पावलस मुगुटमल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या जून ते सप्टेंबर या नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या हंगामातील दीर्घकालीन अंदाज नुकताच जाहीर केला. त्यानुसार यंदाही देशात सरासरीच्या जवळपास पाऊस पडणार असल्याचे भाकीत हवामान विभागाने केले आहे. देशात वर्षभरात पडणाऱ्या एकूण पावसामध्ये मोसमी पावसाचा वाटा ७० टक्क्यांच्या आसपास आहे. नैर्ऋत्य दिशेने बाष्प घेऊन येणाऱ्या वाऱ्यांमुळे संपूर्ण देशात हक्काचा पाऊस होतो, हे आपल्याला माहीत आहे. पण, हा पाऊस नेमका पडणार तरी किती, हे हवामान शास्त्रज्ञच सांगू शकतात. त्यासाठी ते कोणकोणत्या गोष्टींचा आधार घेतात. पावसाची सरासरी सांगण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो, हे मात्र सर्वांनाच माहीत नसते.

पावसाच्या अंदाजाचे टप्पे कोणते?

हवामान विभागाकडून पूर्वी एकाच टप्प्यात मोसमी पावसाचा अंदाज मोसमापूर्वी काही दिवस आधी जाहीर केला जात होता. २००३ पासून मात्र भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून संपूर्ण देशातील जून ते सप्टेंबर या कालावधीतील सरासरी पर्जन्यमानाचा अंदाज दोन टप्प्यांत जाहीर केला जातो. त्यानुसार यंदा पहिल्या टप्प्यातील अंदाज १४ एप्रिलला जाहीर करण्यात आला. दुसरा दीर्घकालीन अंदाज मे महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाणार आहे. इतकेच नव्हे, केवळ दोन टप्प्यांत पावसाचा दीर्घकालीन अंदाज देण्याबरोबरच मोसमाच्या हंगामातील प्रत्येक चार महिन्यांचा अंदाज गेल्या वर्षीपासून जाहीर केला जात आहे. हा अंदाज बहुतांश प्रमाणात बरोबरच ठरत असल्याचेही दिसून येत आहे. यंदाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पावसाची सरासरी, टक्केवारी कशी काढतात?

भारताच्या प्रत्येक राज्यात, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि शहरातील हंगामातील पाऊस गेल्या कित्येक वर्षांपासून हवामान विभागाच्या पर्जन्य मापक केंद्रांच्या माध्यमातून मोजला जात आहे. सध्या १९७१ ते २०२० या कालावधीत मोजण्यात आलेल्या पावसाची एक सरासरी काढण्यात आली आहे. हंगामातील कोणत्या महिन्यात किती पाऊस होत असतो किंवा हंगामातील प्रत्येक दिवशी कुठे किती पाऊस होतो, याचा सखोल अभ्यास करून सरासरी काढण्यात आली आहे. त्यानुसार हंगामाच्या कालावधीत संपूर्ण देशात सरासरी ८७० मिलिमीटर पाऊस होतो, असे गणित मांडण्यात आले आहे. हाच आकडा लक्षात घेता त्या तुलनेत यंदाच्या हंगामात देशात सरासरीइतका म्हणजेच ९९ टक्के पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. त्यात ५ टक्के कमी-अधिकच्या तफावतीची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे.

पाऊस मोजण्याच्या श्रेणी कोणत्या?

गेल्या अनेक वर्षांत पाऊस मोजणीच्या आकडेवारीवरून काढण्यात आलेली सरासरी लक्षात घेऊनच संभाव्य पावसाचे गणित मांडले जाते. यंदाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या अशा पाच श्रेणी ठरविल्या आहेत. त्यानुसार ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱ्या श्रेणीत ९० ते ९६ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱ्या श्रेणीत ९६ ते १०४ टक्के म्हणजे सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०४ ते ११० टक्के आणि ११० टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो. यंदाच्या हंगामात तिसऱ्या श्रेणीतील पावसाचे भाकीत करण्यात आले आहे.

पावसाचे अंदाज कशाच्या आधारावर?

पावसाचा हंगाम सुरू होण्यासाठी अद्याप दीड महिन्यांहून अधिकचा कालावधी शिल्लक असताना देशात ९९ टक्के पाऊस पडेल, असे भाकीत कशावरून केले जाते, हा प्रश्न कुणालाही पडू शकतो. सध्या देण्यात आलेला दीर्घकालीन अंदाज एप्रिलच्या सुरुवातीला असलेल्या वातावरणातील स्थितीच्या आधारावर देण्यात आला आहे. हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी अलीकडच्या काळात अत्याधुनिक प्रारूपे तयार करण्यात आली आहेत. त्यात वाऱ्यांची दिशा, अवकाश, समुद्राची स्थिती आदींचा सातत्याने अभ्यास केला जातो. त्यासाठी हवामान केंद्रांसह उपग्रह, रडार यंत्रणा यांचा आधार घेतला जातो. हंगामाच्या कालावधीत ही स्थिती कशी राहील, याचा अंदाज प्रारूपांच्या आधारे मांडला जातो आणि त्यावरून त्या-त्या काळातील हवामानाची आणि पावसाची भाकिते केली जातात. सध्याच्या अत्याधुनिक यंत्रणांच्या माध्यमातून ही भाकिते बहुतांश प्रमाणात खरी ठरतात. प्रशांत आणि हिंद महासागरात पावसाळ्याच्या हंगामात असलेली स्थितीही भारताच्या मोसमी पावसावर मोठा परिणाम करू शकते. त्यामुळे या स्थितीवरही हवामान शास्त्रज्ञ सातत्याने लक्ष ठेवून असतात.

समुद्रातील स्थिती पावसाला पोषक आणि मारकही कशी?

प्रशांत महासागराच्या विशिष्ट भागातील पृष्ठभागाचे तापमान सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढल्यास ‘एल-निनो’ हा शास्त्रीय घटक सक्रिय होतो. तो जागतिक हवामानावर प्रभाव टाकणारा घटक आहे. हा घटक दर दोन ते सात वर्षांनी सक्रिय होत असतो आणि एकदा सक्रिय झाल्यास तो २ ते ३ महिने कायम रहू शकतो. पावसाचा अंदाज देताना या घटकाकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते. कारण त्यामुळे भारतात पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते. मोसमी वारे सक्रिय असताना हा घटक त्यांची तीव्रता कमी करू शकतो. पण, हे प्रत्येक वेळेस घडत नाही. दुसऱ्या बाजूला प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागांत पाण्याचे तापमान घटल्यास ‘ला-निना’ ही शास्त्रीय परिस्थिती निर्माण होते. ती भारतीय मोसमी पावसासाठी पोषक ठरते. सध्या ला-निनाची स्थिती आहे आणि ती पावसाळ्यातही कायम राहील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार भारतात यंदा चांगल्या पावसाचे भाकीत करण्यात आले आहे.

pavlas.mugutmal@expressindia.com