अन्वय सावंत
युरोपातील महासत्ता रशिया आणि त्यांच्या शेजारचे राष्ट्र युक्रेन यांच्यात युद्ध होणार असल्याची अलीकडच्या काळात बरीच चर्चा सुरू होती. या चर्चा खऱ्या ठरल्या आणि गुरुवारी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. यात युक्रेनच्या काही सैनिकांसह नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर शुक्रवारीही रशियन सैन्याने आक्रमण सुरू ठेवताना युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांना लक्ष्य केले. या युद्ध परिस्थितीमुळे विशेषतः युक्रेनमधील नागरिकांची मोठी हानी झाली आहे. तसेच या दोन देशांतील संघर्षाचे पडसाद खेळांवरही उमटल्याचे पाहायला मिळत आहे.
खेळांवर काय परिणाम?
रशियाचा जागतिक खेळांमध्ये कायमच दबदबा असतो. तसेच त्यांना अनेकदा महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची संधी लाभते. यंदा चॅम्पियन्स लीग या जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे यजमानपद भूषवण्याचा मान रशियातील सेंट-पीटर्सबर्ग शहराला लाभणार होता. मात्र, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर ‘युएफा’च्या कार्यकारी समितीची तातडीने बैठक बोलावण्यात आली. यात २८ मे रोजी होणारा अंतिम सामना रशियाबाहेर हलवून फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये खेळविण्याचा निर्णय झाला.
तसेच रशियात होणारी स्किईंग विश्वचषक स्पर्धाही रद्द करण्यात आली. परंतु, या निर्णयाची घोषणा होण्यापूर्वीच काही आघाडीच्या राष्ट्रांनी या स्पर्धेतून माघार घेतली होती. यंदा रशियात फॉर्म्युला-१ची शर्यतही न घेण्याचे ठरले आहे. त्याचप्रमाणे आगामी ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्कही रशियाकडून काढून घेण्यात आले आहेत.
‘आयओसी’ची काय भूमिका? –
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) जगभरातील सर्व क्रीडा महासंघांना त्यांच्या रशिया आणि बेलारूस येथे होणाऱ्या स्पर्धा रद्द करण्यास अथवा इतरत्र खेळवण्यास सांगितले आहे. रशियन सैन्याने बेलारूस मार्गे युक्रेनमध्ये शिरकाव केला. त्यामुळे रशिया आणि त्यांची मदत करणाऱ्या बेलारूस सरकारने ‘ऑलिम्पिक युद्धविराम’ (ऑलिम्पिक ट्रूस) नियमाचे उल्लंघन केल्याचे ‘आयओसी’चे म्हणणे आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये या दोन्ही देशांचे ध्वज फडकवण्यासही ‘आयओसी’ने बंदी घातली आहे.
खेळाडूंचा कोणाला पाठिंबा? –
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांचा क्रीडा जगतातून निषेध करण्यात येत आहे. रशियाच्या आघाडीच्या क्रीडापटूंनीही आपल्या देशाच्या या कृतीला पाठिंबा देणे टाळले आहे. रशियाचा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू इयान नेपोम्निशीने यापेक्षा काळा दिवस पाहिला नसल्याचे आपल्या ‘ट्वीट’मध्ये लिहिले. रशियाचा अव्वल टेनिसपटू डॅनिल मेदवेदेवने ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे भाष्य केले. ‘‘टेनिसपटू म्हणून मला जगभरातील विविध देशांतील स्पर्धांमध्ये खेळावे लागते. त्यामुळे मी सर्वच देशांना शांततेचे आवाहन करेन,’’ असेही मेदवेदेव म्हणाला.
भारताचा विदित गुजराथी आणि अमेरिकेचा हिकारू नाकामुरा या ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंनीही युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. बार्सिलोना आणि नापोली या संघांनी गुरुवारी युरोपा लीग फुटबॉलमधील सामन्यापूर्वी ‘युद्ध थांबवा’ असे लिहिलेला फलक दाखवला. तसेच पोलंडने पुढील महिन्यात रशियाविरुद्ध होणारा ‘फिफा’ विश्वचषक पात्रतेच्या प्ले-ऑफचा सामना खेळण्यास नकार दिला आहे. पोलंडचा कर्णधार आणि तारांकित खेळाडू रॉबर्ट लेवांडोवस्कीने राष्ट्रीय संघटनेच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे पुढील काळात रशियाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.