सिद्धार्थ खांडेकर

२४ फेब्रुवारी रोजी रशियाने भल्या सकाळी युक्रेनवर तीन-चार आघाड्यांवर आक्रमण केले. असे आक्रमण होणार याविषयी सर्व संबंधितांना कल्पना होती. रशिया आणि युक्रेन यांच्यातील सैन्यदल व शस्त्रास्त्रे बलाबलातील असमतोल पाहता, युक्रेन काही दिवसांतच शरण येईल किंवा किमान वाटाघाटींसाठी तयार होईल, असे वाटत होते. तसे काहीही घडलेले नाही. उलट दीड महिने उलटूनही युक्रेनचा प्रतिकार चिवट बनला आहे. युक्रेनला अमेरिका व इतर देशांची वाढती मदत मिळू लागल्यामुळे रशियन आक्रमणे अधिकाधिक निष्फळ ठरताना दिसताहेत. आता युक्रेनच्या आग्नेयेकडील रशियनबहुल डॉनेत्स्क आणि लुुहान्स्क प्रांतांवर निर्णायक चढाई करण्याचा निर्णय रशियाने घेतलेला दिसतो.

रशियाला व्यूहरचना का बदलावी लागली?

सुरुवातीस युक्रेनच्या उत्तर आणि वायव्येकडून थेट राजधानी कीव्हवर चढाई करून युक्रेनला पराभूत करण्याचा प्रयत्न त्या देशाचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निर्धाराने हाणून पाडला. कीव्हच्या रस्त्यारस्त्यातून रशियन फौजांना प्रतिकार झाला. त्यामुळे बिथरलेल्या या फौजांनी परतताना नैराश्यातूनच कीव्हच्या वेशीवरील बुचा शहरात नृशंस हत्याकांड केले. युक्रेनियन सामरिक तयारी आणि निर्धाराची कल्पना रशियन नेतृत्वाला आली नाही, हे स्पष्ट आहे. लढाईचे नियोजन नव्हते, कित्येक रशियन सैनिकांना युक्रेनवरील आक्रमणाची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, अशीही माहिती मिळत आहे. उदा. कीव्हला वेढा देण्यासाठी दोन आठवडे पुरेल इतकीच रसद रशियाच्या सैनिकांनी आणली होती. पण कीव्हमध्ये घुसताच न आल्यामुळे ती कमी पडली. त्यामुळे कीव्हच्या आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये इंधन, कोंबड्या लुटण्याचा प्रकारही रशियन सैनिकांनी केला.

रशियाची मनुष्यहानी किती झाली?

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे लष्कर बाळगणाऱ्या रशियन सैन्याची युद्धसज्जता आणि युद्धनियोजन या दोन्ही आघाड्यांवर फजिती उडाल्याचे युक्रेन आक्रमणादरम्यान अनेकदा आढळून आले. पहिल्या दोन आठवड्यांतच जवळपास १५ हजार रशियन सैनिक मारले गेल्याचे वृत्त युक्रेनियन माध्यमे, तसेच तेथे वार्तांकन करत असलेल्या काही पाश्चिमात्य माध्यमांनीही दिले आहे. संपूर्ण (आणि फसलेल्या) अफगाणिस्तान मोहिमेत रशियाची इतकी मनुष्यहानी झाली होती. केवळ लष्करी तळच आमचे लक्ष्य राहतील, अशी ग्वाही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युद्ध सुरू करण्यापूर्वी दिली होती. ती त्यांनी पाळली नाही. विशेषतः लष्करी चढायांना अपेक्षित यश मिळत नाही हे कळाल्यावर कधी बालरुग्णालय, कधी नागरी वस्त्या, कधी निर्वासितांची आश्रयस्थाने, कधी रेल्वेस्थानके यांच्यावरही बाँबफेक किंवा क्षेपणास्त्रे फेक झालेली दिसून येते.

रशियाकडील साधनसामग्री अत्याधुनिक नव्हती का?

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने मॅडिसन पॉलिसी फोरम या संस्थेच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन सैनिकांकडे रात्रीच्या लढाईसाठी आवश्यक असे नाइट व्हिजन गॉगल्सही नव्हते. युक्रेनियन सैनिकांकडे ते होते आणि त्यांचा वापर करून रात्रीच्या वेळी छुपे हल्ले करून या सैनिकांनी शत्रूला बेजार करून सोडले. पूर्व आघाडीवरील नव्याने भरती झालेल्या रशियन सैनिकांकडे तर १९व्या शतकात प्रथम विकसित झालेल्या बंदुका दिल्या गेल्या होत्या, असे ‘रॉयटर्स’चा एक वृत्तांत सांगतो. रशियन फौजांच्या तुलनेत वैयक्तिक पातळीवर युक्रेनियन सैनिकांकडील शस्त्रे आणि इतर साधनसामग्री अधिक आधुनिक होती.

रशियन चढाईची सध्या काय स्थिती आहे?

कीव्ह, चेर्नीव्ह आणि सुमी या उत्तरेकडील शहरांतून रशियन फौजा माघारी फिरल्या आहेत. झेलेन्स्की अजूनही हिंमत हारलेले नाहीत, कारण कीव्हचे पतन त्यांनी होऊ दिले नाही. २४ फेब्रुवारी रोेजी रशियन सैन्य उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिशेकडून युक्रेनमध्ये शिरले. खार्किव्ह, खेरसन, कीव्हच्या दिशेने या फौजा सरकू लागल्या. पण दोन आठवड्यांनंतरही कीव्ह किंवा खार्किव्ह ही शहरे त्यांना ताब्यात घेता आली नाहीत. लहान-सहान शहरे, गावे घेत या फौजा सरकल्या, पण त्यांची चढाई कुठेही निर्णायक नव्हती. अखेरीस ४ एप्रिल रोजी रशियाने युक्रेनच्या पूर्व भागांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे जाहीर केले. पण माघार घेतानाही बुचासारखे हत्याकांड त्यांच्याकडून घडलेच.

पुढे काय?

ज्या दोन प्रांतासाठी – डॉनेत्स्क आणि लुहान्स्क – युद्धाचा खटाटोप रशियाने केला, त्यांच्याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याचे रशियाने ठरवले आहे. पुढील काही दिवस निर्णायक असतील, असा इशारा झेलेन्स्की यांनी दिला आहे. त्यांनी पाश्चिमात्य देशांकडून अधिक युद्धसामग्रीची मागणी केली आहे. उपरोल्लेखित दोन्ही प्रांतांमध्ये रशियन बंडखोरांची संख्या लक्षणीय आहे. या भागामध्ये रशियन सैन्याला तुलनेने अधिक यश मिळू शकते, असेही म्हटले जाते. येथील काही शहरांवर हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे येथून आणखी पुढे सरकण्याचा रशियाचा प्रयत्न राहील. अपेक्षित यश मिळाले नाही, तर बिथरलेले पुतीन काय करतील याचा विचार करण्याची वेळ निघून गेलेली आहे. प्रतिकार केल्यास रशियन आक्रमणाला खीळ बसू शकते, हे युक्रेनच्या लक्षात आले आहे. पण या प्रतिकाराची जबर किंमत मोजावी लागत असून, तूर्त पश्चिमेकडील देशांच्या मदतीवरही बरेच काही अवलंबून राहील.

Story img Loader