गेल्या काही वर्षांत वातावरणात होणाऱ्या चढ उतारांचे गंभीर परिणाम मुंबईसह महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात दिसून येत आहेत. दर काही महिन्यांनी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे अतोनात नुकसान होत असून जनजीवनही विस्कळीत होते आहे. नुकसान भरपाईपोटी शासनाचे लाखो रुपये खर्ची पडत आहेत. शहरी भागातील हरितक्षेत्र मोठ्या प्रमाणावर नष्ट होत असून त्याजागी काँक्रीटची बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची जमिनीची क्षमता कमी झाली आहे. परिणामी, भूजल पातळी खालावत असून भूपृष्ठालगतची हवा अधिकाधिक उष्ण होत आहे. काही वर्षांपूर्वी दिवाळीच्या पहिल्या दिवशी जाणवणारी थंडी आता नोव्हेंबर संपला तरी जाणवत नाही. अधूनमधून संध्याकाळी आणि रात्री जाणवणारा गारवा वगळता यंदा डिसेंबर महिनाही थंडीच्या प्रतीक्षेतच गेला. त्यातच काही दिवस जोरदार पाऊस झाल्याने तापमानात तीव्र चढ उतार दिसून आले. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेती अवकाळी पाऊस आणि गारपीट यांच्या कात्रीत सापडली आहे. अलीकडे जगभर चर्चेत असणाऱ्या ‘वातावरण बदला’चा परिणाम म्हणून ऋतूंचा कालावधी अजून बदललेला नसला तरीही वातावरणीय घटनांच्या तीव्रतेत फरक पडला असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
बारमाही पाऊस का ?
प्रामुख्याने नैऋत्य मोसमी पावसाचा कालावधी जून ते सप्टेंबर असतो. परंतु, युरोपीय देशांकडे निर्माण होणाऱ्या पश्चिमी चक्रवातामुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्सेस) परिणाम भारतातील काही भागांवरही होत असतो. युरोपीय देशांमध्ये निर्माण होणारी ही वातावरणीय स्थिती ऑक्टोबर ते एप्रिल – मे या कालावधीत अधिक सक्रिय असते. या स्थितीचा परिणाम प्रामुख्याने उत्तर भारतावर होतो. काही वेळा उत्तर भारतासोबत मध्य भारतावरही युरोपीय वाऱ्यांचा परिणाम होत असल्याने सप्टेंबरनंतर आणि जूनच्या आधी मुंबईत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळतात. जून ते सप्टेंबर हा महाराष्ट्राच्या नैऋत्य मोसमी पावसाचा कालावधी असतो. या काळात दक्षिण भारतात तुलनेने पाऊस कमी असतो. याउलट मुंबईचा पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात ईशान्य मोसमी पाऊस दक्षिण भारतात अधिक सक्रिय होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे अरबी समुद्राकडे सरकतात. येताना हे पट्टे मोठ्या प्रमाणावर आर्द्रता घेऊन येतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडतो. इशान्य मोसमी पाऊस आणि युरोपजवळील वातावरणीय स्थिती यांचा एकत्रित परिणाम म्हणून गतवर्षी डिसेंबरच्या प्रारंभी मुंबईत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. १ डिसेंबरला मुंबई शहर व उपनगरात ४० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. २ डिसेंबरला सकाळी ८.३० वाजेपर्यंत २४ तासांत पडलेल्या पावसाचे प्रमाण ९० मिमीपेक्षाही अधिक होते.
गारपीट कशी होते ?
युरोपीय देशांमधील वातावरणीय स्थितीचा परिणाम म्हणून मध्यप्रदेशचा उत्तर भाग आणि हरयाणा येथे वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. तसेच कोकणाजवळ अरबी समुद्रातही अशीच स्थिती आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर असे दोन्ही बाजूंनी वारे महाराष्ट्राकडे येत आहेत. येणाऱ्या वाऱ्यांसोबत आर्द्रताही मोठ्या प्रमाणावर येत आहे. विदर्भ, मराठवाड्यामध्ये कधी भरपूर उष्णता, कधी भरपूर थंडी अशी स्थिती असते. जमिनीलगतची आर्द्रता मोठ्या प्रमाणावर वर ढकलली जाते. जमिनीपासून ४ किमी उंचावरील तापमान शून्य अंशापेक्षा कमी असते. त्यामुळे वर ढकलल्या गेलेल्या आर्द्रतेचे रुपांतर बर्फाच्या गोळ्यांमध्ये होते. हे गोळे आकाराने मोठे असल्याने ते जड होतात व जमिनीवर कोसळतात. यालाच गारपीट असे म्हणतात, अशी माहिती हवामान विभागाच्या नागपूर शाखेचे प्रादेशिक प्रमुख मोहनलाल साहू यांनी दिली.
गेल्या वर्षी १८ फेब्रुवारीला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि २० मार्चला औरंगाबाद, बीड, जालना, मध्य महाराष्ट्र, चाळीसगाव येथे गारपीट झाली होती. १४ एप्रिलला सातारा, बीड, सोलापूर येथे गारपीट झाली होती. सप्टेंबरमधील काही दिवसही या परिसरातील नागरिकांनी गारपीट अनुभवली. वर्षअखेरीस अकोला आणि नागपुरात गारपीट झाली. गेले दोन दिवस विदर्भात गारपीट सुरू आहे. गारपीटीमुळे विदर्भात संत्र्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे.
मुंबईत गारपीट का नाही ?
आर्द्रता वर जाऊन त्याचे बर्फाच्या गोळ्यात रुपांतर होण्याची क्रिया पावसाळ्यातही होत असते; मात्र त्यावेळी ही क्रिया कमी तीव्रतेने होत असल्याने तयार होणाऱ्या बर्फाच्या गोळ्यांचा आकार लहान असतो व जमिनीवर येईपर्यंत त्यांचे पाण्यात रुपांतर होते. शिवाय मुंबई हे शहर समुद्र किनारी वसलेले असल्याने येथील उष्णता आणि थंडी नियंत्रणात असते. ढगांमध्ये तयार झालेले छोट्या आकाराचे बर्फाचे गोळे खाली येत असताना जमिनीलगतच्या उष्णतेमुळे त्यांचे पाण्यात रुपांतर होते व पाऊस पडतो. परिणामी, मुंबईत गारपीट होत नाही.