या औषधांमध्ये डायथिलीन ग्लायकॉल, एथिलीन ग्लायकॉल आढळलं आहे. हो दोन्ही घटक मानवी शरिरासाठी घातक आहेत. यामुळे जीवही जाऊ शकतो. याचा किडनीवर परिणाम होतो.