मनोरंजन क्षेत्रात रोज काही ना काही घडामोडी घडत असतात. काल एक धक्कादायक बातमी समोर आली ती म्हणजे छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणात तिच्या आईने पोलिसात तिच्या कथित बॉयफ्रेंडच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिच्या आत्महत्येविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.
नेमकं काय घडलं :
तुनिषा शर्मा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या टिव्ही मालिकेत मुख्य भूमिका करत होती. या मालिकेचे शूटिंग वसई पुर्वेच्या कामण येथील भजनलाल स्टुडियोत सुरू होते. शनिवारी दुपारी मध्यंतरानंतर साडेतीन वाजता ती आपल्या मेकअप रूपमध्ये गेली आणि गळफास घेतला. ही बाब संध्याकाळी ५ वाजता सहकार्यांना समजली. तिला वसईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिने आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती.
विश्लेषण : सुशांत सिंह राजपूत ते तुनिषा शर्मा; यशस्वी लोक आत्महत्या का करतात?
पोलीस काय म्हणाले?
या प्रकरणावर पोलिसांनी भाष्य केलं आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव म्हणाले, “तुनिषा शर्मा अलिबाबा मालिकेतील अभिनेत्री आहे. तिने शुटिंग सुरू असतानाच स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा सहकलाकार शीजान खानला अटक करण्यात आली आहे. शीजानचे तुनिषाबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेमाच्या नैराश्येतूनच तुनिषाने ही आत्महत्या केली असं तिच्या आईचं म्हणणं आहे.”
याप्रमाणे पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर भारतीय दंड विधान कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला उद्या न्यायालयापुढे हजर केले जाईल,” अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
तुनिषाचा मृतदेह रात्री उशिरा मुंबईतील जे जे रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणण्यात आला होता. ४ ते ५ डॉक्टर तिच्या शवविच्छेदनच्या वेळी उपस्थित होते. तिचं शव हे रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. सध्या व्हिसेरा जतन करण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप याचा अहवाल समोर आलेला नाही तिच्या शवविच्छेदनानंतरच्या प्राथमिक निष्कर्षानुसार तिचा मृत्यू हा गळफास घेतल्यामुळेच झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
कोण आहे तुनिषा शर्मा :
तुनिषा शर्माचा जन्म चंडीगढचा, तिने वयाच्या १४ व्या वर्षी अभिनय करण्यास सुरुवात केली. तुनिषाने यापूर्वी ‘फितू’र, ‘बार बार देखो’, ‘दबंग ३’, ‘कहानी २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिरीये, मन बसिया, तू बैठे मेरे सामने, यासह काही संगीत व्हिडिओंमध्ये देखील दिसली होती.