दत्ता जाधव
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करणारे डाळिंब फळपीक यंदा मोठ्या अडचणीत आले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल पूर्णपणे मंदावली आहे. दुर्गम, डोंगराळ भागात, माळरानावर बहरलेले हे ‘भगवे वादळ’ आता शांत होते की काय, अशी भीती वाटू लागली आहे. का बिघडले या डाळिंबाचे गणित?
डाळिंब शेतीची सद्य:स्थिती काय?
देशात डाळिंब लागवडीखालील क्षेत्र सुमारे २ लाख १५ हजार हेक्टर आहे. त्यापैकी राज्यातील डाळिंबाखालील क्षेत्र १ लाख ४८ हजार हेक्टर आहे. देशाचे एकूण डाळिंब उत्पादन ३० लाख टन आहे, त्यात राज्याचा वाटा सरासरी १७ लाख टन आहे. महाराष्ट्र डाळिंब लागवड आणि उत्पादनात आघाडीवरील राज्य आहे. परंतु, राज्यातील डाळिंब पिकाला बसलेल्या फटक्याचा परिणाम आर्थिक उलाढालीवर झाला आहे. देशाची सरासरी २० हजार कोटी रुपये एवढी होती, ती आता १२ हजार कोटींवर आली आहे, तर राज्याची उलाढाल १२ हजार कोटींवरून आता ७ हजार कोटींवर आली आहे. मृग, हस्त आणि अंबिया, अशा तीन बहरांत डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते.
राज्यातील डाळिंब बागा अडचणीत का?
राज्यात सोलापूर, माणदेश, पुणे आणि सांगली जिल्ह्याचा दुष्काळी परिसर, अहमदनगर आणि मराठवाड्यात डाळिंबाचे क्षेत्र वेगाने वाढले होते. या डाळिंब बागांना चार-पाच वर्षांपूर्वी तेल्या रोगाचा फटका बसला. त्यातून सावरलेले शेतकरी आता खोडकिडीमुळे उद्ध्वस्त झाला आहे. राज्यातील डाळिंबाचे आगार म्हणून ओळखले जाणाऱ्या सांगोला तालुक्यातील डाळिंबाच्या बागांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील ८० टक्के बागा खोडकिडीमुळे जळून गेल्या आहेत. राज्यभरातही अशीच स्थिती आहे. ६० टक्के बागा खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काढून टाकण्यात आल्या आहेत, आणखी २० टक्के बागा काढून टाकाव्या लागणार आहेत. डाळिंबाची लागवड होणारा परिसर कमी पावसाचा, दुष्काळी, अवर्षणग्रस्त आहे. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून या भागात जोरदार पाऊस झाला. परिसरात दमट हवामान जास्त काळ टिकून राहिले, याचा परिणाम म्हणून तेल्या, खोडकिडीसारख्या रोगांचा मोठा प्रादुर्भाव डाळिंबांच्या झाडांवर होऊन झाडे जळून गेली.
निर्यातीवर काय परिणाम झाला?
आजवर भारतातून होणारी डाळिंबाची निर्यात शंभर टक्के महाराष्ट्रातूनच होत होती. राज्यातून विशेषकरून सांगोला येथून किसान रेल्वेच्या माध्यमातून डाळिंब थेट बांगलादेशात जात होते. त्यातील काही डाळिबांची निर्यात कोलकाता येथून केली जात होती. गुजरातमधील काही डाळिंब आजवर मुंबईतून निर्यात केली जायची, आता कांडला बंदरातून निर्यात सुरू झाली आहे. २०२०-२१मध्ये देशातून सरासरी ७० हजार टन डाळिंबाची निर्यात झाली होती. २०२१-२२मध्ये एप्रिलअखेर निर्यात ८७ लाख टनांवर गेली आहे. मागील वर्षी करोना आणि वाहतूक व्यवस्था सुरळित नसल्यामुळे निर्यात कमी झाली होती. यंदा ती एक कोटी टनांवर जाणे अपेक्षित होते. मात्र, रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे निर्यात घटली आहे. देशांतर्गत बाजारातही यंदा डाळिंब कमी प्रमाणात दिसून आले.
