एखाद्या लेखकाची कादंबरी अनेकदा वाचली तरी कंटाळा येत नाही. काही कादंबऱ्या या चिरकाल टिकणाऱ्या असतात. सुहास शिरवळकर, विश्वास पाटील या मातब्बर लोकांच्या कादंबऱ्या आजही वाचक आवर्जून वाचतात. अशाच प्रसिद्ध होणाऱ्या कादंबरींवरून चित्रपट तयार केले जातात. ही परंपरा अगदी हॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य चित्रपटांपर्यंत सुरु आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे. दक्षिणेतील चोल साम्राज्याचा इतिहास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. दिग्दर्शक मणिरत्नम यांनी हे शिवधनुष्य पेललं आहे. मात्र हा चित्रपटदेखील ‘पोन्नियिन सेल्वन’ नावाच्या एका कादंबरीवर बेतलेला आहे. या कादंबरीविषयी जाणून घेऊयात.
पोन्नियिन सेल्वन कादंबरी :
‘पोन्नियिन सेल्वन’ म्हणजे पोन्नी (कावेरी नदी) चा मुलगा, ही कादंबरी कल्की कृष्णमूर्ती यांनी लिहिली होती. १९५० ते ५४ दरम्यान तामिळ मासिक ‘कल्की’ मध्ये दर आठवड्याला कादंबरीतील भाग छापण्यात आले होते. १९५५ साली मासिकेतील सर्व गोष्टी एकत्र करून त्याचे एक पुस्तक छापण्यात आले होते. या पुस्तकात चोल साम्राज्याचा शासकांमध्ये श्रेष्ठ मानला जाणारा राजराज पहिला याच्या सुरुवातीच्या काळातील कथा आहेत. चोल साम्राज्य हे जगातील एकमेव असे साम्राज्य होते जे प्रदीर्घ काळ टिकले होते. या काळात, तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेकडील संपूर्ण क्षेत्र चोलांच्या अधिपत्याखाली होते. अनेक इतिहासकारांनी या साम्राज्यबद्दल लिहून ठेवले आहे. पुरातत्वशास्त्रशास्त्रज्ञ शारदा श्रीनिवासन यांनी यापूर्वी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले होते की, ‘वास्तुकला कर्तृत्व आणि लेखन या गोष्टींमध्ये चोल दक्षिण भारतीय इतिहासातील सर्वात श्रीमंत राजवंशांपैकी एक म्हणून ओळखले गेले आहे’. कादंबरी ही काल्पनिक कथा असली तरी, ती घटनांवर आधारित आहे आणि चोल राजवंशातील पात्रांचा यात समावेश करते.
लेखक व्यंकटेश रामकृष्णन म्हणाले होते ‘तामिळनाडूच्या इतिहासाबद्दल लोकांना ज्ञान देण्यासाठी हे सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. हे पुस्तक वाचणारे लोक राज्याची संस्कृती आणि इतिहास वाचण्यासाठी प्रयत्न करतील’. व्यंकटेश रामकृष्णन यांनी या पुस्तकाचा पुढील भाग ‘कावेरी मैंथन’ या नावाने लिहला होता. कथानकासह वाचकाला खिळवून ठेवणारी’अशी या कादंबरीची ओळख निर्माण झाली होती. चोल राजवटीत झालेल्या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कादंबरीला खूप टीकेला सामोरे जावे लागले आहे.
कोण होते कल्की कृष्णमूर्ती :
आर कृष्णमूर्ती यांचा जन्म १८९९ साली झाला. ते लेखक होते त्याचबरोबरीने ते स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी अनेक लघुकथा, कादंबरी, निबंध, प्रवासवर्णने आणि चरित्रे लिहिली आहेत. कवी ज्याप्रमाणे टोपण नावाने लिहतात त्याचप्रमाणे त्यांनी ‘कल्की’ या टोपण नावाने लिहले आहे. ‘कल्की’ या नावाचे त्यांनी मासिकदेखील चालवले होते. त्यांचे बरेचसे लेखन हे तामिळनाडूच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पैलूंभोवती फिरते. ‘पोन्नियान सेल्वन’ व्यतिरिक्त ‘थियागा बूमी’ (१९३७), ‘सोलाईमलाई इलावरासी’ (१९४७), मगुदापाठी (१९४२), अपलैयिन कन्नीर (१९४७) ‘अलाई ओसाई’ (१९४८), ‘देवकीयिन कानवन’ (१९५०), ‘पोनिअन’ (१९५०) या कादंबऱ्या गाजल्या आहेत. १९५४ मध्ये क्षयरोगामुळे त्यांचे निधन झाले.
विश्लेषण : ३२०० कोटींचा श्री जगन्नाथ मंदिर विकास प्रकल्प नेमका कसा आहे? काय आहेत अडचणी? जाणून घ्या
कादंबरीची लोकप्रियता :
‘पोन्नियिन सेल्वन’ ही तामिळमधील सर्वाधिक विकली जाणारी कादंबरी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तब्बल ७२ वर्षांपूर्वी प्रकशित झालेली ही कादंबरी आजही विकली जात आहे. काही अंदाजानुसार, कादंबरीची वार्षिक विक्री आताही सुमारे १,००,००० प्रतींची आहे. हे पुस्तक लाखो तामिळ लोकांनी वाचले आहे. तामिळ संस्कृतीचा इतिहास, महान चोल साम्राज्य याबद्दल पुस्तकातून माहिती मिळाली अशा प्रतिक्रिया वाचकांच्या आहेत. मणिरत्नम यांचा पोन्नियिन सेल्वन चित्रपटाने हिंदी चित्रपटाला मागे टाकले आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने हे या कादंबरीचे यश आहे.
कादंबरीवरून चित्रपट तयार करताना अनेकदा दिग्दर्शक सिनेमॅटिक लिबर्टी घेतात, मात्र कधी कधी कथेतला मूळ गाभा नष्ट होतो. प्रख्यात दिग्दर्शक मणिरत्नम यांनी चित्रलतला योग्य न्याय दिला आहे. चित्रपट समीक्षण करणाऱ्या लोकांनीदेखील चित्रपटाचे कौतूक केले आहे.