गौरव मुठे 

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने सुकाणू (अँकर) गुंतवणूकदारांकडून ५,६२७ कोटी रुपयांचा निधी सोमवारी (२ मे) उभारला. भारताच्या भांडवली बाजारातील सर्वात मोठय़ा समभाग विक्रीसाठी ही दमदार सुरुवात निश्चितच. या पार्श्वभूमीवर सुकाणू गुंतवणूकदार कोण असतात, त्यांचा सहभाग महत्त्वाचा का? त्यांचे ‘आयपीओ’मध्ये पैसा ओतण्यामागचे ईप्सित आणि गणिते काय, ते समजून घेऊ या.

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Loans from State Bank, HDFC,
एचडीएफसी पाठोपाठ स्टेट बँकेकडून कर्ज महाग
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Abhishek Lodha transferred 18 percent stake in the company to a charitable trust print eco news
आता लोढादेखील टाटांच्या दानकर्माच्या वाटेवर; धर्मादाय न्यासाला कंपनीतील १८ टक्के हिस्सा हस्तांतरित
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे

सुकाणू गुंतवणूकदार म्हणजे काय?

सुकाणू गुंतवणूकदार (अँकर इन्व्हेस्टर) म्हणजे थोडक्यात संस्थात्मक गुंतवणूकदारच असतात. यामध्ये विविध गुंतवणूक कंपन्या, देश-विदेशातील म्युच्युअल फंड यांचा समावेश असतो. सुकाणू गुंतवणूकदारांसाठी प्रारंभिक समभाग विक्री ही इतरांच्या तुलनेत साधारणत: एक दिवस आधी सुरू होते. अर्थात सुकाणू गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या हिश्शामध्ये बोली लावण्यासाठी अग्रक्रम मिळतो. सुकाणू गुंतवणूकदारांना किमान १० कोटी रुपये गुंतवावे लागतात. तर संबंधित कंपनी भांडवली बाजरात सूचिबद्ध झाल्याच्या ३० दिवसांपर्यंत तरी या गुंतवणूकदारांना समभाग विकता येत नाहीत.

सुकाणू गुंतवणूकदार महत्त्वाचे का?

कंपनीच्या समभागांना चांगली मागणी दाखवण्यासाठी सुकाणू गुंतवणूकदारांसाठी एक दिवस आधी समभाग विक्री केली जाते. त्यांच्यासाठी एकूण समभाग विक्रीतील काही समभाग राखून ठेवले जातात. सामान्यत: जर सुकाणू गुंतवणूकदारांचा प्रतिसाद मोठा असेल, तर त्यामुळे कंपनीच्या समभाग विक्रीला प्रोत्साहन मिळते. कारण ते इतर गुंतवणूकदारांना कंपनीच्या समभागात पैसा टाकण्याचा संकेत देत असतात. त्याउलट या गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीकडे पाठ करणे हा नकारात्मक संकेत ठरतो. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (क्यूआयबी) राखीव ठेवलेल्या हिश्श्यातूनच सुकाणू गुंतवणूकदारांना समभागांसाठी बोली लावता येते. यामध्ये सार्वभौम वेल्थ फंड, म्युच्युअल फंड, पेन्शन फंड आणि विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय) यासारख्या संस्थांचा समावेश असतो. यापैकी बहुतांश हे बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे नोंदणीकृत असतात.

या सुकाणू गुंतवणूकदारांना समभाग कधी आणि कसे मिळतात?

प्रारंभिक समभाग विक्री सुरू होण्यापूर्वीच संभाव्य बडय़ा गुंतवणूकदारांचा कल आजमावणारी बोलणी सुरू होतात. प्रत्यक्षात कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री सुरू होण्याच्या फक्त एक दिवस आधी सुकाणू गुंतवणूकदारांना अर्ज करता येतो. ‘एलआयसी’च्या बाबतीतही सुकाणू गुंतवणूकदारांसाठी सोमवारी (२ मे) समभाग विकण्यात आले. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी बुधवार, ४ मेपासून भागविक्री सुरू होणार आहे. सुकाणू गुंतवणूकदारांना कंपन्यांनी निश्चित केलेल्या किंमतपट्टय़ातील सर्वोच्च किंमत पातळीला समभाग विकले जातात. समभाग विक्रीची हाताळणी करणाऱ्या गुंतवणूक बँकर्सच्या माध्यमातून सुकाणू गुंतवणूकदारांची यादी निश्चित केली जाते.

