पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला आहे. त्यानंतर आता पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. भारताच्या पंतप्रधानांची सुरक्षा अतिशय कडक आणि अनेक सुरक्षा रक्षकांनी वेढलेली असते. त्याची मुख्य जबाबदारी एसपीजीवर आहे. यामध्ये इतर सुरक्षा संस्थाही सहकार्य करतात. यामध्ये एनएसजी कमांडो, स्थानिक पोलीस, निमलष्करी दल आणि केंद्रीय आणि राज्य गुप्तचर संस्थांचा समावेश आहे. एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) भारताच्या पंतप्रधानांना २४ तास सुरक्षा पुरवण्यासाठी जबाबदार आहे.
अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रशिक्षण
पंतप्रधान जिथे जातात तिथे प्रत्येक पायरीवर एसपीजीचे अचूक नेमबाज तैनात असतात. हे शूटर एका सेकंदात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सक्षम आहेत. या सैनिकांना अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रशिक्षण दिले जाते. एसपीजी जवानांकडे एमएनएफ-२००० असॉल्ट रायफल, ऑटोमॅटिक गन आणि १७ एम रिव्हॉल्व्हर सारखी आधुनिक शस्त्रे आहेत.
सुरक्षेमधील चूक नाही तर रिकाम्या खुर्च्यांमुळे सभा न घेताच परतले मोदी; Video शेअर करत नेत्याची टीका
पोलिसांचीही भूमिका महत्त्वाची
पंतप्रधानांच्या सुरक्षेत एसपीजीशिवाय पोलिसांचीही महत्त्वाची भूमिका असते. पंतप्रधांच्या सुरक्षेसाठी हजारो पोलीस चोवीस तास तैनात असतात. पंतप्रधानांच्या स्थानिक कार्यक्रमांना एसपीजीचे प्रमुख स्वतः उपस्थित असतात. एसपीजी प्रमुख कोणत्याही कारणास्तव अनुपस्थित असल्यास, सुरक्षा व्यवस्थेचे उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याद्वारे व्यवस्थापन केले जाते. सभेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान निवासस्थानातून बाहेर पडतात तेव्हा संपूर्ण मार्गावरील एकेरी वाहतूक १० मिनिटे बंद असते. दरम्यान, पोलिसांची दोन वाहने सायरन वाजवून मार्गावर गस्त घालत असतात. पंतप्रधान ज्या मार्गावरून जातील तो मार्ग पूर्णपणे अबाधित असेल याची खात्री करण्यासाठी हे केले जाते.
“मोदीजी, हाउज द जोश?”; पंजाबमध्ये आंदोलकांनी पंतप्रधानांचा ताफा रोखल्यानंतर काँग्रेस नेत्याचे ट्विट
पंतप्रधानांच्या भोवती एनएसजी कमांडोंचे कवच
पंतप्रधानांच्या ताफ्यात दोन बुलेटप्रूफ BMW ७ सिरीज सेडान, ६ BMW X५s आणि एक मर्सिडीज बेंझ रुग्णवाहिका यांच्यासह डझनहून अधिक वाहने असतात. या व्यतिरिक्त एक टाटा सफारी जॅमर देखील ताफ्यासोबत असते. पंतप्रधानांच्या ताफ्याच्या पुढे आणि मागे पोलिस सुरक्षा कर्मचाऱ्यांची वाहने असतात. डाव्या आणि उजव्या बाजूला आणखी दोन वाहने आहेत आणि मध्यभागी पंतप्रधानांचे बुलेटप्रूफ वाहन असते.
डमी कारचा देखील ताफ्यात समावेश
हल्लेखोरांची दिशाभूल करण्यासाठी, ताफ्यात पंतप्रधानांच्या वाहनाप्रमाणेच दोन डमी गाड्यांचा समावेश असतो. जॅमर वाहनाच्या वर अनेक अँटेना असतात. हे अँटेना रस्त्याच्या दोन्ही बाजूला १०० मीटर अंतरावर ठेवलेले बॉम्ब निकामी करण्यास सक्षम असते. या सर्व गाड्या एनएसजीच्या अचूक नेमबाजांच्या ताब्यात असतात. याचा अर्थ सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधानांसोबत जवळपास १०० लोकांची टीम असते. पंतप्रधान चालत असतानाही त्यांना गणवेशात तसेच सिव्हिल ड्रेसमध्ये एनएसजी कमांडोने घेरलेले असते.
आंदोलनाची माहिती असतानाही ‘ब्लू बुक’च्या नियमांचे पालन नाही; पंजाब पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप
रूट प्रोटोकॉल म्हणजे काय?
पंतप्रधानांचा ताफा जात असताना नेहमी किमान दोन मार्ग निश्चित करण्यात येतात. कोणालाच या मार्गाबद्दल माहिती देण्यात आलेली नसते. एसपीजी शेवटच्या क्षणी मार्ग ठरवते. एसपीजी मार्ग कधीही बदलू शकते. यावेळी एसपीजी आणि राज्य पोलिसांमध्ये समन्वय असतो. यासाठी राज्य पोलिसांकडून मार्गाची परवानगी मागितली जाते.