भ्रष्टाचारप्रकरणी पंजाबचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी मंत्रीपदावरून बडतर्फ केले. या कारवाईनंतर सिंगला यांना तात्काळ अटक करण्यात आली. विजय सिंगला यांच्या अटकेनंतर पंजाब पोलिसांनी त्यांचे ओएसडी प्रदीप कुमार यांनाही अटक केली आहे. जवळपास एक महिन्यापासून विजय सिंगला आणि प्रदीप कुमार मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या रडारवर होते असं सांगितलं जात आहे. सिंगला यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली होती. यानंतर त्यांनी गोपनीय पद्धतीने याचा तपास केला. या तपासात सिंगला दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब हेल्थ सिस्टम कॉर्पोरेशनचे (PHSC) कार्यकारी अभियंता रजिंदर सिंह यांना विजय सिंगला यांचे ओएसडी प्रदीप कुमार यांनी एक महिन्यापूर्वी पंजाब भवनच्या खोली क्रमांक २०३ मधे बोलावलं होतं. यावेळी विजय सिंगलादेखील तिथे उपस्थित होते. यावेळी विजय सिंगला यांनी रजिंदर सिंह यांना आपण गडबडीत असून आपल्या वतीने प्रदीप कुमार तुमच्याशी बोलतील, ते जे काही सांगतील ते समजून घ्या असं सांगितलं. यावेळी रजिंदर सिंह यांना कथितपणे सांगण्यात आलं की, ५८ कोटींच्या कामाचं वाटप करण्यात आलं आहे. एकूण रकमेच्या दोन टक्के म्हणजे १.६ कोटी मंत्र्यांना देण्यात यावेत.

यानंतर प्रदीप कुमार यांनी कार्यकारी अभियंत्याला ८, १०, १२, १३ आणि २३ मे रोजी व्हॉट्सअप कॉल केले. रजिंदर सिंह यांनी यावेळी स्पष्टपणे आपल्याला हवं तर त्यांच्या विभागात पाठवलं जावं, पण आपण हे काम करु शकत नाही असं सांगितलं. आरोग्य विभागात प्रतिनियुक्तीवर आल्याचंही त्यांनी सांगितलं.

२० मे रोजी मंत्री आणि त्यांच्या ओसएडीने कथितपणे १० लाखांच्या कमिशनवर बोलण्याचा प्रयत्न केला. रजिंदर सिंह यांनी कथितपणे त्यांना पाच लाख देण्याचा प्रस्ताव ठेवला. २३ मे रोजी रजिंदर सिंह यांना सचिवालयात बोलावण्यात आलं. यावेळी त्यांना यापुढेही जे काम दिलं जाईल किंवा कंत्राटदाराकडून जे पैसे मिळतील त्यातील एक टक्का ठेवण्यास सांगण्यात आलं.

रजिंदर सिंह यांनी २३ मे रोजी झालेली चर्चा रेकॉर्ड केली होती. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री आणि पोलिसांकडे याबाबत तक्रार करत ऑडिओ क्लिप शेअर केली होती. सिंगला यांच्या भ्रष्टाचाराबाबत मिळालेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री भगवंत मान सिंगला यांच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवून होते.

भगवंत मान यांनी सिंगला यांच्यावर कारवाई करण्याआधी आपल्या निवासस्थानी बोलावलं होतं. यावेळी त्यांनी सिंगला यांना कार्यकारी अभियंत्याने रेकॉर्ड केलेली ऑडिओ क्लिप खरी आहे का? अशी विचारणा केली. यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सिंगला भ्रष्टाचार करत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून, सिंगला यांनी भ्रष्टाचाराची कबुली दिल्याचे मान यांनी सांगितले.

दोन महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यानंतर सिंगला यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आम आदमी पक्षाचे सरकार एका रुपयाचाही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही़ आपल्याला पंजाबला भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे, असे भगवंत मान म्हणाले आहेत.

दरम्यान ही ऑडिओ क्लिप आधीच लीक झाली असून सरकारला विरोधकांची भीती वाटत असल्यानेच घाईत कारवाई केल्याची चर्चा आहे. विरोधकांनी इतक्या गडबडीत बडतर्फची कारवाई का करण्यात आली हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं अशी मागणी केली आहे. रजिंदर सिंह यांच्यावर याआधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. २०१८ मध्ये एका घोटाळ्याच्या प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

Story img Loader