पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ‘द टायर एक्टिंग्विशर’ संघटनेने काही दिवसांपूर्वी आठ देशांमधील ९०० एसयुव्ही गाड्यांचे टायर पंक्चर केले होते. या गाड्यांमुळे प्रदुषण वाढत असल्याचा दावा ‘द टायर एक्टिंग्विशर’च्या कार्यकर्त्यांनी केला. याबाबत त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर निवेदन जारी करत कार्बन उत्सर्जित करणाऱ्या गाड्यांविरोधात केलेल्या आंदोलनापैकी हे एक असल्याचे ते म्हणाले. तसेच ही सुरुवात असून आणखी बऱ्याच गोष्टी बाकी आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र, हे ‘द टायर एक्टिंग्विशर’ नेमके कोण आहेत? आणि हे प्रकरण नेमकं काय आहे? सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा – विश्लेषण : ओडिशा सरकार का करत आहे ‘बालस्नेही’ पोलीस स्टेशनची निर्मिती?
‘द टायर एक्टिंग्विशर’ कोण आहेत?
‘द टायर एक्टिंग्विशर’ पर्यावरणासाठी काम करणारी सामाजिक संघटना आहे. या संघटनेची सुरुवात २०२१ मध्ये झाली होती. हवामान बदल, वायू प्रदुषण, जलप्रदुषण यासारख्या मुद्द्यांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न या संघटनेकडून करण्यात येतो. दरम्यान, ”आम्ही सामान्य लोकं असून ४*४ गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणापासून जगाला वाचवणे हा आमचा उद्देश आहे”, असं ‘द टायर एक्टिंग्विशर’ने त्यांच्या वेबसाईटवर नमूद केलं आहे.
‘द टायर एक्टिंग्विशर’ने गाड्यांचे टायर पंक्चर का केले?
या संघटनेने आता एक अनोखी मोहीम हाती घेतली असून या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुमारे ९०० गाड्यांचे टायर पंक्चर केले आहेत. या गाड्यांमुळे प्रदुषण वाढत असल्याचा दावा ‘द टायर एक्टिंग्विशर’च्या कार्यकर्त्यांनी केला आहे. ”एसयुव्ही (SUVs) आणि ४*४ लोकांच्या आरोग्यासाठी, लोकांच्या सुरक्षेसाठी आणि पर्यावरणासाठी धोकादायक आहे. या गाड्यांमुळे आपल्या शहरामधील हवा प्रदुषित होत आहे. मात्र, सरकार आणि राजकारणी या गाड्यांपासून आपले रक्षण करण्यासाठी असमर्थ आहेत. त्यामुळे आम्ही हे आंदोलन हाती घेतल्याचे ‘द टायर एक्टिंग्विशर’ने म्हटले आहे.
”टायर पंक्चर करणे आणि इतरांना तसे करण्यासाठी प्रोत्साहित करणे ही छोटी गोष्टी असली तरी या धोकादायक गाड्या रस्त्यावर फिरणे कमी होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ”आम्हाला स्वच्छ हवा आणि सुरक्षित वातावरण असलेल्या शहरांमध्ये राहायचे आहे. त्यामुळे आता केवळ निषेध करून चालणार नाही. आता आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आम्हाचा कोणीही नेता नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आंदोलनात सहभागी व्हावे”, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हेही वाचा – विश्लेषण: ६ दिवसात १० लाख युजर्स, एलॉन मस्कने केलं कौतुक, गुगलपेक्षा अचूक उत्तर देणारं ChatGPT कसं करतं काम?
‘या’ आठ देशांमध्ये करण्यात आले आंदोलन
द गार्डियनच्या वृत्तानुसार, ‘द टायर एक्टिंग्विशर’च्या कार्यकर्त्यांनी नेदरलँड्समधील अॅमस्टरडॅम आणि एन्शेडे, फ्रान्समधील पॅरिस आणि ल्योन, जर्मनीतील बर्लिन, बॉन, एसेन, हॅनोव्हर आणि सारब्रुकेन, यूकेमधील ब्रिस्टल, लीड्स, लंडन आणि डंडी, स्वीडनमधील माल्मो, इन्सब्रुक येथे गटांनी कारवाई केली. ऑस्ट्रियामध्ये, स्वित्झर्लंडमधील झुरिच आणि विंटरथर आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील ९०० गाड्यांचे टायर पंक्चर केले.
यापूर्वी करण्यात आले होते आंदोलन
‘द पिपल्स मॅगझीन’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘द टायर एक्टिंग्विशर’ने मार्च २०२२ ते जुलै २०२२ दरम्यान जगभरातील पाच हजार गाड्यांचे टायर पंक्चर केल्याचा दावा केला आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘द पिपल्स मॅगझीन’चे संपादक अॅना कॅल्डेरोन यांची गाडीही पंक्चर करण्यात आली होती. ”आम्ही तुमच्या गाडीचा टायर पंक्चर केला आहे. तुम्हाला राग येईल, पण कृपया राग मानून घेऊ नका”, असा संदेश त्यांच्या गाडीवर लिहिण्यात आला होता. दरम्यान, पर्यावरणासाठी टायर पंक्चर करण्याशिवाय इतरही अनेक मार्ग आहेत, अशी प्रतिक्रिया कॅल्डेरोन यांनी याहू न्यूजला दिली होती.