आपल्या सूर्यमालेत आठ ग्रह आहेत, फक्त पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे, तर मंगळ ग्रहावर लाखो वर्षांपूर्वी सजीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे, बुध आणि शुक्र सोडले तर कोणत्याही ग्रहाला चंद्र नाहीत, शनी ग्रहाभोवती मोठ्या प्रमाणात कडी आहेत, गुरु ग्रह हा पृथ्वीपेक्षा हजार पटींनी मोठा आहे…सूर्यमालेताली हे सर्व आठ ग्रह अशा विविध वैशिष्ट्यांनी खचाखच भरलेले आहेत. आपला सूर्य हे एक तारा आहे, जसं आपल्या ताऱ्याला आठ ग्रह आहेत तसं अवकाशातील इतर ताऱ्यांना सुद्धा ग्रह असण्याची शक्यता ही २० व्या शतकाच्या आधीपासून मांडली जात आहे.
Exoplanets म्हणजे काय?
अवकाशात असलेल्या विविध ताऱ्यांभोवती असलेल्या ग्रहांना exoplanets म्हणजे सूर्यमालेबाहेरील ग्रह या नावाने ओळखले जाते. पृथ्वीबाहेर पाठवलेल्या अवकाश दुर्बिण आणि तसंच पृथ्वीवरील विविध दुर्बिणींच्या माध्यमातून आपल्या सूर्यमालेबाहेर इतर ताऱ्यांच्या भोवती असलेल्या ग्रहांचा शोध गेली तीन दशके सुरु आहे. आत्तापर्यंत असे पाच हजार पेक्षा, नासाच्या (NASA) आकडेवारीनुसार नेमकं सांगायचं तर पाच हजार २९७ ग्रह शोधण्यात आले आहेत.
Exoplanets चे महत्व काय?
जसं आपल्या सूर्याभोवती विशिष्ट अंतरावर पृथ्वीचे स्थान आहे, ज्यामुळे सूर्याची फार उष्णताही पोहचत नाही, पृथ्वी ग्रह फार थंडही होत नाही. त्यामुळेच पृथ्वीवर सजीवसृष्टीला पूरक तापमान निर्मिती होत जीवसृष्टीची निर्मिती झाली आहे. पृथ्वी व्यतिरिक्त इतर सात ग्रहांवर किंवा त्यांना असलेल्या त्यांच्या चंद्रांवर जीवसृष्टी आहे का याचा आपण शोध घेत आहोत. तेव्हा प्रश्न असा आहे की जसं आपल्या आकाशगंगेत किंवा विश्वातील आकाशगंगेत अब्जावधी तारे आहेत, त्यापैकी काही ताऱ्यांभोवती ग्रह असू शकतात, यापैकी काही ग्रहांवर जीवसृष्टी लायक वातावरण असू शकते, यापैकी काही ग्रहांवर प्रत्यक्ष जीवसृष्टी असू शकते असा एक अंदाज आहे, याबाबत एक कुतूहल आहे. त्यामुळेच आपल्या सूर्यमालेत जीवसृष्टीचा शोध घेण्याबरोबर इतर ताऱ्यांभोवती ग्रह आहेत का याचा शोध घेत आहे. त्यामुळेच अवकाश संशोधकांमध्ये-अभ्यासकांमध्ये exoplanets चे महत्व आहे.
James Webb telescope ने नेमकं काय केलं?
अवकाशात प्रक्षेपित केलेली आत्तापर्यंतची सर्वात शक्तीशाली आणि महागडी दुर्बिण म्हणून James Webb telescope ची ओळख आहे. डिसेंबर २०२१ ला ही दुर्बिण अवकाशात प्रक्षेपित करण्यात आली आणि जुलै २०२२ ला तिने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. अवकाशातील अब्जावधी अंतरावरील घटकांची सुस्पष्ट छायाचित्रे या दुर्बिणीमार्फत काढली जात आहेत. या दुर्बिणीने पहिल्या exoplanets चा शोध लावला आहे. त्यामुळे सूर्यमाले बाहेरील ग्रहांच्या संख्येत आणखी एका ग्रहाची भर पडली आहे.
या शोधाचे नेमकं वैशिष्टय काय आहे?
James Webb telescope ने पृथ्वीपासून सुमारे ४० प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या LHS 475 या red dwarf ( सूर्याच्या तुलनेत थंड तारा ) या प्रकारातील ताऱ्याभोवती असलेल्या LHS 475 b या ग्रहाचा शोध लावला आहे. नुसता या ग्रहाचा शोध लावला नसून त्या ग्रहावर असलेल्या वातावरणात कोणते घटक आहेत याचाही शोध लावला आहे. आत्तापर्यंत नुसते ग्रहांचा शोध लावण्यात आले होते, मात्र आता James Webb telescope ने एक पाऊल पुढे टाकले आहे. ग्रहाभोवती असलेल्या वातावरणावरुन तो ग्रह कसा असेल, ग्रह हा पृथ्वीप्रमाणे असू शकतो का वगैरे या गोष्टीचा अंदाज लावता येऊ शकतो. तेव्हा James Webb telescope मुळे आता exoplanets चे अंतरंग समजण्यास मदत होणार आहे.
exoplanets शोधणे आव्हानात्मक
अब्जावधी नाही तर कित्येक प्रकाशवर्षे दूर असलेल्या ताऱ्यांभोवती असलेले ग्रह शोधणे हे अत्यंत आव्हानात्मक आहे. संबंधित ताऱ्याची छायाचित्रे घेतली जातात आणि या दरम्यान ताऱ्याची प्रकाश तीव्रता कुठे कमी झाल्याचं आढळलं तर हा प्रकाश ताऱ्याभोवती असलेल्या ग्रहामुळे अडत असल्याचा अंदाज लावण्यात येत आणि मग आणखी सखोल निरिक्षणे केली जातात. त्यानंतर त्या ताऱ्याभोवती ग्रह आहे असा ठोस निश्कर्ष काढला जातो.