आपचे भगवंत मान यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यालयात लावण्यात आलेला क्रांतिकारक भगतसिंग यांचा फोटो वादात सापडला आहे. मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी भगतसिंग यांचे वडिलोपार्जित गाव, नवांशहर जिल्ह्यातील खटकर कलान हे निवडले होते.
मात्र मान यांच्या कार्यालयात बसंती (पिवळी) पगडी घातलेला भगतसिंग यांचा फोटो दिसत आहेत. पण फोटोच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र भगतसिंग यांच्या कुटुंबीयांच्या मते, फोटोतील त्यांच्या पगडीचा रंग महत्त्वाचा नसून त्यांची दृष्टी महत्त्वाची आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान शहीद भगतसिंग यांना आपला आदर्श मानतात. भगतसिंग यांनी ज्या पंजाबचे स्वप्न पाहिले होते, तो पंजाब घडवायचा आहे, असे भगवंत मान म्हणाले होते. शहीद भगतसिंग यांचे गाव खटकंदकलन येथे भगवंत मान यांचा शपथविधी सोहळाही आयोजित करण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात भगतसिंग यांचा फोटो का?
पंजाब निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भगवंत मान यांनी पक्ष सत्तेत आल्यास भगतसिंग आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो सरकारी कार्यालयांच्या भिंतींवर लावले जातील, अशी घोषणा केली होती.
२०११ मध्ये मनप्रीत बादल यांच्या पूर्वीच्या पीपल्स पार्टी ऑफ पंजाब (पीपीपी) सोबत मान यांनी राजकारणात प्रवेश केला होता. तेव्हापासून, अभिनेता-राजकारणी असलेले मान पिवळ्या रंगाची पगडी धारण करत आहे. तसेच जवळजवळ प्रत्येक भाषणाचा शेवटी भगतसिंग यांच्या इन्कलाब झिंदाबाद घोषणेनेच शेवट केला आहे. इन्कलाब झिंदाबाद ही घोषणा मूळतः स्वातंत्र्यसैनिक मौलाना हसरत मोहनी यांनी दिली होती. पण नंतर भगतसिंग यांनी ती लोकप्रिय केली.
पिवळ्या रंगाची पगडी घालून, मान यांनी राजभवनाऐवजी खतकर कलान येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. “सूर्याच्या सोनेरी किरणांनी आज नवी पहाट उगवली आहे. शहीद भगतसिंग आणि बाबा साहिब यांची स्वप्ने साकार करण्यासाठी आज संपूर्ण पंजाब खाटकर कलान येथे शपथ घेणार आहे. भगतसिंगांच्या विचारसरणीचे रक्षक म्हणून उभे राहण्यासाठी मी त्यांच्या मूळ गावी खटकर कलांकडे रवाना होत आहे,” असे मान यांनी शपथविधी समारंभाला निघण्यापूर्वी ट्विट केले होते. त्यांनी पुरुष पिवळी पगडी आणि स्त्रियांना पिवळे दुपट्टे घालून कार्यक्रमस्थळी येण्याचे आवाहन केले होते. सर्व आप आमदार आणि केजरीवाल यांनी पिवळे कपडे परिधान केल्याने कार्यक्रमस्थळ पिवळ्या रंगाच्या लाटेत वाहून गेले.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात भगतसिंग यांचा फोटो लावण्यावरुन वाद का?
संशोधकांच्या मते, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात लावण्यात आलेला भगतसिंग यांचा फोटो ‘खरा’ नसून केवळ ‘काल्पनिक’ आहे. “आम्ही अनेकदा स्पष्ट केले आहे की भगतसिंग यांनी कधीही पिवळी किंवा केसरी रंगाची पगडी घातली नव्हती, हे सर्व काल्पनिक आहे,” असे चमन लाल यांनी म्हटले आहे. चमन लाल हे दिल्लीच्या भगतसिंग रिसोर्स सेंटरचे मानद सल्लागार आहेत. त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.
“आम्ही अनेकदा स्पष्ट केले आहे की भगतसिंग यांनी कधीही पिवळी किंवा केसरी पगडी घातली नव्हती. हे सर्व काल्पनिक आहे. आमच्याकडे त्यांची फक्त चार मूळ छायाचित्रे आहेत. एका चित्रात ते तुरुंगात केस मोकळे सोडून बसले आहेत. दुसऱ्या चित्रात त्यांना टोपी घालून दाखवले आहे आणि इतर दोन फोटोंमध्ये पांढर्या पगडीत दिसत आहेत. भगतसिंग पिवळ्या किंवा केशरी पगडीत किंवा हातात शस्त्र घेऊन दाखवणारे इतर सर्व फोटो हे काल्पनिक आहेत,” असे लाल यांनी म्हटले आहे.
राजकीय पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी त्यांचे नाव न वापरता त्यांच्या विचारसरणीवर तरुणांशी चर्चा करावी. कल्पनेने तयार केलेली चित्रे अधिकृत कारणांसाठी कधीही वापरली जाऊ नये. पंजाब सरकारने सरकारी कार्यालयातील या चार मूळ चित्रांपैकी कोणतेही चित्र वापरावे. तुम्ही एखाद्या विशिष्ट रंगाला क्रांतिकारक गोष्टीशी जोडू शकत नाही. आजपर्यंत आमच्याकडे भगतसिंग यांचा पिवळा, केशरी किंवा लाल रंगात दाखवणारे कोणताही मूळ फोटो नाही जसे आजकाल सोशल मीडियावर चित्रित केले जात आहे,” असेही प्राध्यापक लाल म्हणाले.
पिवळा रंग भगतसिंग यांच्याशी कसा जोडला गेला?
पिवळा रंग अनेकदा पंजाबमधील निषेध आणि क्रांतीशी संबंधित आहे. तीन कृषी कायद्यांविरुद्ध वर्षभर चाललेल्या आंदोलनादरम्यान, शेतकरी अनेकदा पिवळे झेंडे वापरत होते. तसेच पिवळे फेटे आणि दुपट्टे परिधान करत होते. “मेरा रंग दे बसंती चोला माये रंग दे…” सारख्या देशभक्तीपर गीतांच्या लोकप्रियतेमुळे आणि भगतसिंग आणि इतर क्रांतिकारकांशी संबंधित असलेल्या चित्रपटांमधील दाखवण्यात आलेल्या रंगामुळे हे घडले आहे.
“पण वस्तुस्थिती अशी आहे की भगतसिंगच नव्हे तर बसंती पगडी घातलेला कोणताही क्रांतिकारक असल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही. “मेरा रंग दे बसंती चोला…” हे गाणे क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल यांनी लिहिले आहे, ज्यांना १९२७ मध्ये गोरखपूर तुरुंगात फाशी देण्यात आली होती, तर भगतसिंग यांना १९३१ मध्ये लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली होती. दोघेही हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य होते, पण तुरुंगात एकत्र राहिले नाहीत. भगतसिंग यांनी तुरुंगात “मेरा रंग दे बसंती चोला…” गायल्याचे केवळ चित्रपटांमध्ये चित्रित केले जाते, परंतु याचा कोणताही पुरावा नाही,” असेही लाल म्हणाले.