इटलीमधील व्हेनिस शहर म्हटलं की या शहरातील कालवे पटकन डोळ्यासमोर येतात. विविध चित्रपटांच्या माध्यमातून या कालव्यांचे अनेकदा मोहक असे दर्शन झाले आहेत. सध्या या व्हेनिस शहरातील कालवे सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. पाण्यांनी भरलेले कालवे ज्यामधून छोट्या मोठ्या होड्यांची-नावांची सतत वाहतूक सुरु असते ते कालवे चक्क पाण्याविना कोरडे पडले आहेत.
व्हेनिस शहर आणि कालवे
इटली देशाच्या उत्तर भागात पूर्व किनाऱ्यावर ऐतिहासिक व्हेनिस हे शहर वसलेलं आहे. ११८ लहान बेटांनी मूळ व्हेनिस शहर बनले आहे. काळाच्या ओघात आता याचा विस्तार होत किनारपट्टीवर जमिनीवर वसलेला भागही आता व्हेनिस शहराचाच भाग म्हणून ओळखला जातो. असं असलं तरीही बेटांचे व्हेनिस शहर आणि त्यामधील कालवे ही व्हेनिस शहराची मुख्य ओळख आजही कायम आहे. जवळपास १५० विविध आकाराच्या कालव्यांद्वारे, बेटांना जोडणाऱ्या लहान मोठ्या सुमारे ३९० ब्रीज- उड्डाणपुलांनी हे व्हेनिस शहर एकमेकांशी जोडले गेले आहे. हा शहराचे दैनंदिन व्यवहार, पर्यटन व्यवसाय हा पूर्णपणे या कालव्यांवर अवलंबून आहे.
व्हेनिस शहराची लोकसंख्या २६ लाखांच्या घरात असून सुमारे ५५ हजार नागरीक हे मुख्य – बेटांचे शहर असलेल्या मूळ व्हेनिसमध्ये निवास करतात.
Venetian Lagoon या खाडीमुळे खऱ्या अर्थाने व्हेनिस शहराच्या निर्मितीस हातभार लागला. कारण यामुळे थेट खवळलेल्या समुद्राचा सामना व्हेनिस शहराला करावा लागत नाही. खाडीमधील एका बाजूला पाण्यामध्ये हे बेटांचे शहर आहे. भरती ओहोटीमुळे या शहरातील पाणी कमी जास्त होत असते, बेटांवर असलेल्या या शहरातून जलप्रवासाचा आनंद यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने लुटता येतो.
सध्या काय परिस्थिती आहे?
सध्या व्हेनिस शहरातील काही कालव्यांमध्ये पाणी नसल्याने हे कालवे कोरडे पडले आहेत. त्यामुळे याचा दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी ये-जा ही फक्त कालव्याच्या माध्यमातून जलवाहतुकीमुळेच शक्य आहे अशा ठिकाणी मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. साधी वैद्यकीय मदत काही ठिकाणी पोहचवणे अवघड झाली आहे. सर्व कालवे हे एकमेकांना जोडले आहेत. मात्र काही कोरड्या कालव्यांमुळे पूर्वीप्रमाणे सर्वच ठिकाणी जलवाहतूक करणे आता अशक्य झाले आहे. या कोरड्या कालव्यांचा सर्वात मोठा फटका पर्यटनाला बसला आहे.या शहरात कालव्यांवर आठ प्रसिद्ध ब्रीज-उड्डाणपुल आहेत. यापैकी काही ब्रीजच्या ठिकाणी कोरड्या कालव्यांमुळे ते एक प्रकारे भकास दिसत आहेत.
कालवे कोरडे का पडले?
एक वेगळ्या वातावरणाचा परिणाम या व्हेनिस शहरावर झाला असल्याचं हवामान अभ्यासकांचं म्हणणं आहे. वातावरणात उच्च दाब निर्माण झाल्यामुळे ओहोटीचे प्रमाण हे प्रभावी ठरले आहे. तर काहींचे म्हणणे आहे की या शहराच्या परिसरातील खाडीला मिळणाऱ्या नद्यातील पाण्याचे प्रमाण दुष्काळामुळे कमी झाले आहे.
इटलीत काय परिस्थिती आहे?
इटलीमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही शतकांतील सर्वात मोठ्या दुष्काळाच्या तोंडावर इटली देश आहे. देशातील अनेक नदी-तलाव हे आटले आहेत किंवा त्यांची पाण्याची पातळी कमी झाली आहे. इटलीच्या पश्चिम उत्तर भागात असलेल्या Alps या पर्वतररांगेत गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्ध्या सरासरी एवढी बर्फवृष्टी झाली आहे. त्याचे परिणाम आता दिसत असून नद्यांमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा केला जात आहे.
जागतिक वातावरणातील बदलांचा एक मोठा परिणाम इटली देशावर होत असून त्याचा विविध प्रकारे फटका बसत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे, व्हेनिसमधील कोरडे पडलेले कालवे हे एक त्याचे उदाहरण म्हणावे लागेल.