संतोष प्रधान

‘मराठी पाट्या झाल्याच पाहिजेत’, ‘मराठीवरील अन्याय कदापि सहन करणार नाही’ अशी दहा-बारा वर्षांपूर्वी आग्रही भूमिका मांडणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘मदरशांवर धाडी घाला’ आणि मशिदींवरील भोंगे काढा’ अशा मागण्या केल्याने मनसेचा प्रवास मराठीपासून आक्रमक हिंदुत्वाकडे सुरू झाल्याचे स्पष्टच जाणवते. राज ठाकरे हे आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करीत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेत मराठीचा पुरस्कार करीत मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना सूचक इशारा दिला. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ असा नारा देणाऱ्या शिवसेनेने मराठीसाठी मांडलेली भूमिका तर राज ठाकरे यांच्याकडून आक्रमक हिंदुत्वाचा करण्यात आलेला पुरस्कार यातून दोन ठाकरे बंधूंची बदलेली भूमिका लोकांसमोर आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात नेहमी बोलत असत. आता मु्स्लिमांच्या विरोधात भूमिका घेत प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने राज ठाकरे हे ‘नवे हिंदुहृदयसम्राट’ बनतील का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. राज यांच्या या नव्या भूमिकेमुळे भाजप आणि मनसे अधिक जवळ येणार हे अधोरेखितच झाले.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ratnagiri assembly defeat , Shivsena Thackeray Ratnagiri , Ratnagiri latest news, Ratnagiri shivsena news,
रत्नागिरी विधानसभेचा पराभवाचा वाद देवाच्या दारात, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना शिक्षा देण्यासाठी घातले गाऱ्हाणे
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट
gulabrao deokar loksatta news
गुलाबराव देवकर यांचा प्रचार केल्याबद्दल ठाकरे गटाला पश्चाताप, जळगाव जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यामागे काय कारण?

मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांनी सातत्याने मराठीचा मुद्दा तापवला होता. मराठीच्या मुद्द्यावर मनसेने हिंसक आंदोलने केली. अनेक ठिकाणी ‘खळ्ळखट्याक’ झाले. दुकाने तसेच आस्थापनांवरील पाट्या या मराठी भाषेत असल्याच पाहिजेत, असा इशारा देत ती कृती प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न झाले. हिंदी भाषकांना मराठी हिसका दाखविला. यामुळेच राज ठाकरे यांचा उल्लेख मनसेचे कार्यकर्ते मराठी हृदयसम्राट असा करीत असत. परंतु केवळ मराठी मतांवर मुंबई, ठाणे, पुण्यात निभाव लागू शकत नाही. २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय संदर्भ बदलले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी सत्तेसाठी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. शिवसेनेला विरोध या एक कलमी कार्यक्रमावर मनसेचे राजकारण चालते. शिवसेनेने मैत्री तोडल्याने भाजपालाही नव्या मित्राची आवश्यकता होतीच. मनसेमुळे शिवसेनेच्या मराठी मतांमध्ये फूट पाडणे आणि अमराठी भाषकांच्या मतांचे गणित जुळवून मुंबईत शिवसेनेला ‘चारी मुंड्या चीत’ करणे ही भाजपची खेळी दिसते. राज ठाकरे यांचे मराठीचे राजकारण भाजपाला अडचणीचे ठरते. कारण त्यातून उत्तर भारतात भाजपला फटका बसू शकतो. भाजप नेत्यांनी केलेले मतपरिवर्तन आणि शिवसेनेला सत्तेसाठी आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करता येत नसल्यानेच राज ठाकरे यांनी ही पोकळी भरून काढण्यावर भर दिला. काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर जुळवून घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा मुद्दा मांडताना सावधगिरी बाळगावी लागते. याचे उदाहरण म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायद्यावरील विधेयकाला शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दर्शविला होता, पण काँग्रेसच्या आक्षेपानंतर राज्यसभेत शिवसेना तटस्थ राहिली होती. शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा खेचण्याकरिताच राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला. यासाठीच मध्यंतरी पक्षाच्या झेंड्यात बदल करण्यात आला. भगव्या रंगाला प्राधान्य देण्यात आले.

मनसेच्या बदललेल्या भूमिकेचा शिवसेनेवर कितपत परिणाम होईल?

काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर सत्तेसाठी एकत्र आल्याने शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्याला बगल दिल्याचा आरोप भाजपाकडून सातत्याने केला जातो. मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे कान चांगलेच टोचले. दाऊदच्या नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मलिक यांच्या अटकेनंतरही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. शिवसेना हे सारे निमटूपणे बघत आहे. उद्धव ठाकरे हे सारे सहन कसे करतात. शिवसेनाप्रमुख असते तर ते काय म्हणाले असते, अशा शब्दांत भाजपाने शिवसेनेने हल्ला चढविला. १९८७मध्ये विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीपासून शिवसेनेने हिंदुत्वाचा कायमच पुरस्कार केला. त्याचा शिवसेनेला राजकीय फायदाही झाला. ‘खान हवा की बाण हवा’ अशी कुजबूज सुरू करीत शिवसेनेने मराठवाड्यात पाय रोवले. मराठवाड्यात प्रत्येक निवडणुकीत खान की बाण हा मतदारांना भावणारा मुद्दा शिवसेनेकडून भात्यातून बाहेर काढला जातो. मराठवाड्यात आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा मतदारांना भावतो. महाविकास आघाडीचे नेतृत्व करताना शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मवाळ झाल्याचा भाजपकडून सातत्याने होणारा आरोप आणि राज ठाकरे यांनी मदरशा आणि मशिदींवरील भोंगे हे मुद्दे हाती घेतल्याने शिवसेनेपुढे आव्हान उभे राहू शकते. मशिदींवरील भोंगे सरकारने काढले नाही तर अशा मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवावा या राज यांच्या आदेशानुसार मनसैनिकांनी आंदोलन सुरू केल्यास वातावरण तापू लागेल. शिवसेनेलाही आता हिंदुत्वाचा मुद्दा कार्यक्रम पत्रिकेवरून दूर करता येणार नाही. याउलट हिंदुत्वाचा मुद्दा आम्ही सोडलेला नाही हे दाखवून द्यावे लागेल.

राज ठाकरे यांची बदलती भूमिका भाजपच्या पथ्यावर पडेल का?

तशी शक्यता दिसते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीत सामना करावा लागणार आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेनेच्या साथीने भाजपला ४० खासदारांचे पाठबळ राज्यातून मिळाले. शिवसेना आणि भाजपची मतपेढी साधारणता सारखीच. शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडल्याशिवाय लवकरच होऊ घातलेल्या महानगरपालिका व आगामी लोकसभा निवडणुकीत यश संपादन करता येणार नाही हे भाजपच्या धुरिणांनी ओळखले. राज ठाकरे यांची मदत भाजपला हवीच आहे. राज यांनी मराठीचा मुद्दा मवाळ करीत आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतल्यास भाजपला मदतच होऊ शकते. मुंबई, नाशिक आणि पुणे पट्ट्यात राज यांचा बऱ्यापैकी जोर आहे. हिंदुत्वाचा आक्रमक पुरस्कार केल्यास मराठवाड्यातही मनसेचे इंजिन पळू शकेल. शिवसेनेचे जेवढे नुकसान होईल तेवढे भाजपाला हवेच आहे.

पण मुळात हिंदुत्वाचे राजकारण राज्यात यशस्वी होते का?

उत्तर प्रदेश विधानसभेच्या अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाच्या मूद्द्यावर करण्यात आलेले मतांचे ध्रुवीकरण भाजपला फायदेशीरच ठरले. ८० टक्के विरुद्ध २० टक्क्यांची लढाई हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विधान पुरेसे बोलके होते. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करून ४० टक्के मते मिळवायची ही भाजपची रणनीती पक्की झालेली. लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये ते अनुभवास आले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचा मुद्दा मतदारांना भावतो हे अनुभवास आलेले आहे. औरंगाबादमध्ये लोकसभेत एमआयएमचा खासदार निवडून आला, पण महानगरपालिकेत खान की बाण या एका मुद्द्यावर शिवसेना सरस ठरते. राज ठाकरे हे हिंदुत्वाचा किती आक्रमकपणे पुरस्कार करतात, शिवसेना त्याला कसे प्रत्युत्तर देते यावर बरेच काही अवलंबून असेल.

Story img Loader