देशभरातील डाळिंबाची स्थिती काय?
देशातील एकूण डाळिंब उत्पादनात राज्याचा वाटा ६० टक्के आहे, त्या खालोखाल कर्नाटक १९ टक्के, गुजरात ८ टक्के, आंध्र प्रदेश ४ टक्के आणि तमिळनाडूचा एकूण उत्पादनातील वाटा २ टक्के आहे. राज्यात सोलापूर, नाशिक, सांगली, अहमदनगर, पुणे, सातारा; कर्नाटकमध्ये विजयपूर, बागलकोट, बेळगाव; गुजरातमध्ये भावनगर, अहमदाबाद, साबरकंठा आणि आंध्र प्रदेशातील अनंतपूर या जिल्ह्यांत डाळिंब उत्पादन होते. देशभरात गणेश, आरक्ता, भगवा आदी डाळिंबाच्या जाती प्रसिद्ध आहेत. राज्यात गणेश, सोलापुरी लाल आणि भगवा या जाती विशेष प्रसिद्ध आहेत.
कोणत्या देशाला होते निर्यात?
देशातून सर्वाधिक डाळिंब निर्यात संयुक्त अरब अमिरातीत होते, ही निर्यात एकूण निर्यातीच्या ४३ टक्के आहे. त्या खालोखाल बांगलादेशाला सरासरी १६ टक्के होते. नेदरलँड आणि ब्रिटनला प्रत्येकी ७ टक्के, सौदी अरेबियाला ६ आणि रशियाला ४ टक्के निर्यात होते. त्यानंतर थायंलड, नेपाळचा नंबर लागतो. सांगोला येथून थेट बांगलादेशाला किसान रेल्वेमार्फत निर्यात केली जात होती. यापैकी काही डाळिंबे कोलकाता बंदरातून निर्यातही होत होती.
जगात कोणत्या देशांत होते लागवड?
अफगाणिस्तान, पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि इराणमध्ये डाळिंबाची उत्पत्ती झाल्याचे मानले जात असले तरी आज जगांत सर्वात मोठा डाळिंब उत्पादक देश म्हणून भारताची ओळख आहे. इस्रायल, चीन, इराण, फ्रान्स, इटली, स्पेन, मोरोक्को, इजिप्त, इराण, अफगाणिस्तान, अरेबिया आणि पाकिस्तान, मेक्सिको, तसेच द. अमेरिकेतील अनेक देशांत डाळिंबाची लागवड होते. उत्पादित डाळिंब फळ म्हणून खाण्यासाठी, रस, वाईन, बेकरी उद्योगासह खाद्य पदार्थांमध्ये वापरले जाते. भारतापाठोपाठ इराण, चीन, तुर्कस्तान, स्पेन, अमेरिका, ट्युनिशिया, इस्रायल, असा उतरता क्रम लागतो.
डाळिंबाला पुन्हा बहर येईल?
अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे म्हणाले, की राज्यातील डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे. आर्थिक नुकसान मोठे झाल्यामुळे शेतकरी पुन्हा डाळिंब लावण्याच्या मनस्थितीत नाहीत. केंद्र आणि राज्याच्या कृषी विभागासह राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेकडून अडचणीच्या काळात योग्य प्रकारे आणि परिणामकारक मार्गदर्शन झाले नाही. त्यामुळे बागा रोगांपासून वाचविता आल्या नाहीत. आता केंद्र आणि राज्य सरकारने फळबाग लागवड योजनेतून आर्थिक मदत केली तरच काही प्रमाणात नव्याने लागवड होईल.
dattaatray.jadhav@expressindia.com