महेश सरलष्कर

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत ‘इंडिया गेट’ ते राष्ट्रपती भवन या सुमारे ३ किमीच्या ऐतिहासिक ‘राजपथ’चे सुशोभीकरण करण्यात आले आहे. राजपथाचे नामांतर केले जाणार तो ‘कर्तव्यपथ’ नावाने ओळखला जाईल. करोना काळातही सुशोभीकरण सुरू होते. हे काम पूर्ण होण्यास १९ महिन्यांचा कालावधी लागला. या नव्या स्वरूपातील ‘सेंट्रल व्हिस्टा अॅव्हेन्यू’चे उद्घाटन ८ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरणही केले जाणार आहे. इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण रस्ता लोकांसाठी गुरुवारी औपचारिकरित्या खुला होणार असला तरी, प्रत्यक्षात शुक्रवारपासून लोकांना नव्या ‘सेंट्रल व्हिस्टा अॅव्हेन्यू’च्या सौंदर्याचा आस्वाद घेता येईल.

सुशोभित परिसरात सहलीसाठी बंदी?

इंडिया गेट परिसरात लोक सहलीसाठीही येत असत. तिथल्या हिरवळीवर सतरंजी, चटई टाकून खाण्या-पिण्यात, खेळ खेळण्यात रंगलेले असत. सुशोभीकरणानंतर इथे सहलीला बंदी घालण्यात आली आहे. ‘सेंट्रल व्हिस्टा अॅव्हेन्यू’च्या संपूर्ण पट्ट्यात उत्तम दर्जाच्या गवताचे थर बसवण्यात आलेले आहेत. या हिरवळीची काळजी घेणे आवश्यक असल्याने इंडिया गेटला लागून असलेल्या गवतावर सहलीसारख्या उपक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन सुविधांमध्ये चोरी आणि नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असून सुमारे ८० सुरक्षा रक्षक या भागावर लक्ष ठेवतील.

विश्लेषण: भारत आणि बांगलादेशमध्ये नेमका पाणी वाटपाचा काय वाद आहे? कुशियारा नदी करारामुळे कुणाचा फायदा?

दुतर्फा सुशोभिकरण…

राजपथाच्या दुतर्फा ३.९० लाख चौरस मीटरचा परिसर हिरवळीने सुशोभित करण्यात आला आहे. १५.५ किमीपेक्षा जास्त लांबीचे नवे लाल ग्रॅनाईट वॉकवे तयार केले गेले आहेत. संपूर्ण भागात १,१२५ वाहनांसाठी पार्किंगची सुविधा असेल. इंडिया गेटजवळ ३५ बसेससाठी पार्किंगची जागा तयार केली आहे. ७४ ऐतिहासिक प्रकाश खांबांसह ९०० हून अधिक नवे प्रकाश खांबही बसवण्यात आले आहेत. सुमारे १ हजारपेक्षा जास्त पांढरे आणि लाल वाळूचे खडक ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करून देत आहेत. संपूर्ण परिसरात ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. एक कृषी भवनाजवळ आणि दुसरा वाणिज्य भवनाजवळ पूर्वीप्रमाणे दोन कालव्यामध्ये नौकाविहाराला परवानगी दिली जाईल.

नवे काय काय असेल?

‘सेंट्रल व्हिस्टा’मध्ये पसरलेल्या आठ ‘व्हेंडिंग प्लाझां’मध्ये विविध प्रकारचे विक्रेते असतील, खासकरून आइस्क्रीम आणि अन्य खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. प्रत्येक प्लाझामध्ये ४० विक्रेते असतील. आठही प्लाझांमध्ये दिल्ली पर्यंटन विभागांकडून दुकाने उभारण्यात आली आहे. प्लाझांमध्ये साइटवर स्वयंपाक करण्यास परवानगी नाही. पण राज्या-राज्यांतील खाद्यान्नांची रेलचेल असून १६ राज्यांतील विविध चवींचे खाद्यपदार्थ चाखण्याची संधी असेल. आइस्क्रीम आणि इतर खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांसाठी निश्चित जागा, सहा नवीन पार्किंग लॉट्स; बसण्यासाठी ४०० पेक्षा जास्त बेंच; सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अॅम्फी थिएटर; महिलांसाठी ६४, पुरुषांसाठी ३२ आणि अपंगांसाठी १० स्वच्छतागृहे; अडथळा मुक्त क्रॉसिंगसाठी भुयारी मार्ग; १६ कायमस्वरूपी पदपथ पूल, पादचारी मार्ग ही नवी वैशिष्ट्ये असतील.

विश्लेषण : अमित शहांचे ‘मिशन मुंबई’ भाजपला फळणार का? मुंबई महापालिका राखणे उद्धवना जमणार का?

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण…

नवीन संसदेची इमारत, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी नवीन निवासस्थान आणि कार्यालय, मंत्रालयाच्या नवीन इमारती आणि उत्तर आणि दक्षिण ब्लॉक्सचे संग्रहालयात रूपांतर आदींचा समावेश असलेला एकूण १३,४५० कोटी रुपयांचा हा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प आहे. या वर्षी नोव्हेंबरपर्यंत संसदेची नवी इमारत पूर्ण केली जाणार असून संसदेचे हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीमध्ये घेतले जाईल. राजपथाचे सुभोभीकरण हा प्रकल्पाचा पूर्ण झालेला पहिला टप्पा असेल. २०२१मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या संचलनानंतर सुशोभीकरणाला सुरुवात झाली. या वर्षी २६ जानेवारीपर्यंत सुभोभीकरण पूर्ण होणे अपेक्षित होते. पुढील टप्प्यामध्ये केंद्रीय सचिवालयाच्या इमारतींच्या बांधकामास प्रारंभ होईल.