मागील वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात मोठं नुकसान आणि पडझड झालेल्या शेअर बाजाराने नवीन वर्षात दणक्यात सुरुवात केलीय. आजचा दिवस वगळल्यास मागील काही दिवसांपासून शेअर बाजारामध्ये तेजी दिसून येत आहे. बुधवारी भांडवली बाजारात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नफावसुली होऊन देखील बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील समभागांमधील मूल्य तेजीने सेन्सेक्स पुन्हा एकदा ६०,००० अंशांच्या पातळीवर परतण्यास यशस्वी झाला. बुधवारी सलग चौथ्या दिवशी सकारात्मकता कायम राहिल्याने प्रमुख निर्देशांकाने चार सत्रांत मिळून २,४३८.८३ अंशांची कमाई केली होती. आज शेअर बाजारामध्ये सेन्सेक्स ६४३.३९ अंशांनी पडलाय तर निफ्टी १८२ अंशांनी घसरल्याचं चित्र दिसत आहे.
बुधवारच्या सावध पण उत्साहपूर्ण व्यवहाराच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३६७.७२ अंशांनी वधारून ६०,२३३.१५ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १२० अंशांची कमाई केली आणि तो १७,९२५.२५ पातळीवर स्थिरावला. मात्र आज सकाळपासूनच शेअर बाजारामध्ये पडझड दिसून आली.
आज घसरण…
जागतिक पातळीवरील संकेत तेजीवाल्यांच्या बाजूने नसले तरी बुधवारच्या अत्यंत अस्थिर सत्रात दिवसअखेर बाजाराने अर्ध्या टक्क्यांच्या वाढीसह सकारात्मक बंद नोंदविला. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा एकदा कठोर निर्बंध लावले जाण्याच्या शक्यतेने बाजारात चिंतेचे वातावरण आहे. शेअर बाजारात काल वृद्धीचा कल होता तर आज पुन्हा मोठी घसरण पहायला मिळाली.
गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला…
बुधवारी खासगी क्षेत्रातील काही बँकांनी सरलेल्या तिमाहीत व्यवसायात दुहेरी अंकातील वाढ नोंदवल्याने बँकिंग क्षेत्राने इतर क्षेत्रीय निर्देशांकांना मागे टाकल्याचेही दिसून आले. तर येत्या काही दिवसांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे तिमाहीतील कामगिरीचे आकडे प्रसिद्ध होणार असल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिला आणि या क्षेत्रातील समभागात घसरण झाली. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर तेथील भांडवली बाजारात कमकुवत व्यवहार सुरू होते, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियलचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.
बुधवारी हे झाले मालामाल…
बुधवारी सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्हचा समभाग ५.०९ टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर होता. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, कोटक बँक, अॅक्सिस बँक, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, मारुती आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग तेजी दर्शवत होते. दुसरीकडे, टेक र्मंहद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक, विप्रो, पॉवरग्रिड आणि डॉ रेड्डीजच्या समभागांमध्ये २.८७ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी १८ कंपन्यांचे समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले होते.
भविष्यामध्ये शेअर बाजारामध्ये वातावरण कसं असेल?
कालची मोठी वाढ आणि आजची पडझड असं एकंदरित चित्र पाहिल्यास बाजारामधील परिस्थिती अस्थिर असल्याचं लक्षात येतं. वाढती महागाई, कर्जच्या दरांमध्ये वाढीसंदर्भातील चर्चा आणि ओमायक्रॉन रुग्णांची वाढती संख्या यामुळे गुंतवणुकदारांची चिंता वाढणार आहे.
करोना रुग्णांची संख्या वाढली तर राज्यांमध्ये लॉकडाउन लागू केला जाईल. पुन्हा निर्बंध लादलण्यात आले तर आता कुठे पूर्वपदावर आलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे.
अमेरिकन शेअर बाजारावर नजर…
अमेरिकन शेअर बाजारामध्ये पडझड झाली तर फॉरेन पोर्टफोलिओ इनव्हेस्टर्स म्हणजेच एफपीआयच्या माध्यमातून आलेला पैसा काढून घेण्याचा कल वाढले आणि त्याचा भारतीय शेअर बाजारा आणि रुपयाच्या किंमतीवर मोठा परिणाम होईल. भारतातील करोना रुग्णांची वाढली संख्या लक्षात घेत आरबीआय रिव्हर्स रेपो रेटमध्ये काही बदल करणार नाही अशी अपेक्षा गुंतवणुकदारांना आहे. तसेच तिसऱ्या तिमाहीमध्ये नक्की किती पैसा हाती लागतोय याचीही काही गुंतवणुकदार वाट पाहत असल्याचं या क्षेत्रातील जाणकार सांगतात.
पुढे काय होणार?
पुढील काही कालावधीचा विचार केल्यास एफपीआयच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारामध्ये वृद्धी अधिक राहील असा अंदाज आहे. मात्र बाजारामध्ये सध्या लगेच स्थिरता येईल असं चित्र दिसत नाहीय. करोना रुग्णांची वाढती संख्या, निर्बंधांची शक्यता, केंद्रीय अर्थसंकल्प आणि आरबीआयच्या धोरणांचाही शेअर बाजारावर मोठा परिणाम होईल असं सांगितलं जातंय.