देशामध्ये करोनाची दुसरी लाट थैमान घालत असतानाच दुसरीकडे बायो-बबल्स च्या सुरक्षेमध्ये देशातील काही मोजक्या शहरांमधील मैदानांवर आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन केलं जात आहे. मात्र आता या बायो-बबल्स चा फुगा फुटला असून सर्व नियमांचे पालन करुन बायो-बबल्समध्ये राहूनही कोलकाता नाइटराइडर्सच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय. याच कारणामुळे आज म्हणजेच ३ मे २०२१ रोजी होणारा कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर ४ मे रोजी संपूर्ण आयपीएल स्पर्धाच अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येत असल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पष्ट केलं. मात्र ज्या बायो-बबल्सच्या जोरावर आयपीएलचे आयोजन करण्यात आलं ते बायो-बबल्स नक्की असतं तरी काय?
बायो-बबल्स म्हणजे काय?
जगभरातील क्रीडा विश्वाने करोनाचा फैलाव झाल्यानंतर बराच काळ परिस्थिती पूर्ववत होण्याची वाट पाहिली मात्र त्यानंतरही परिस्थिती फारशी सुधारली नाही. अखेर बायो-बबल्सच्या माध्यमातून करोना काळामध्ये खेळ अधिक सुरक्षित करत क्रीडा जगताने चाहत्याचं मनोरंजन या संकटाच्या काळातही होत राहील याची काळजी घेतली. बायो-बबल्स ही एक संकल्पना असून यामध्ये सॅनिटाइज करण्यात आलेल्या एखाद्या ठराविक परिसरामध्ये किंवा ठिकाणावर ठरवून दिलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जातो. विशेष म्हणजे बायो-बबल्समध्ये प्रवेश देण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक असतं.
एक प्रकारचं आयसोलेशनच…
खरं तर बायो-बललमधील जागा या एखाद्या आयसोलेशन सेंटरसारख्याच असता. अगदीच मोजक्या व्यक्तींना तेथे प्रवेश असतो. बाहेरच्या जगाशी केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या व्यक्तींचा संपर्क असतो. एकदा का बायो-बबल्समधील व्यक्तीला बाधा झाली ती त्या बबल्समध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाता येत नाही किंवा नव्या व्यक्तीला त्या परिसरामध्ये प्रवेश दिला जात नाही.
जगभरातील या स्पर्धांमध्ये करण्यात आलाय वापर
बायो-बबल्सअंतर्गत येणारा संपूर्ण परिसर पूर्णपणे सॅनिटाइज केलेलं असल्याने त्या ठिकाणावर विषाणू नसतात किंवा तिथे जाणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून विषाणूंचा प्रादुर्भाव होत नाही असं समजलं जातं. आयपीएलबरोबरच, अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा म्हणजेच युएस ओपन, एनबीएसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये मागील एका वर्षापासून बायो-बबल्सचा यशस्वी प्रयोग केला जात आहे.
एवढे नियम की विचारता सोय नाही
मात्र हे बायो-बबल्स सुरक्षित वाटतं असले तरी त्यामध्ये राहणाऱ्या खेळाडूंना अनेक नियमांचं पालन करावं लागतं. मानिसक दृष्ट्या या बायो-बबल्समध्ये राहणं फार आवाहात्मक असतं असं अनेक खेळाडू सांगतात. बायो-बबल्सच्या नियमांअंतर्गत ठरवून दिलेल्या परिसराबाहेर कोणत्या गोष्टींना हात लावायचा, कोणत्या गोष्टींना हात लावायचा नाही यासारख्या छोट्या छोट्या नियमांपासून ते अगदी कोणाशी बोलायचं कोणाशी नाही असे अनेक नियम आखून दिले जातात. त्याचं पालन करणं खेळाडूंना बंधनाकरक असतं तसं न केल्यास ते नियमांचे उल्लंघन मानून त्या खेळाडूंचं निलंबन करण्याचा अधिकार आयोजकांना असतो असं जगभरातील स्पर्धांमध्ये दिसून येत आहे.
प्रवासादरम्यान खास व्यवस्था
अनेकदा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रवास किंवा देशांतर्गत प्रवास करावा लागतो. अशावेळी, बसेस, विमाने या गोष्टींना सॅनिटाइज करुन या माध्यमातून विषाणूचा फैलाव होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते.
कोणती ठिकाणं असतात बायो-बबल्समध्ये?
बायो-बबल्समध्ये प्रामुख्याने ज्या हॉटेलमध्ये खेळाडूंच्या राहण्याची सोय केली आहे त्या हॉटेलमधील काही भाग, स्टेडियममधील काही भागांचा समावेश असू शकतो. उदाहरण घ्यायचं झालं तर युएस ओपनच्या वेळी पार्किंग लॉट हा बायो-बबल्सचा भाग नसल्याने खेळाडूंना हॉटेलसमोरुन पीक करुन पुन्हा तिथेच सोडलं जायचं.
चाचण्या चाचण्या आणि चाचण्या…
अनेकदा एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा देशात जाताना प्रत्येक खेळाडूची आणि संघासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. चाचणीचा निकाल नकारात्मक असेल तर त्यांना प्रवासाला परवानगी देण्यात येते. निश्चित स्थळी पोहचल्यानंतर पुन्हा खेळाडूंची चाचणी केली जाते. प्रवासादरम्यान त्यांना संसर्ग झाला नसेल याची खात्री करण्यासाठी ही तपासणी केली जाते. चाचणीचे निकाल येईपर्यंत या खेळाडूंना विमातनळाबाहेर पडता येत नाही.
तंत्रज्ञानाचाही होतो वापर, आयपीएलमध्ये वापरलेले ब्यू टूथ बॅण्ड
प्रत्येक आयोजक बायो-बबल्स अधिक सुरक्षित राहतील यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करतात. मागील वर्षी दुबईत झालेल्या आयपीएलदरम्यान प्रत्येक खेळाडूला ब्यू ट्यूथ बॅण्ड देण्यात आले होते. हे खेळाडू बाहेरच्या व्यक्तीच्या दोन मीटरपेक्षा कमी अंतरावर असले की हे बॅण्ड बीप बीप आवाज करुन त्यांना सतर्क करायचे. युएस ओपनमध्येही प्रत्येक खेळाडूला विशेष कार्ड देण्यात आलं होतं. त्यामुळे हा खेळाडू कोणाच्या संपर्कात आला हे समजणारं तंत्रज्ञान यात वापरण्यात आलं होतं.