नीलेश पानमंद
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्हा अजस्र अशा वाहन कोंडीचा सामना करत आहे. प्रमुख शहरांमधून जाणारे महामार्ग आणि अंतर्गत मार्गांवर अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पावसाळा सुरू झाला, खड्डे पडले त्यामुळे ही कोंडी झाली असे चित्र पुढे येत असले तरी ते खरे नाही. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या महामार्ग तसेच राष्ट्रीय मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नशिबी ही कोंडी बारा महिन्यांची आहे. भिवंडी परिसरात गेल्या काही वर्षांत हजारोंच्या संख्येने उभी राहिलेली गोदामे ही या कोंडीचे खरे तर मुख्य कारण आहे. दररोज हजारोंच्या संख्येने अवजड वाहने या गोदामांच्या दिशेने ये-जा करत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहनांची येजा करण्याच्या क्षमतेचे हे मार्ग नाहीत. वाटेल त्या पद्धतीने खाडीत, मोकळ्या जागेत भरणी करायची, त्यावर गोदामे उभी करायची आणि महिन्याकाठी कोट्यवधी रुपये भाड्यातून कमवणारी एक मोठी राजकीय, माफियांची साखळी या भागात वर्षानुवर्षे या गोदामांवर पोसली गेली आहे. आज मुंबई-नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण रस्ता, कल्याण-शीळ मार्ग, घोडबंदर मार्गाच्या नशिबी जे कोंडीचे दुखणे वाढले आहे त्याच्या मुळाशी ही बेकायदा गोदामांवर पोसली गेलेली व्यवस्था आहे हे लक्षात घ्यावे लागेल.
भिवंडीतील गोदामे कोंडीला कशी कारणीभूत?
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गोदामे उभी राहिली आहेत. या गोदामांची संख्या दोन लाखांच्या घरात आहे. ही गोदामे उभी रहात असताना स्थानिक स्वराज्य संस्था अथवा राज्य सरकारच्या प्राधिकरणांच्या कोणत्याही परवानग्या घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहतूक, मोकळ्या जागांचे नियोजन, वाहनतळ व्यवस्थांची आखणीच या भागात नाही. या गोदामांमध्ये देशभरातील विविध नामांकित कंपन्यांबरोबरच ई-काॅमर्स कंपन्या आपल्या वस्तूंची साठवणूक करून ठेवतात. त्यात इलेक्ट्राॅनिक वस्तू, कपडे, विविध साहित्य अशा वस्तूंचा समावेश आहे. तसेच अन्न-धान्य आणि रसायनांचाही साठा गोदामांमध्ये केला जात आहे. उरण येथील जेएनपीटी बंदरातून अवजड वाहनांमार्फत हे साहित्य गोदामांपर्यंत आणले जाते. त्यानंतर छोट्या वाहनांमार्फत त्याचे ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये वितरण केले जाते. पनवेल- मुंब्रा किंवा ऐरोलीमार्गे ही वाहने ठाणे शहरातून भिवंडीच्या दिशेने वाहतूक करतात. यामुळे शहरातील मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांचा भार वाढून कोंडी होते. याशिवाय, गुजरात आणि नाशिकच्या दिशेनेही अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्यामुळे घोडबंदर मार्गावरही कोंडी होते. केवळ पावसाळ्यातच महामार्गांवर वाहतूक कोंडी होत नाही तर, ही कोंडी वर्षाचे बारा महिने दिसून येते. पाऊस तसेच रस्त्यांवर पडणारे खड्डे यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगितले जात असले तरी, भिवंडीतील गोदामांच्या दिशेने दिवसभर सुरू असणारी अवजड वाहनांची वाहतूक हेच प्रमुख कारण असल्याचे दिसून येते.
सततच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था?
उरण येथील जेएनपीटी बंदरातून भिवंडी, गुजरात आणि नाशिकच्या दिशेने मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरु असते. त्यात भिवंडीतील गोदामांपर्यंत माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. या वाहनांची उरण ते भिवंडी अशी सतत वाहतुक सुरू असते. ही वाहने एरोली, मुंब्रा बाह्यवळण मार्गे वाहतूक करतात. माजीवाडा, कापुरबावडी तसेच खारेगाव भागातून ही वाहने भिवंडीतील गोदामांच्या दिशेने जातात. त्यातच साकेत खाडी पुलाजवळील रस्ता अरुंद असून याठिकाणी ऐरोली, मुंब्रा बाह्यवळण आणि घोडबंदर या तिन्ही मार्गावरून एकाच वेळी अवजड वाहने येत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. काशेळी, काल्हेर, पूर्णा मार्गेही अवजड वाहनांची गोदामांच्या दिशेने वाहतूक सुरू असते. याशिवाय, गोदामातील साहित्याचे ठाणे तसेच आसपासच्या शहरात वितरण करणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी असते. घोडबंदर मार्गेही गुजरातच्या दिशेने मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. या वाहतुकीसाठी दुपार आणि रात्रीच्या वेळा ठरवून देण्यात आल्या असल्या तरी या वाहनांची ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळेतही वाहतूक सुरु असताना दिसून येते. यामुळेच शहरांमध्ये अवजड वाहनांचा भार वाढून कोंडी होते. सततच्या वाहतुकीमुळे या रस्त्यांची दुरवस्था होऊन कोंडीत भर पडत आहे.
पर्यायी मार्गांची गरज का?
ठाणे जिल्ह्यातील शहरांतून अनेक महामार्ग जात असून ते शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचे मानले जातात. ठाणे शहरातून मुंबई-नाशिक तर, घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो. शहरातील नागरिकही याच मार्गावरून मार्गक्रमण करतात. अवजड वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गांची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे अवजड वाहनांची याच मार्गे वाहतूक सुरू असते. परिणामी वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका नागरिकांना बसतो. यापूर्वी खारेगाव ते गायमुख खाडीकिनारी मार्ग, श्रीनगर ते गायमुख असा डोंगरालगतचा मार्ग, शीळफाटा-मानकोली-खारबाव-चिंचोटी असा उन्नत मार्ग अशा विविध मार्गांचे पर्याय पुढे आले होते. रो-रो वाहतुकीचाही पर्याय पुढे आला होता. प्रत्यक्षात पुढे काहीच झालेले नाही. यामुळेच नाईलाजास्तव ही वाहतूक शहरांमधून सुरू आहे. वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून त्या तुलनेत रस्ते अपुरे पडत आहेत. पर्यायी रस्त्यांची कामे मार्गी लावली नाही तर भविष्यात कोंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अवजड वाहनांची शहराबाहेरून वाहतूक सुरू झाली तर, नागरिकांची कोंडीतून सुटका होण्याबरोबरच रस्त्यांचे आयुर्मान वाढेल, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गांची गरज असल्याचे दिसून येते.
नव्या लाॅजिस्टिक हबआधी नियोजन महत्त्वाचे का?
यापूर्वीची बेकायदा गोदामे आणि नव्याने उभी राहिलेली अथवा रहाणार असलेली गोदामे मिळून भिवंडी भागात नवे लाॅजिस्टिक हब उभे करण्याचा संकल्प यापूर्वीच एमएमआरडीए आणि राज्य सरकारने सोडला आहे. यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत आवश्यक ते बदल, सुधारणा करण्याची प्रक्रियादेखील सुरू आहे. कागदावर हे चित्र उत्तम दिसत असले तरी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र अशा मार्ग आखणीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा देशातील अव्वल दर्जाचे लाॅजिस्टिक हब उभे करायचे स्वप्न पूर्ण होत असताना अपुऱ्या नियोजनाचा भार प्रवाशांच्या माथी मारला जाईल.