संजय जाधव
करोना विषाणूच्या नवनवीन उपप्रकारांमुळे संसर्गात अनेक वेळा वाढ झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे करोना विषाणूच्या नवीन उपप्रकारांवर सर्वच देशांचे बारकाईने लक्ष असते. सध्या ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा उपप्रकार ईजी.५.१ चा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने ब्रिटनला दक्षतेचा इशारा दिला आहे. एरीस या नावाने ओळखला जाणारा हा उपप्रकार आहे. यामुळे जगभरात आरोग्य यंत्रणा सावध झाल्या आहेत. यातच आता एरीसचा एक रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याची बाब समोर आली आहे. मात्र, राज्यात करोना संसर्गात फारशी वाढ झालेली दिसून आलेली नाही. एरीसमुळे संसर्गात किती वाढ होतेय आणि त्याचा नेमका धोका किती?
ब्रिटनमधील स्थिती काय?
ब्रिटनमध्ये एरीसमुळे संसर्गात मोठी वाढ झाली आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने ब्रिटनसह इतर देशांना खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सूचनाही संघटनेने सर्वच देशांना केली आहे. ब्रिटनमध्ये सध्या १० पैकी १ करोना रुग्ण हा एरीसचा आढळत आहे. याचबरोबर रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: लसीकरण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत आहे. ब्रिटनमध्ये करोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा रुग्णालयात दाखल होण्याचा ३० आठवडय़ांतील दर प्रति एक लाख लोकसंख्येमागे १.९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याआधी तो १.१७ टक्के होता.
ब्रिटनमध्ये संसर्ग वाढण्याची कारणे?
हवामानात बदल होताना करोना विषाणूच्या संसर्गात सर्वसाधारणपणे वाढ होते. संशोधकांच्या मते, आधीच्या संसर्गानंतर लोकांच्या शरीरात निर्माण झालेली रोगप्रतिकारक्षमता कमी झालेली आहे. याचबरोबर करोना लशीमुळे निर्माण झालेली शरीरातील प्रतिकारक्षमताही कमी होताना दिसत आहे. त्यामुळे करोना संसर्ग वाढला असण्याची शक्यता आहे. याचबरोबर नवीन उपप्रकार आल्यानंतर करोना संसर्गात वाढ झालेली प्रत्येक वेळी दिसून येते. आताही तसाच प्रकार झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ब्रिटनमधील आरोग्य व्यवस्थेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनाही खबरदारीचे उपाय अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एरीसची लक्षणे कोणती?
आधीच्या करोना विषाणूच्या उपप्रकारांप्रमाणेच एरीसची लक्षणे आहेत. त्यात सर्दी, शिंका, खोकला, ताप, थकवा, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, श्वास घेण्यास त्रास होत असल्याची लक्षणे बहुतांश रुग्णांमध्ये आढळून आलेली नाहीत. ओमायक्रॉनच्या आधीच्या प्रकारांपेक्षा हा उपप्रकार २० ते ४५ टक्के अधिक संसर्गजन्य आहे. करोनाचा हा उपप्रकार फारसा धोकादायक नसल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्यापासून बचाव करता येईल. लसीकरण न झालेल्यांनी लस घेतल्यासही त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊन संसर्गास प्रतिबंध होईल. असे असले तरी सातत्याने या उपप्रकारावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भारतात पहिला रुग्ण कधी सापडला?
एरीसचा संसर्ग ब्रिटनसह युरोप आणि आशियात नोंदविण्यात आला आहे. भारतासह जपानमध्ये हा उपप्रकार आढळला आहे. भारतात एरीसचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात सापडला होता. तो मे महिन्यात सापडला होता. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील विषाणू जनुकीय रचना तपासणी प्रयोगशाळेने त्याची देशात पहिली नोंद केली. या प्रयोगशाळेचे समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले की, एरीसचा पहिला रुग्ण मे महिन्यात आढळून आला. त्यानंतर जून आणि जुलै महिन्यांत आम्हाला एकही रुग्ण आढळला नाही. हा विषाणूचा प्रकार फारसा धोकादायक नाही. याचबरोबर पहिला रुग्ण सापडल्यानंतरच्या कालावधीत राज्यात संसर्गात मोठी वाढ झाल्याचेही आढळून आले नाही. नवीन उपप्रकाराचा रुग्ण आढळल्यानंतर राज्य सरकारसह केंद्र सरकारच्या आरोग्य यंत्रणांना माहिती कळविली जाते. त्यातून त्या उपप्रकारावर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य होते.
राज्यात रुग्णसंख्या किती?
राज्यात १ जानेवारी ते ८ ऑगस्ट या कालावधीत ओमायक्रॉनचे एक हजार ७३३ रुग्ण आढळले. त्यातील १९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १०९ आहे. या वर्षी राज्यात करोनामुळे एकूण १२६ मृत्यू झाले आहेत. त्यातील ७२.२२ टक्के ६० वर्षांवरील असून, ८४ टक्के सहव्याधीग्रस्त आणि १६ टक्के सहव्याधी नसलेले आहेत. राज्यातील करोना मृत्युदर १.८१ टक्के आहे. राज्यात केवळ ४ रुग्ण रुग्णालयात दाखल असून, त्यातील केवळ १ रुग्ण अतिदक्षता विभागात आहे. त्यामुळे करोना संसर्गाच्या बाबतीत घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.