पावलस मुगुटमल
देशासाठी दरवर्षी नियमितपणे पाऊस घेऊन येणाऱ्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा मुक्काम गेल्या काही वर्षांत वाढतोच आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने २०२० मध्ये मोसमी पावसाच्या आगमनाच्या आणि परतीच्या सर्वसाधारण नियोजित तारखाही बदलल्या आहेत.
मोसमी पावसाचा कालावधी बदलला?
र्नैऋत्य मोसमी वारे देशाच्या विविध भागांत प्रवेश करण्यापूर्वी होणारा पूर्वमोसमी पाऊस, हंगामातील मोसमी पाऊस आणि त्यानंतर होणारा अवकाळी पाऊस, असे कमी-अधिक प्रमाणातील पावसाचे चक्र वर्षभर सुरू असते. गेल्या काही वर्षांत हे चक्र अधिकच स्पष्टपणे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या विविध भागात दिसले आहे. परंतु, हमखास पडणाऱ्या मोसमी पावसाचा कालावधी महत्त्वाचा समजला जातो. ढोबळपणे जून ते सप्टेंबर हा मोसमी पावसाचा चार महिन्यांचा कालावधी असतो. मात्र, हंगाम संपल्यानंतरही ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत किंवा तिसऱ्या आठवडय़ाच्या शेवटपर्यंत मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या घडामोडी सुरूच असतात. त्यामुळे मोसमी पावसाचा कालावधी बदलल्याचे स्पष्ट आहे.
पाऊस कुठवर लांबतो?
हंगामाचा चार महिन्यांचा कालावधी संपल्यानंतरही पुढे एक ते तीन आठवडय़ांपर्यंत र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परिणामाने होणारा पाऊस सुरूच असतो. हवामान विभागाकडून गेल्या ५० वर्षांतील मोसमी पावसाचे आगमन आणि परतीच्या प्रवासाच्या वेळांबाबत अभ्यास करून नियोजित सर्वसाधारण तारखांमध्ये आवश्यकतेनुसार बदल केले जातात. अलीकडेच २०२० मध्ये मोसमी पावसांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मोसमी पाऊस कुठवर लांबू शकतो, हे त्यावरून लक्षात येते. पूर्वी महाराष्ट्रात मोसमी पावसाच्या प्रवेशाची सर्वसाधारण तारीख ८ ते १० जूनच्या दरम्यान होती. पण, गेल्या अनेक वर्षांत प्रवेशाला होणारा विलंब लक्षात घेता ती १६ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्यातून मोसमी पाऊस माघारी जाण्याची तारीख २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यानची होती. पावसाच्या परतीच्या प्रवासाला होणारा विलंब लक्षात घेता ती १२ ऑक्टोबपर्यंत वाढविण्यात आली आहे. देशातून मोसमी पाऊस १५ सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे निघून जाणे अपेक्षित आहे. मात्र, हवामानाचा लहरीपणा कधीकधी या तारखाही चुकवितो.
पावसाचा कालावधी किती असावा?
पावसाच्या कालावधीबाबत महाराष्ट्राचे उदाहारण घेतल्यास जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या सरासरी कालावधीत मोसमी पाऊस सुमारे १०० ते १२० दिवसांची हजेरी लावून निघून जाणे आवश्यक असते. १२० दिवसांपर्यंत मोसमी पावसाच्या कालावधीतील पाऊस नैसर्गिक समजला जातो. त्यातून मोसमी पावसाचे वर्तनही योग्य असल्याचे मानले जाते. त्यातून नंतरच्या कालावधीतील वातावरणीय घटना योग्य पद्धतीने घडून येतात. नक्षत्रानुसार परतीचा पाऊस, योग्य थंडी, कमी गारपीट, माफक प्रमाणातील धुके आदी गोष्टी घडून येतात आणि त्या शेतीसाठीही उपयुक्त ठरतात. त्यामुळे शेतीच्या दृष्टीने मोसमी पाऊस वेळेतच परत जाणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे अधिक पाऊस होण्यापेक्षा सरासरीच्या प्रमाणातच पाऊस होणे कधीही चांगलेच असते. मोसमी पावसाच्या हंगामात १०० ते १२० दिवसांत पाऊस किती तीव्रतेने पडला, हे महत्त्वाचे नसते, तर तो किती दिवस पडला याला महत्त्व असते. पण, हंगामानंतर परतीचा कालावधी वाढून पडलेला पाऊस अनेकदा नुकसानकारक ठरतो.