‘एलआयसी’ला सुकाणू गुंतवणूकदारांचा प्रतिसाद किती, कोणाचा?

‘एलआयसी’च्या २१,००० कोटींच्या देशातील सर्वात मोठय़ा आयपीओला सुकाणू गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सुकाणू गुंतवणूकदारांनी ५,६२७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांसाठी अर्ज केले. सुकाणू गुंतवणूकदारांसाठी ५.९२ कोटी समभाग राखीव ठेवण्यात आले होते. त्यापैकी ७१.९२ टक्के म्हणजेच सुमारे ४.२ कोटी समभाग देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून खरीदण्यात आले.

शिवाय, काही देशांतर्गत विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांनी त्यात गुंतवणूक केली. या श्रेणीतील काही प्रमुख नावांमध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, कोटक मिहद्र लाइफ इन्शुरन्स, पीएनबी मेटलाइफ इन्शुरन्स, एसबीआय पेन्शन फंड आणि यूटीआय रिटायरमेंट सोल्युशन्स पेन्शन फंड योजना यांचा समावेश आहे. तर परदेशी सुकाणू गुंतवणूकदारांमध्ये सिंगापूर सरकार, सिंगापूरचे चलन प्राधिकरण, गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल आणि बीएनपी इन्व्हेस्टमेंट एलएलपी यांचा समावेश आहे.

सुकाणू गुंतवणूकदारांच्या संख्येवर निर्बंध आहेत?

आयपीओ बाजारात दाखल करणारी कंपनी २५० कोटींपेक्षा कमी निधी उभारणार असेल तर किमान पाच आणि कमाल १५ सुकाणू गुंतवणूकदारांना समभाग वाटप करणे वैध आहे. तर २५० कोटींपेक्षा अधिक निधी उभारणीसाठी अतिरिक्त १० सुकाणू गुंतवणूकदारांना समभाग विक्रीची परवानगी देण्यात येते. प्रत्येक गुंतवणूकदाराला किमान ५ कोटी रुपये मूल्याचे समभाग वाटप करणे आवश्यक आहे.

‘सेबी’चे नियंत्रण या सुकाणू गुंतवणूकदारांवर कसे असते?

भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडून प्रारंभिक समभाग विक्रीतून उभारल्या जाणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबत नियम अधिक कठोर बनविले आहेत. अल्पावधीत कैक पटींनी परतावा गाठीशी बांधून मोकळे होणाऱ्या सुकाणू (अँकर) गुंतवणूकदारांना विद्यमान ३० दिवसांऐवजी किमान ९० दिवसांपर्यंत गुंतवणूक राखून ठेवणे बंधनकारक करावे, असा विचारप्रवाह आहे. विशेषत: तंत्रज्ञानावर आधारित नायका, पॉलिसीबझार किंवा झोमॅटो यांसारख्या कंपन्यांमध्ये सुकाणू गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात पैसा ओतला आणि अल्पावधीत चांगला नफा कमावून ते बाहेरही पडले. सुकाणू गुंतवणूकदार विहित ३० दिवसांचा कालावधी पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर समभाग मूल्यात मोठय़ा प्रमाणावर घसरण अनुभवास आली आहे. त्यामुळे सुकाणू गुंतवणूकदार हे समभाग सूचिबद्धतेच्या ३० दिवसांनंतर ५० टक्के गुंतवणूकच विकू शकतील, तर उर्वरित ५० टक्के त्यांना ९० दिवस ओलांडल्यावरच त्यांना विकता येतील, असा नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू करण्यात आला आहे. उशिराने का होईना पण बाजाराच्या विश्वासार्हतेसाठी आवश्यक ‘सेबी’चे पाऊल पडले आहे.

gaurav.muthe@expressindia.com