मुंबईतील मरिन ड्राईव्हवरील दोन इमारतींमधील रहिवाशांनी गेल्या आठवड्यात हाय टाईडदरम्यान घरांमध्ये कंपने जाणवल्याची तक्रार केली आहे. यासंबंधी त्यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिलं आहे. कोस्टल रोड प्रकल्पासाठी टेट्रापॉड्स हटवण्यात आल्यानेच भरतीच्या वेळी ही कंपने जाणवत असल्याचं त्यांनी या पत्रात सांगितलं आहे. अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाची जबाबदारी आहे.
टेट्रापॉड्स म्हणजे काय?
ग्रीकमध्ये टेड्राचा अर्थ चार पायांचा असा आहे. काँक्रिटचे हे टेट्रापॉड्स समुद्रकिनाऱ्यावर लावले जातात. हवामान आणि लाटांच्या आघातामुळे किनाऱ्याची होणारी धूप रोखण्यासाठी याचा वापर होतो.
सर्वात प्रथम १९४० मध्ये फ्रान्समध्ये समुद्रापासून किनाऱ्याची सुरक्षा करण्यासाठी टेट्रापॉड्सचा वापर झाला होता. लाटांचा आघात कमी करण्यासाठी हे टेट्रापॉड्स एकत्रित ठेवले जातात. आकारने मोठे असणाऱ्या या टेट्रापॉड्सचं वजन १० टनपर्यंत असतं. इंटरलॉक करण्यात आलेले टेट्रापॉड्स कुंपणाप्रमाणे काम करतात. लाटांचा आघात कमी करत ते स्थिर राहतात.
दक्षिण मुंबईतील मरिन ड्राईव्हला १९९० मध्ये लाटांना रोखण्याच्या आणि किनाऱ्याची सुरक्षा करण्याच्या हेतूने प्रत्येकी दोन टन वजनाचे टेट्रापॉड्स बसवण्यात आले होते.
मग मरिन ड्राईव्हमधून टेट्रापॉड्स हटवले का जात आहेत?
कोस्टल रोड प्रोजेक्टचं काम सुरु असल्याने तात्पुरत्या स्वरुपासाठी टेट्रापॉड्स काढण्यात आले आहेत. हा कोस्टल रोड १०.५८ किमी लांबीचा आहे. मरिन ड्राईव्हमधील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सी लिंकपर्यंत (वरळीच्या टोकापर्यंत) हा कोस्टल रोड उभारला जात आहे. एकट्या मरिन ड्राईव्हमध्ये एकूण सहा हजार टेट्रापॉड्स आहेत.
मरिन ड्राईव्हमधील इमारतींमध्ये जाणवणारी कंपनं किती चिंताजनक?
दोन्ही इमारतींमध्ये वास्तव्यास असणाऱ्या सर्वांनाच ही कंपनं जाणवल्याचं रहिवाशांनी सांगितलं आहे. रहिवाशांनी पालिकेला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की “आम्ही तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो की, गेल्या काही दिवसांपासून श्रीनिकेतन आणि गोविंद महल (मरिन ड्राईव्हवरील जी अॅण्ड एफ रोडवरील समुद्राच्या दिशेने असणाऱ्या इमारती) इमारतींमधील अनेक रहिवाशांना कंपनं जाणवत आहेत”.
“हे कंपन एका सेकंदासाठी जाणवतं. दुपारी दर ३० ते ६० मिनिटांच्या अंतराने भुकंपाच्या धक्क्याप्रमाणे ही कंपनं जाणवतात. आमच्यातील अनेकांनी मुंबईत भूकंप आला आहे का याचीदेखील माहिती घेतली. आता विचार करा एका तासात २० ते ३० वेळा भुकंपासारखे हादरे बसत असतील तर काय स्थिती असेल,” असंही त्यांनी सांगितलं आहे.
टेट्रापॉड्स हटवल्यामुळे कंपनं जाणवत आहेत हा दावा कशावरुन?
मुंबई महापालिकेने माहिती घेण्यासाठी या ठिकाणी व्हायब्रेशन मॉनिटरिंग उपकरणे प्रदान केली आहेत. दरम्यान पालिकेने टेट्रापॉड्स हटवल्यामुळे कंपनं जाणवत असल्याचं अधिकृतपणे सांगितलं नसलं तरी, पुन्हा एकदा ते बसवण्याची तयारी दर्शवली आहे. ओहोटी असताना टेट्रापॉड्स पुन्हा एकदा बसवले जातील असं पालिकेने सांगितलं आहे.
“संबंधित सोसायटींमधील नागरिकांची भीती दूर करण्यासाठी कंत्राटदाराला पुन्हा एकदा टेट्रापॉड्स आपल्या जागी बसवण्यास सांगितलं आहे. कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली आहे,” अशी माहिती पालिकेने दिली आहे.
सोमवारी कोस्टल रोड कंत्राटदार, व्यवस्थापन सल्लागार आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. “गेल्या शुक्रवारी हाय टाईड, उंच लाटा आणि जोराचा वारा यामुळे कंपनं जाणवल्याची शक्यता असावी अशी चर्चा यावेळी झाली,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.