सिद्धार्थ खांडेकर
जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांची नारा शहरात झालेली भर दिवसा भर रस्त्यात गोळय़ा घालून झालेली हत्या धक्कादायक आणि खळबळजनक ठरली. जपानच्या पंतप्रधानपदावर सर्वाधिक काळ राहिलेले आबे यांचे जपानबरोबरच जागतिक अर्थकारण आणि राजकारणात महत्त्वाचे स्थान होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते जवळचे मित्र. कित्येक वर्षांच्या आर्थिक मरगळलेल्या अवस्थेतून जपानला बाहेर काढण्याचे आणि त्या देशाचे वर्षांनुवर्षे शांतताकेंद्री, तटस्थ सामरिक धोरण नव्याने आक्रमक करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. कोविडचा धक्का पचवून ऑलिम्पिक स्पर्धेचे विलंबाने तरीही यशस्वी आयोजन हे त्यांच्या कारकीर्दीचे आणखी एक ठळक वैशिष्टय़.
राजकीय कारकीर्द कशी सुरू झाली?
शिंझो आबे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय होती. जपानचे माजी परराष्ट्रमंत्री शिंतारो आबे हे त्यांचे वडील, तर माजी पंतप्रधान नोबुसुके किशी हे त्यांचे आजोबा (मातामह) होत. राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयात जपानमध्ये पदवी घेतल्यानंतर आबे यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. काही काळ कोबे स्टील या कंपनीत नोकरी केल्यानंतर ते राजकारणाकडे वळले. लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर ते १९९३ मध्ये पहिल्यांदा जपानी डिएट किंवा पार्लमेंटच्या प्रतिनिधिगृहाच्या निवडणुकीत निवडून आले. २००५ मध्ये जपानचे त्यावेळचे पंतप्रधान जुनुचिरो कोइझुमी यांनी त्यांना चीफ कॅबिनेट सेक्रेटरी या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नेमले. २००६ मध्ये काहीशा अनपेक्षितपणे ते जपानचे सर्वात युवा पंतप्रधान बनले. परंतु ढिसाळ कारभार (पाच कोटी जपान्यांचा निवृत्तीवेतन विदाच त्या काळात गहाळ झाला) आणि अनुभवाचा अभाव यांमुळे प्रथम हाऊस ऑफ कौन्सिलर या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. काही आठवडय़ांनी पोटाचा विकार बळावल्यामुळे त्यांनी सप्टेंबर २००७ मध्ये राजीनामा दिला.
राजकीय प्रवाहात पुनप्र्रवेश कसा झाला?
जपानमध्ये तो काळ राजकीय अस्थैर्याचा होता. लेमान ब्रदर्स बँकेच्या पतनानंतर झालेल्या आर्थिक भूकंपाचे धक्के जपानलाही बसले. दीर्घकाळ मंदीसदृश गोठलेल्या अवस्थेत जपानची अर्थव्यवस्था होती. राजकीय अस्थैर्य आणि आर्थिक दिशाहीनतेला कावलेल्या जपानी मतदारांना आबे यांनी नवी स्वप्ने दाखवली. ‘टेक बॅक जपान’ या त्यांच्या घोषणेने मतदार प्रभावित झाले. २०१२ मधील सार्वत्रिक निवडणुकीत आबे यांचा लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष मोठय़ा बहुमताने सत्तेवर आला. पुढे २०१४ आणि २०१७ मधील निवडणुकाही जिंकून जपानमध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा मान त्यांना मिळाला.
पाहा व्हिडीओ –
त्यांची हत्या धक्कादायक का ठरली?
नारा या शहरात एका प्रचारसभेदरम्यान त्यांच्यावर गोळय़ा झाडण्यात आल्या. हल्लेखोरास बंदूक किंवा तत्सम शस्त्र कसे काय मिळाले, असा प्रश्न आहे. जपानमध्ये बंदूक परवाना मिळवणे अशक्यकोटीतली बाब मानली जाते. विविध स्तरांवर काटेकोर चौकश्या झाल्यानंतरच तो मिळतो. त्यामुळे गोळीबाराच्या घटनांचे प्रमाण त्या देशात अत्यल्प आहे. गोळीबारात प्राणहानीचे प्रमाण वर्षांकाठी सरासरी १० इतके आहे. शिवाय मानसिक तणावाखाली असलेल्यांचे प्रमाण लक्षणीय असले, तरी हिंसाचाराचे प्रमाण जवळपास नाही. गुन्हेगारी टोळय़ांनीही बहुतेकदा राजकीय नेते आणि सर्वसामान्यांना लक्ष्य करण्याचे टाळलेले आहे.
कारकीर्द वादग्रस्तही ठरली, ती कशी?
शिंझो आबे यांनी उजव्या आणि प्रतिगामी विचारसरणीचा उघडपणे पुरस्कार आणि प्रचार केला असे त्यांचे विरोधक मानतात. ते काही काळ निप्पॉन कायगी या अतिउजव्या विचारसरणीच्या संघटनेचे सदस्य होते. ‘निगेशनिस्ट’ किंवा जपानचा युद्धपूर्व व युद्धकालीन हिंसक इतिहास अमान्य करणाऱ्यांपैकी ते एक होते. उदा. युद्धकाळात जपानी फौजांनी जिंकलेल्या प्रदेशांमध्ये महिलांना लैंगिक गुलामी करण्यास भाग पाडले गेले, हे स्वीकारण्यास आबे यांच्यासारख्यांनी नकार दिला. भूराजकीय वादाचे निराकरण कधीही युद्धाच्या मार्गाने केले जाणार नाही, अशी प्रतिज्ञा अधोरेखित करणारे जपानी राज्यघटनेतील कलमही बदलावे, असा त्यांचा आग्रह अखेपर्यंत राहिला. यासुकुनी स्मृतिस्थळाला ते वारंवार भेट द्यायचे. हे स्थळ जपानी युद्धखोरीचे प्रतीक असल्याचे मत प्रामुख्याने चीन आणि दक्षिण कोरिया या देशांचे आहे.
‘आबेनॉमिक्स’ आणि ‘क्वाड’..?
चलनतरलता, आर्थिक चालना आणि संस्थात्मक सुधारणा घडवून आणण्याकामी आबे यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या काळात पुढाकार घेतला. जपानच्या पारंपरिक, काटकसरीच्या आर्थिक धोरणांना त्यांनी फाटा दिला. स्वस्त कर्जे, सरकारी खर्च आणि वैयक्तिक मागणीला चालना दिली. पायाभूत सुविधांसाठी भरीव निधीची तरतूद केली. या उपायांमुळे सुरुवातीचा काही काळ जपानी अर्थव्यवस्था मरगळ झटकून देऊ शकली. ‘क्वाड’ या गटाची संकल्पना आबे यांचीच. जपान, अमेरिका, भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा आर्थिक, सामरिक, राजनैतिक गट असावा हे मत त्यांनी मांडले. जी-७ देशांच्या अनेक बैठकांमध्ये आधीच्या जपानी पंतप्रधानांसारखी ‘लाजाळू उपस्थिती’ न ठेवता अनेक मुद्दय़ांवर परखड मतप्रदर्शनाचा मार्ग त्यांनी पत्करला. यामुळे जगातील एक महत्त्वाचे नेते अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. चीनविषयी त्यांची भूमिका आधीच्या अनेक जपानी नेत्यांच्या तुलनेत आक्रमक आणि रोखठोक राहिली. याच चीनबरोबर त्यांनी पहिल्या टर्ममध्ये जुळवून घेण्याचा प्रयत्नही केला होता.
पंतप्रधान मोदींशी घनिष्ठ संबंध कसे?
नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी पूर्वाभिमुख परराष्ट्र धोरणाअंतर्गत त्यांनी सर्वप्रथम जपानला भेट दिली. २००६-०७ मध्ये आबे यांनी भारतीय संसदेत भाषण केले. त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये आबे तीन वेळा भारतात येऊन गेले. मोदी यांच्याशी त्यांचे सूर विशेष जुळले. अणुऊर्जा, सागरी सुरक्षा, बुलेट ट्रेन प्रकल्प, प्रशांत टापूतील सहकार्य अशा मुद्दय़ांवर या दोन्ही नेत्यांनी एकत्रित काम केले. siddharth.khandekar@expressindia.com