यंदा काय झाले?
यंदा र्नैऋत्य मोसमी पावसाने २९ मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला. त्यानंतर त्याने सर्वात शेवटी २ जुलैला पश्चिम राजस्थानच्या भागात प्रवेश करून संपूर्ण देश व्यापला. महाराष्ट्रात १० जूनला प्रवेश करून मोसमी वाऱ्यांनी १६ जूनपर्यंत राज्य व्यापले. मोसमी वारे सक्रिय असल्याच्या चार महिन्यांच्या हंगामाच्या कालावधीत कमी दाबाच्या पट्टय़ांचा सर्वाधिक लाभ मिळाल्याने मध्य भारत आणि दक्षिणेकडील बहुतांश भागात यंदा मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला. मात्र, उत्तर आणि ईशान्य भारतातील काही भागांना पावसाचा वाटा कमी मिळाला. या विभागांत सरासरीच्या तुलनेत अद्यापही कमी पाऊस आहे. महाराष्ट्रात मात्र सर्वच जिल्ह्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. हंगामात देशात सरासरीच्या तुलनेत सात टक्के अधिक, तर महाराष्ट्रात २६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.
पावसाला परतायला विलंब झाला?
मोसमी पावसाच्या हंगामाचे चार महिने पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून राजस्थानमधून परतीच्या प्रवासाचे वेध लागतात. हवामान विभागाच्या सर्वसाधारण तारखांनुसार १७ सप्टेंबरला राजस्थानच्या काही भागांतून पाऊस माघारी फिरणे अपेक्षित असते. यंदा त्याला तीन दिवसांचा विलंब झाला. म्हणजे २० सप्टेंबरला मोसमी पाऊस पश्चिम-उत्तर राजस्थानच्या काही भागातून माघारी फिरल्याचे जाहीर करण्यात आले. हा तीन दिवसांचा विलंब नंतर मात्र दीर्घ ठरला. कारण राजस्थानच्या तुरळक भागातून माघारी फिरलेला पाऊस त्याच विभागात तब्बल आठ दिवस रखडला. ३ ऑक्टोबरनंतर मात्र परतीच्या प्रवासाला काहीसा वेग आला आहे. त्यानुसार सध्या संपूर्ण राजस्थान, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेशचा बहुतांश भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागातून पाऊस माघारी फिरला असला, तरी त्याचा परतीचा प्रवास विलंबानेच होतो आहे.
पुढे काय होणार?
देशाच्या ३० टक्के भागातून सध्या मोसमी पाऊस माघारी फिरला आहे. नियोजित सर्वसाधारण वेळेनुसार माघारीच्या प्रवासात तो तब्बल दहा दिवसांनी मागे आहे. १५ ऑक्टोबरला नियोजित वेळेनुसार र्नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशातून निघून जाणे अपेक्षित आहे. यंदा तसे घडणे जवळपास शक्य नसल्याचे दिसते. गेल्या वर्षी २०२१ मध्ये तब्बल १९ दिवस उशिरा ६ ऑक्टोबरला मोसमी पावसाने राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केला होता आणि तो २५ ऑक्टोबरला विक्रमी विलंबाने देशातून परतला होता. यंदा येत्या १४-१५ ऑक्टोबपर्यंत तो मध्य भारतातील आणखी काही भागातून परतीचा प्रवास करणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार महाराष्ट्रातून १६ ऑक्टोबरनंतर मोसमी पावसाचा परतीचा प्रवास होऊ शकणार आहे.