सोमवारी घसरणीसह बंद झालेल्या शेअर बाजाराने मंगळवारी व्यवहार सुरू झाल्यानंतर पुन्हा उसळी घेतली आहे. दुपारच्या व्यवहारापर्यंत, सेन्सेक्स ११०० हून अधिक अंकांनी मजबूत झाला आणि ५७,८०० अंकाच्या पार केला. दुसरीकडे, निफ्टी ३०० अंकांनी मजबूत होऊन पुन्हा एकदा १७,२०० अंकांच्या पुढे गेली आहे.
सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक १.५ टक्क्यांहून अधिक घसरून तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर आले होते. मात्र, मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे.
रिकव्हरी होण्याचे कारण काय आहे?
देशात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूबद्दल गुंतवणूकदारांची चिंता थोडी कमी होत आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारावर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे. आयसीआयसीआयच्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे फंड मॅनेजर अमित गुप्ता म्हणाले, “करोनाचे नवीन प्रकार असलेल्या ओमायक्रॉनची फक्त सौम्य लक्षणे दिसत आहेत. मात्र त्याचा प्रसार झपाट्याने होत असल्याने प्रवास बंदीची चिंता आहे. हा प्रकार डेल्टासारखा वाईट नसेल तर शेअर मार्केट निश्चितपणे हे सकारात्मकतेने घेईल.”
अमेरिकेचे सर्वोच्च संसर्गजन्य रोग अधिकारी डॉ. अँथनी फौची यांनी सीएनएनला सांगितले की, ओमाक्रॉनचा मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. ओमायक्रॉन कमी धोकादायक असू शकतो. त्यामुळेच भारत, आशियाशिवाय जगभरातील शेअर बाजारांमध्येही त्याचा फायदा दिसून आला आहे.
रुपयाची अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १० पैशांची वाढ
मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १० पैशांनी वाढून ७५.३६ वर पोहोचला कारण देशांतर्गत इक्विटीमध्ये वाढ झाली आणि परदेशातील बाजारातील कमजोर अमेरिकन चलनाने गुंतवणूकदारांचा सहभाग वाढला. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि परकीय भांडवलाच्या प्रवाहाने रुपयाचा नफा मर्यादित केला आहे.
दरम्यान, आशियातील शेअर बाजारांनी आज वॉल स्ट्रीटचे अनुसरण केले कारण करोना व्हायरसच्या नवीन प्रकाराबद्दलची चिंता कमी झाली. फौची यांच्या वक्तव्यानंतर वॉल स्ट्रीटचा बेंचमार्क S&P ५०० इंडेक्स १.२ टक्क्यांनी वाढला.
बँकिंग शेअर्सनी घेतली उसळी
भारतीय बाजारात, धातू आणि बँकिंग शेअर्सनी आज वाढ केली आणि दोन्ही निर्देशांकांनी प्रत्येकी दोन टक्क्यांपेक्षा जास्त उसळी घेतली. सेन्सेक्स समभागांमध्ये कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स आणि टाटा स्टील २.५ टक्के ते ३.५ टक्क्यांच्या दरम्यान वाढले.
रिझर्व्ह बँकेच्या व्याजदराबाबत गुंतवणूकदारांचे लक्ष
नव्या विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे संभाव्य अनिश्चिाततेची स्थिती लक्षात घेऊ न रिझर्व्ह बँक व्याजदराबाबत काय भूमिका घेते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान मंदीवाल्यांची पकड अधिक घट्ट केल्याने भांडवली बाजारात निफ्टीने १७,००० अंशांची पातळी मोडली आहे. भांडवली बाजारात विक्रीचा दवाब कायम आहे, असे निरीक्षण एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख एस रंगनाथन यांनी नोंदवले.