राखी चव्हाण
वाघांच्या माणसांवरील हल्ल्याची तीव्रता आतापर्यंत उन्हाळय़ात अधिक होती, पण आता ती पावसाळय़ातही जाणवू लागली आहे. चंद्रपूर जिल्ह्यापुरता मर्यादित असणारा हा संघर्ष आता गडचिरोली जिल्ह्यातही सुरू झाला आहे हे गेल्या दोन महिन्यांतील घटनांनी दाखवून दिले आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळय़ात वाघांचे हल्ले वाढण्यामागील कारणे काय?

राज्यात बऱ्याच कालावधीनंतर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे घनदाट जंगलात वाघांना त्यांची शिकार शोधण्यात अडचणी येत आहेत. परिणामी वाघांनी त्यांचा मोर्चा गावाच्या सीमेवर चरणाऱ्या जनावरांकडे वळवला. मुसळधार पावसामुळे गुराखी जंगलात त्यांची जनावरे नेत नाहीत. गाव आणि जंगलाच्या सीमेवर चारा उपलब्ध असल्याने येथे जनावरे चराईसाठी नेली जातात. शिकारीच्या शोधात जंगलाबाहेर पडणारा वाघ या सीमेवरील जनावरांची शिकार करतो. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गुराख्यांवरही तो हल्ला करतो. शेतीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना कामासाठी जंगलालगतच्या त्यांच्या शेतात जावेच लागते. येथेही दडी मारून बसलेला वाघ त्यांच्यावर हल्ला करतो. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील अलीकडच्या घटनांवरून ते सिद्ध झाले आहे.

गावातील जनावरे वाघांच्या हल्ल्यात जास्त प्रमाणात बळी का पडतात?

चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांची संख्या वाढल्याने संरक्षित क्षेत्राएवढेच वाघ या क्षेत्राबाहेरदेखील आहेत. प्रामुख्याने ब्रह्मपुरी तालुक्यात ही संख्या अधिक असल्याने याच क्षेत्रात संघर्ष जास्त आहे. या परिसरातील सुमारे ८० टक्के वाघांचे भक्ष्य गावातील जनावरे आहेत. या परिसरात जंगल तुकडय़ात विभागले गेले आहे. त्यामुळे तृणभक्ष्यी प्राण्यांची संख्या अतिशय कमी आहे. परिणामी अनेकदा वाघ शेतशिवारात वास्तव्य करतो व जनावरांची शिकार करतो.

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील वाघांची स्थिती?

चंद्रपूर जिल्ह्यात क्षमतेपेक्षा वाघांची संख्या अधिक आहे. संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांचा विचार केल्यास ही संख्या आणखी जास्त भरते. ब्रह्मपुरी वनक्षेत्रात वाघ वाढत आहेत, तर गडचिरोली जिल्ह्यातही अलीकडच्या काही वर्षांत वाघांचा वावर दिसून येत आहे. आतापर्यंत या जिल्ह्यात वाघ दिसून येत नव्हते. या जिल्ह्यात आरमोरी, वडसा तालुक्यांत ३० पेक्षा अधिक वाघ आहेत. त्यामुळे येथेही मानव-वाघ संघर्ष सुरू झाला आहे.

वाघांच्या शिकारीची पद्धत कशी बदलते?

संरक्षित क्षेत्रातील आणि क्षेत्राबाहेरील वाघांची शिकार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. संरक्षित क्षेत्रात वाघांसाठी तृणभक्ष्यी प्राणी हे प्रमुख खाद्य आहे. तर या क्षेत्राबाहेर गेल्यानंतर गावातील जनावरे हे त्यांचे भक्ष्य असते. गाभा क्षेत्रातील वाघांची संख्या वाढत असल्याने जनावरांच्या शिकारीची सवय आता वाघाला लागली आहे. त्यामुळे वाघांच्या शिकारीतही आता वैविध्य येऊ लागले आहे. वनक्षेत्रानुसार वाघांचे सावज बदलत चालले आहे. त्याचा फटका मानवी समूहाला बसतो आहे.

हल्ले करणारे वाघ कोणत्या वयोगटातील?

आईपासून वेगळय़ा होणाऱ्या वाघाला शिकारीबद्दल औस्युक्य अधिक असते. नव्या अधिवासाच्या शोधात बाहेर पडणारा आणि नुकताच वयात येऊ लागलेला वाघ समोर येणाऱ्या जनावरांची शिकार करतो. पावसाळय़ात जंगल घनदाट असल्याने तृणभक्ष्यी प्राण्यांची शिकार सहज शक्य होत नाही. तर वय उलटून गेलेल्या वाघांची स्थितीही काहीशी अशीच असते. चराईसाठी येणाऱ्या जनावरांना हेरणे सोपे असल्याने हा संघर्ष वाढत आहे.

वन खाते संशोधनात कमी पडते काय?

मानव आणि वाघ संघर्ष सातत्याने होत असतानादेखील वन खाते पारंपरिक पद्धतीनेच या समस्येकडे बघत आहे. वाघांचे मार्गक्रमण शोधण्यासाठी संशोधनाचा वापर करणारे वन खाते संघर्षांची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्याचा वापर करण्यास तयार नाही. जीपीएसच्या माध्यमातून हल्ल्याचे ठिकाण खात्याला सहज कळते. हा जीपीएस डाटा गोळा केला तर सर्वाधिक हल्ले कोणत्या क्षेत्रात होतात याची माहिती मिळू शकते. त्या दृष्टीने या क्षेत्रातील अभ्यासकांनी खात्याकडे हा डाटा मागितला होता. मात्र, खात्याकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. खात्याने त्या वेळी सहकार्य केले असते तर संशोधनाअंती हा संघर्ष बराच कमी करता आला असता.

वन कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत खाते गंभीर आहे का?

गावात राहणारा वन कर्मचारी हा गावकरी आणि खात्यातील दुवा असतो. गावकऱ्यांशी होणाऱ्या संवादातून त्यांच्या समस्या सोडवण्यात मोठी मदत होते. त्यातूनच संघर्ष थांबवण्यासाठी गावकऱ्यांची मदत घेतली जाऊ शकते. चंद्रपूरसारख्या मानव-वाघ संघर्ष असणाऱ्या क्षेत्रात तरी क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांची पदे रिक्त नसावीत, पण तेथेही पदे रिक्त आहेत. त्यामुळे या संघर्षांबाबत वन खाते आणि शासन खरोखरच गंभीर आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. एकाच कर्मचाऱ्यावर दोन ते तीन पदांचा कार्यभार देण्यात आल्याने त्याचा परिणाम कामावर होत आहे. त्यामुळे संघर्षांच्या मुळाशी जाऊन हल्ले रोखण्यात खात्याला अपयश येत आहे.

गावकऱ्यांमध्ये जनजागृती कोण करणार?

गडचिरोली जिल्ह्यात यापूर्वी वाघांचा वावर नव्हता. त्यामुळे या जिल्ह्यातील गावकऱ्यांना मानव-वाघ संघर्ष म्हणजे काय, तो कसा हाताळायचा, याची सवय नव्हती. आता वाघांची संख्या फार नसली तरीही वाघांचे हल्ले मात्र सुरू झालेत. ऐन पावसाळय़ात या घटना घडत असल्याने वडसा, आरमोरी या परिसरातील गावकऱ्यांचे बळी जात आहेत. वाघांची संख्या वाढली म्हणजे संघर्ष हा आलाच. अशा वेळी संघर्षांची परिस्थिती कशी हाताळायची याविषयी गावकऱ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक होते, पण त्यात वन खाते अपयशी ठरले आहे.