रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज दुसरा दिवस असून आतापर्यंत क्षेपणास्त्र आणि बॉम्बस्फोटात युक्रेनमधील १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीती पसरली आहे. या युद्धात महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील विद्यार्थी अडकले आहेत. रशिया आक्रमकपणे युक्रेनच्या शहरांवर ताबा मिळवत आहे. त्यामुळे घाबरलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी सरकारला मायदेशीत परत नेण्याची विनंती केली आहे.
युक्रेनच्या सर्वाधिक प्रभावित रशियाच्या सीमेवर असलेल्या खार्किवमध्ये अनेक विद्यार्थी अडकले आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले की त्याच्याकडे पैसे आहेत, पण खाण्यापिण्याची सोय होत नाही. पुढील ३ ते ४ दिवसांसाठी खाण्याचे सामान जमा झाले आहेत. वसतिगृहात पोहोचलेल्या काही विद्यार्थ्यांना कसेबसे जेवण मिळत आहे. काही विद्यार्थ्यांना बंकरमध्ये जीव वाचवण्यासाठी लपून बसावे लागत आहे. त्यांना खाण्यापिण्यात अडचणी येत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत असल्याची स्थिती शहरातील आहे. त्यामुळे युक्रेनमधील भारतीय नागरिकांना रस्ते मार्गाने बाहेर काढण्याची योजना भारत सरकारने आखली आहे.
काय आहे मोदी सरकारची योजना?
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी भारत सरकारने एक योजना तयार केली आहे. २५ फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारची दोन चार्टर्ड विमाने भारतातून बुखारेस्ट, रोमानियासाठी उड्डाण करतील. या संपूर्ण प्रक्रियेत एअर इंडियाची मदत घेण्यात येणार आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्यांना रोमानियामार्गे बाहेर काढणार
रस्त्याने युक्रेन आणि रोमानिया सीमेवर पोहोचलेल्या भारतीय नागरिकांना युक्रेनमधील भारतीय अधिकारी बुखारेस्ट, रोमानिया येथे घेऊन जातील. युक्रेनमध्ये अडकलेले लोक येथून विमानाने भारतात परततील. या उड्डाणांचा खर्च भारत सरकार उचलणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
दूतावासाने जारी केली नियमावली
युक्रेनची राजधानी कीव येथील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना प्रवासादरम्यान दूतावासाच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे आणि प्रवासादरम्यान पासपोर्ट, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी अमेरिकन डॉलर्समधील रोख रक्कम आणि इतर आवश्यक कागदपत्रे आणि सामान सोबत ठेवावे असे सांगितले आहे. दूतावासाने म्हटले आहे की, जर कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र असेल तर ते तुमच्याकडे ठेवा. प्रवासादरम्यान तुम्ही ज्या वाहनातून प्रवास करत असाल, त्यावर भारताचा झेंडा लावा, असेही सांगण्यात आले आहे.
युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. युक्रेनमध्ये सुमारे २०,००० भारतीय राहतात. जरी रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी त्यापैकी काहींनी आधीच युक्रेन सोडले होते. मात्र हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे अनेक लोक अजूनही अडकून पडले आहेत. हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाला परतावे लागले होते . त्यामुळे अशा परिस्थितीत सरकारच्या या पावलामुळे लोक भारतात सुखरूप परत येऊ शकतील.