भक्ती बिसुरे
माणूस का झोपतो हा वर्षानुवर्षे शास्त्रज्ञ आणि संशोधकांची झोप उडवणारा विषय ठरत आला आहे. माणूस आणि त्याची झोप हा वैज्ञानिक वर्तुळात संशोधनाचा, वादविवादाचा आणि मतंमतांतरांचाही विषय ठरत आला आहे. झोप आणि आरोग्य या दोन गोष्टींचा अत्यंत निकटचा संबंध असतो, हे आपण जाणतोच. झोपल्यानंतर आपले शरीर आणि आपला मेंदू शरीराची दिवसभर झालेली झीज भरून काढण्यासाठी काम करतात. झोप जेवढी उत्तम तेवढे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ हेही आपण वाचतो, ऐकतो. मात्र, झोप आणि मेंदूच्या आरोग्याचा आणखी एक सहसंबंध समोर आला आहे. त्याबाबत हे विश्लेषण.
झोप आणि मेंदू सहसंबंध काय?
झोप आणि मेंदू यांचे परस्परांशी असलेले नाते काय आणि कसे आहे, या प्रश्नाचे उत्तर देणारे एक संशोधन नुकतेच मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि ब्राऊन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीची आठवण ठेवणे आणि नवीन कौशल्ये आत्मसात करणे यासाठी आवश्यक यांत्रिक क्रिया सुरळीत करण्यासाठी माणूस झोपतो, असे उत्तर या संशोधनातून समोर येते. ‘सायटेक डेली’ नामक वैज्ञानिक जगतातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडींचा आढावा घेणाऱ्या नियतकालिकाने याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. या संशोधनाचे दूरगामी परिणाम मानवाची झोप, मेंदूचे कार्य, मेंदूविकार बरे करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती करणे यासाठी होणार असल्याचे या शोधनिबंधातून स्पष्ट होते.
संशोधन काय?
माणूस का झोपतो, झोप आणि माणसाची प्रकृती यांचा संबंध काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि ब्राऊन विद्यापीठ यांनी हे संशोधन हाती घेतले. झोपल्यानंतर मानवी मेंदूमध्ये ‘रिप्ले’ नावाची प्रक्रिया घडते. नव्याने मिळालेली माहिती आठवण्यासाठी आणि साठवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते, हे शास्त्रज्ञांना माहिती आहे. ही माहिती पडताळून पाहण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्राण्यांवर म्हणजेच उंदरावर प्रयोग केले. उंदीर या प्राण्याला एका चक्रव्यूहात मार्ग शोधायला (नॅव्हिगेशन) शिकवले असता, मेंदूच्या पेशी आणि न्यूरॉन्स एका विशिष्ट मार्गाचा अवलंब करत असल्याने प्रकाश पडत असल्याचे दिसून आले. तो प्राणी झोपल्यानंतर त्याच्या मेंदूतील कार्याचे निरीक्षण केले असता नॅव्हिगेशनदरम्यान झालेल्या क्रियांचीच पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले. त्यावरून जागे असताना प्राप्त केलेल्या ज्ञानाचा विचार आणि पुनरावलोकन करत असल्याचे सिद्ध होत असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांकडून काढण्यात आला.
मानवावरील संशोधन काय सांगते?
प्राण्यांमध्ये दिसून आलेली निरीक्षणे मानवामध्ये किती खरी आहेत किंवा लागू पडतात असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. यावर मॅसेच्युसेट जनरल हॉस्पिटलच्या मेंदूविकार विभागाचे तज्ज्ञ म्हणतात, की मानवाच्या बाबतीत कौशल्य, ज्ञान आणि माहिती यांवर यांत्रिक क्रिया करून त्यांची फेरअनुभूती (रिप्ले) होते का, हे अभ्यासण्यासाठी आणि हालचाली नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या भागामध्ये रिप्ले प्रक्रिया घडते का हे पाहण्यासाठी एक स्वतंत्र संशोधन हाती घेण्यात आले. त्यासाठी टेट्राप्लेजिया (यालाच क्वाड्रिप्लेजिया असेही म्हणतात) असलेल्या एका ३६ वर्षीय स्वयंसेवकाची निवड करण्यात आली. त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे हातांच्या हालचालींमध्ये अनियमितता आली होती. मेंदू आणि संगणक आंतरसंलग्न उपकरणाचा (इंटरफेस डिव्हाईस) वापर त्यासाठी करण्यात आला. हे डिव्हाईस ब्रेनगेट कन्सॉर्टियमकडून विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञ, मेंदूशास्त्रातील तज्ज्ञ, तंत्रज्ञ, अभियंते अशा अनेकांचा समावेश आहे. मेंदूविकार, अपघात किंवा तत्सम कारणांनी हालचाली, संवाद यांच्यामध्ये बिघाड झालेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी पूरक म्हणून या उपकरणाची मदत घेतली जाणार आहे. संशोधनाचा भाग म्हणून स्वयंसेवक रुग्णाला काही संगणकीय खेळांतील क्रिया लक्षात ठेवण्याची कृती करण्यास उद्युक्त करण्यात आले. त्याने गोष्टींचे निरीक्षण केले. त्या लक्षात ठेवल्या. त्याच्या मेंदूने केलेल्या या कृतीच्या नोंदी संगणकावर प्रक्षेपित करण्यात आल्या. त्यानंतर जेव्हा हा स्वयंसेवक रात्री झोपी गेला तेव्हा त्याच्या मेंदूने झोपेत तोच संगणकीय खेळ खेळला. जागेपणी मेंदूच्या कार्याची नोंदवलेली निरीक्षणे आणि झोपल्यानंतर नोंदवलेली निरीक्षणे सारखीच असल्याचे या अभ्यासातून दिसून आले. एवढेच नव्हे तर स्वयंसेवक रुग्णाच्या दुखावलेल्या (निकामी) हाताच्या संभाव्य हालचालींचा अभ्यासही करण्यात आला.
या अभ्यासाचा उपयोग काय?
या अभ्यासाचा नेमका उपयोग काय हा प्रश्न सर्वांनाच पडणे स्वाभाविक आहे. सदर क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी शास्त्रज्ञांच्या मते ब्रेनगेट डिव्हाईस हे मेंदूविज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे दरवाजे उघडणारे ठरणार आहे. मानवी मेंदू व्यक्ती व्यक्तीच्या स्तरावर कसे कार्य करतो हे समजून घेण्यासाठी मदत करेल. त्यावर आधारित तंत्रज्ञान निर्मितीसाठी हे पहिले पाऊल ठरेल, असा विश्वासही हे शास्त्रज्ञ वर्तवतात.