इतिहासातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या घटनेशी निगडीत आहे. ६ जून ही एक अशी तारीख आहे, ज्या दिवशी अनेक मोठ्या घटनांनी देश आणि जगावर आपली छाप सोडली. इतिहासातील ६ जून हा दिवस शिखांना खोल जखमा देऊन गेला. या दिवशी १९८४ मध्ये सुवर्ण मंदिरात लष्कराचे ऑपरेशन ब्लूस्टार संपले होते.
१९८० च्या दशकात तीव्र झालेल्या खलिस्तान चळवळीच्या सर्वात पुढे भिंद्रनवाले होते. भारत सरकारने आनंदपूरचा ठराव मंजूर करून शिखांसाठी वेगळे खलिस्तान राज्य निर्माण करावे, अशी अतिरेकी नेत्यांची इच्छा होती. भिंद्रनवाले यांनी चळवळीला पाठिंबा मिळवून दिला आणि पंजाब उद्ध्वस्त झाला. १९८४ मध्ये भिंद्रनवाले आणि काही सशस्त्र दहशतवादी सुवर्ण मंदिर किंवा हरमंदिर साहिब परिसरात घुसले आणि आतमध्ये त्यांचा तळ बनवला.
विश्लेषण : सुवर्ण मंदिरात हार्मोनियम वाजवण्यावरुन वाद का निर्माण झाला?
भिंद्रनवाले आणि सशस्त्र समर्थकांना सुवर्णमंदिरातून हटवण्यासाठी इंदिरा गांधींच्या सरकारने सुरू केलेल्या लष्करी कारवाईला ऑपरेशन ब्लू स्टार असे नाव देण्यात आले. १ ते ३ जून १९८४ दरम्यान पंजाबमध्ये रेल्वे, रस्ते आणि हवाई सेवा बंद करण्यात आली होती. सुवर्ण मंदिराचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अमृतसरमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली होती.
सीआरपीएफ रस्त्यावर गस्त घालत होती. सुवर्ण मंदिरात जाण्यासाठी आणि बाहेर पडण्याचे सर्व मार्ग देखील पूर्णपणे बंद करण्यात आले होते. या ऑपरेशनचा पहिला टप्पा ५ जून १९८४ रोजी रात्री १०:३० वाजता सुरू करण्यात आला. सुवर्ण मंदिर परिसराच्या आतील इमारतींवर समोरून हल्ला करण्यात आला. यादरम्यान खलिस्तानी दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबारही केला.
रक्तपातात अकाल तख्तचे मोठे नुकसान
यावेळी सैन्याला पुढे जाता आले नाही. दुसरीकडे, पंजाबच्या उर्वरित भागातही लष्कराने गावे आणि गुरुद्वारांमधून संशयितांना पकडण्यासाठी एकाच वेळी कारवाई सुरू केली होती. एका दिवसानंतर जनरल के एस ब्रार यांनी परिस्थितीला तोंड देण्यासाठी रणगाडे मागवले. ६ जून रोजी परिक्रमा मार्गावरील पायऱ्यावरुन रणगाडे उतरवण्यात आले. या गोळीबारात अकाल तख्त इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. काही तासांनंतर भिंद्रनवाले आणि त्यांच्या कमांडर्सचे मृतदेह सापडले.
विश्लेषण : पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांच्या हत्येपर्यंत गेलेली खलिस्तान चळवळ काय होती?
प्रचंड रक्तपाताच्या दरम्यान, अकाल तख्तचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि अनेक शतकांनंतर प्रथमच हरमंदिर साहिब येथे गुरु ग्रंथ साहिबचे पठण होऊ शकले नाही. पाठ न करण्याची ही प्रक्रिया ६, ७ आणि ८ जूनपर्यंत सुरू होती. तर ७ जूनपर्यंत भारतीय लष्कराने परिसराचा ताबा घेतला. ऑपरेशन ब्लूस्टार १० जून १९८४ रोजी दुपारी संपले. पण भिंद्रनवाले आणि इतरांचे मृतदेह ९ आणि १० जून रोजी बाहेर काढले गेले.
खलिस्तान समर्थकांची सुवर्ण मंदिराच्या गेटवर तलवारी घेऊन घोषणाबाजी; भिंद्रनवालेचे पोस्टर झळकावले
कारवाईत सुमारे २५० दहशतवादी मारले गेले
हे ऑपरेशन यशस्वी झाले कारण शीखांच्या पवित्र मंदिरात लपलेल्या भिंद्रनवालेसह त्याच्या अनेक समर्थकांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आले. काही अतिरेक्यांनी आत्मसमर्पणही केले. या कारवाईत सुमारे २५० दहशतवादी मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले. भारतीय सैनिक आणि अधिकाऱ्यांचाही यावेळी मृत्यू झाला.
इंदिरा गांधींनी प्राण गमावून किंमत चुकवली
देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पंजाबला दहशतवादाच्या विळख्यातून सोडवायचे होते. त्यामुळे त्यांनी हे कठोर पाऊल उचलले आणि खलिस्तानचे खंबीर समर्थक जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांना संपवण्यासाठी आणि शीख धर्माचे सर्वात पवित्र स्थळ असलेल्या सुवर्ण मंदिराला दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी ही मोहीम सुरू केली. संपूर्ण शीख समाजाने हा हरमंदिर साहिबचा अपमान मानला आणि इंदिरा गांधींना त्यांच्या शीख अंगरक्षकाच्या हातून प्राण गमावून किंमत चुकवावी लागली.
ऑपरेशन ब्लूस्टार नंतर
ऑपरेशन ब्लूस्टारमध्ये निष्पापांनी जीव गमावल्याच्या निषेधार्थ कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक शीख नेत्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला. खुशवंत सिंग यांच्यासह मान्यवर लेखकांनी त्यांचे सरकारी पुरस्कार परत केले. चार महिन्यांनंतर, ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत ८,००० हून अधिक शीख मारले गेले. सर्वाधिक दंगली दिल्लीत झाल्या. एका वर्षानंतर, २३ जून १९८५ रोजी कॅनडात राहणाऱ्या खलिस्तान समर्थकांनी एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवले. यादरम्यान ३२९ जणांचा मृत्यू झाला. बब्बर खालसाच्या दहशतवाद्यांनी याला भिंद्रनवालेच्या मृत्यूचा बदला म्हटले होते.
१० ऑगस्ट १९८६ रोजी, ऑपरेशन ब्लूस्टारचे नेतृत्व करणारे माजी लष्करप्रमुख जनरल एएस वैद्य यांची पुण्यात दुचाकीवरून आलेल्या दोन दहशतवाद्यांनी हत्या केली. खलिस्तान कमांडो फोर्सने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. तर ३१ ऑगस्ट १९९५ रोजी पंजाबचे मुख्यमंत्री बिअंत सिंग यांच्या कारजवळ एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवले. यामध्ये बिअंत सिंग मारले गेले. सिंग यांना पंजाबमधील दहशतवाद संपवण्याचे श्रेय दिले जात होते.