हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात आकस्मिक आलेल्या पुरामुळे २१ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) आणि राज्य दलाच्या पथकांकडून पूरात अडकलेल्या लोकांना मदत करण्यात येत आहे. मात्र, हिमाचल प्रदेशमध्ये आलेला हा आकस्मिक पूर नक्की काय आहे. साधारण पूर आणि या पुरामध्ये नेमके काय अंतर आहे? आणि भविष्यात अशा प्रकारच्या पुरांचे प्रमाण वाढणार का? जाणून घेण्यााठी हा लेख वाचा.
आकस्मिक पूर आणि साधारण पूरांमध्ये काय फरक?
आकस्मिक पूर हा जास्त, सतत पाऊस पडल्यामुळे किंवा काही दिवसांच्या साचलेल्या पाण्यामुळे येऊ शकतो. परंतु अशा प्रकारच्या पूरांचे प्रमाण खूप कमी आहे. अमेरिकेची हवामान संस्था, नॅशनल वेदर सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार अती पावसामुळेही केवळ ६ तासांमध्ये पूर येऊ शकतो. मात्र, केवळ पावसामुळेच नाही तर इतर कारणांमुळेही आकस्मिक पूर येऊ शकतो. उदा. धरणात सोडण्यात आलेल्या पाण्याचा वेग जास्त असेल किंवा धरणातील पाण्याने आपली पातळी ओलांडली असेल तर अशा प्रकारचे पूर येऊ शकतात.
हेही वाचा- विश्लेषण : रोहिंग्या : निर्वासित की बेकायदा स्थलांतरित?
भारतात आकस्मिक पूर बहुतेक वेळा ढगफुटींशी संबंधित असतात. कमी कालावधीत अचानक आणि तीव्र पावसामुळे अशा प्रकारचे पूर येतात. तसेच हिमालयात हिमनद्या वितळून नद्यांच्या पाण्यात झालेल्या वाढीमुळेही आकस्मिक पूर येऊ शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या पूरांची संख्या वाढली आहे.
आकस्मिक पूर आणि साधारण पूरांमध्ये कोणत्या समान गोष्टी आहेत?
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या एका प्रकल्पातील सरकारी आकडेवारीनुसार, बांगलादेशानंतर भारत हा जगातील दूसरा पूरग्रस्त देश आहे. भारतात पुरामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्याही अधिक आहे. चेन्नई आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये अशाच प्रकारे अचानक पूर आला आहे. ओडिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशसारख्या भागांमध्येही चक्री वादळांमुळे अचानक पूर आला आहे.
भारतात जवळपास ७५ टक्के पाऊस हा चार महिन्यांमध्ये (जून ते सप्टेंबर) होतो. परिणामी या महिन्यांत नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो. राष्ट्रीय पूर आयोगानुसार देशातील सुमारे ४० दशलक्ष हेक्टर जमीन सध्या पूरग्रस्त आहे. दरवर्षी सरासरी १८.६ दशलक्ष हेक्टर जमीनीला पूराचा फटका बसतो.
हेही वाचा- विश्लेषण : केरळ सरकारची ई-टॅक्सी सेवा कशी आहे? महाराष्ट्रात हे शक्य होईल का?
झाडे तोडण्यामुळेही पूराचा धोका
जंगले नष्ट होण्यामुळेही पूर येण्याचा धोका असतो. सिमेंटचे जंगल उभारण्याच्या नादात माणसांकडून मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. वणव्यामुळेही अनेक झाडे जळून खाक होतात. परिणामी मातीची गुणवत्ता ढासाळते. मातीकडून कमी प्रमाणात पाणी झिरपले जाते आणि पुराचा धोका वाढतो.
अमेरिकेचे हवामानशास्त्रज्ञ अँड्र्यू होएल यांनी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार आगीमुळे नुकसान झालेल्या जमिनीवर मुसळधार पाऊस पडल्यास जमिनीच्या पृष्ठभागावरचे पाणी तितक्या प्रभावीपणे शोषले जात नाही. परिणामी आकस्मिक पूराचा धोका वाढू शकतो.
विकास कामे करताना पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे
सध्याच्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा एक मार्ग म्हणजे डोंगराळ भागातील जमिनींची काळजी घेणे. त्यांची देखरेख करणे. हिमाचल प्रदेश सारख्या भागांमध्ये विकास कामे करताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मुख्य म्हणजे जमिनीच्या ऱ्हासाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची माहिती भारतीय हिमनद्या शास्त्रज्ञ सय्यद इक्बाल हसनैन यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिली.